सुश्री शिल्पा मैंदर्गी
☆ कवितेचा उत्सव ☆ स्पंदन ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
असं एक अवकाश असावं जिच्यात उंच भरारी मारता यावी ।
असे एक ध्येयाचे शिखर असावे
जे गाठताना देहभान हरपून जावे ।
असा एक सूर मिळावा
ज्यामुळे जीवनाचे गाणच बनून जावं ।
असे सोबती भेटावेत
ज्यांच्या साथीनं सारी मैफिलच रंगून जावी ।
अशी एक मैत्री असाव जिचा हात हातात येताच,
काट्याकुट्यांची आणि भयानक वाटणारी वाट हिरव्यागार वनराईच्या गालीच्या प्रमाणे वाटावी ।
आयुष्य म्हणजे असा एक सामना असावा
की शेवटच्या बॉलमध्ये पण मॅच जिंकता यावी ।
एक विचार मनात यावा की ज्यामुळे जादुगाराने फिरवलेल्या काठी प्रमाणे सारे आयुष्यच बदलून जावे ।
असे एक संवेदनशील मन हवे , ज्याने मुंगीचेही मनोगत जाणता यावे । असा एक भूतकाळ असावा,
त्याच्या रम्य आठवणीत रमताना, रोमांचित होताना भविष्यातलया सगळ्या चिंता विसरून जाव्या ।
असा एक वर्तमानकाळ हवा, की ज्याच्यात भूतकाळ आणि भविष्य काळाचा सुंदर संगम साधता यावा ।
असे एक जिंकण्याचे स्वप्न हवे, की जे साकारताना
पराभवाचे आणि अपयशाचे बळ संपून जावे ।
असं एक कर्तृत्व हवं, की ज्याच्याकडे बघताना
आई वडिलांना अभिमान वाटावा ।
© सुश्री शिल्पा मैंदर्गी
दूरभाष ०२३३ २२२५२७५
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈