सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ कृतार्थ मी… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
जीवन माझे कृतार्थ झाले
ज्या दिवशी मी आई झाले।।धृ।।
अंगणातल्या वेलीवरती एक कळी दिसली
चाहूल लागता बाळाची रोमांचित काया झाली
आगमनाने बाळाच्या घर माझे सजले।।१।।
इवल्याशा त्या मुखावरती
भाव निरागस किती मज दिसती
टॅह्या टॅह्या स्वर रुदनाचे ते कर्णातच घुमले।।२।।
फुटला पान्हा मातृत्वाचा
दिव्यानंद तो स्तनःपानाचा
चुटुचुटु करिता दुग्धप्राशन अमृतघट भरले।।३।।
बाळकृष्ण तो रांगत आला
आई आई बोलू लागला
बोल चिमखडे गुंजत कानी धन्य मजसी वाटले।।४।।
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈