श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ अत्तर उडून गेले ☆
आता नव्या पिढीला मिळणार मोकळेपण
बंधन नसेल आणिक कोणी नसेल राखण
बांधीलकी कशाला आकाश स्वैर आहे
स्वीकार कलियुगाला व्यापार मुक्त धोरण
उघड्या कुपी मधूनी अत्तर उडून गेले
वेळीच या कुपीचे मी लावले न झाकण
नाही सकसपणा हा कोठेच राहिलेला
हे राज्य भेसळीचे मिळणार काय पोषण
नाही शुभंकरोती गीता न वाचली मी
संस्कार भावनांचे व्हावे कुठून रोपण
बोलू नकोस वेड्या त्यांच्या विरूद्ध काही
नेते करो कितीही अश्लाघ्य रुक्ष भाषण
दाणा कसा टिपावा पक्षास ह्या कळेना
हुसकून लावण्याला आहे तयार गोफण
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈