सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ सरीवर सरी… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
झांकोळले नभ
आला सोसाट्याचा वारा
गरजती मेघ
कशा कोसळती धारा
आल्या सरीवर सरी
वृक्ष वल्लरी भिजती
चिंब चिंब झाले रान
शेते वावरे डोलती
ओल्या मातीतला वास
भरे सुगंध श्वासात
वातावरणी गारवा
कुंद कुंद भासे रात
आली सागरा भरती
येती लाटांवर लाटा
झाले पाणी चहूकडे
दिसेनाश्या झाल्या वाटा
नद्या वाहती दुथडी
उड्या मारती निर्झर
वर्षाराणी नृत्य करी
थुई नाचतो मयूर
खिडकीत बसूनिया
झड मुखावरी घेऊ
पावसाचा हा धिंगाणा
डोळे भरूनिया पाहू
जाती घाटात पहाया
पावसाळ्याचा नज़ारा
जन ओलेचिंब होती
घेता अंगावरी धारा
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈