सौ राधिका भांडारकर
कवितेचा उत्सव
☆ पितृ दिना निमीत्त – तीर्थ… ☆ सौ राधिका भांडारकर ☆
गेली ती गंगा
राहिलं ते तीर्थ
पपांचं हे वाक्य
जीवनी किती सार्थ!..
नाही झालात वृक्ष
तर व्हा लव्हाळी
मुळे त्यांची घट्ट
राहती वार्या वादळी…
कशास दु:ख हरल्याचे
का होशी निराश
पहा पुढे नको मागे
घेई कवेत तू आकाश..
ओझे तुझे तूच वहा
वाट बिकट चाल नेटाने
वाटेतल्या बोचर्या कंकरांना
लाथाळूनी दे धीराने..
संस्कार शिदोरी बापाने
बांधून दिली प्रेमाने
जगण्याच्या वाटेवर
चालले म्हणून मी मानाने….
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈