सुश्री नीलम माणगावे
☆ कवितेचा उत्सव ☆ गिऱ्हाईक ☆ सुश्री नीलम माणगावे ☆
बस मधून जाता-येता
दिसतात मला त्या
रंगवलेल्या लालचुटुक ओठानी
गिऱ्हाईक हेरणाऱ्या!
काजळ भरल्या काळ्या डोहात
माणूसपण जपणार्या!
पोटच्या गोळ्याला
बापाचं नाव शोधणाऱ्या!
माझ्या सारख्याच दिसणाऱ्या….
हात, पाय, नाक, डोळे, कान
आणि मनसुद्धा असणाऱ्या,
माझ्याच जातीच्या
नखरेल पुतळ्या!
बाहेरून नटलेल्या
आतून फाटलेल्या
त्या….
त्या गिऱ्हाईक जपत असतात
टिचभर पोटासाठी
आणि आम्ही…. आम्ही ही एकुलतं का होईना
घरंदाज गिऱ्हाईकच तर जपत नसतो ना?
चिऊ-काऊच्या
घरट्यासाठी?
© सुश्री नीलम माणगावे
जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर
मो 9421200421
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
जबरदस्त कविता