श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 144
☆ रडला पाउस… ☆
आकाशाने पंख झटकले पडला पाउस
तिच्या नि माझ्या प्रेमासाठी भिजला पाउस
भेटीसाठी झाडांच्या तो नित्य यायचा
वृक्षतोडही झाली म्हणुनी चिडला पाउस
सत्तेला या कळकळ नाही कधी वाटली
शेतकऱ्यांचा फास पाहुनी रडला पाउस
नांगरलेल्या ढेकळास ह्या मिठी मारुनी
कोंबासोबत हसता हसता रुजला पाउस
रात्री त्याने कहरच केला बरसत गेला
शांत जाहला बहुधा होता थकला पाउस
आकाशाच्या पटलावरती किती मनोहर
इंद्रधनुष्या सोबत होता नटला पाउस
गळून पडले फुलातील या पराग तरिही
तुझ्या नि माझ्या प्रीतीचा मी जपला पाउस
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈