श्री आनंदराव रघुनाथ जाधव
कवितेचा उत्सव
☆ || वारकरी || ☆ श्री आनंदराव जाधव ☆
सावळा विठ्ठल | कर कटेवरी ||
उभा विटेवरी | युगे युगे || १ ||
भाळी गंध टिळा | वैजयंती गळा ||
नामाचा सोहळा | पांडुरंग || २ ||
पायी दिंडी चाले | भोळा वारकरी ||
भक्त माळकरी | विठ्ठलाचा || ३ ||
आषाढी कार्तिकी | भक्तजन येती ||
विठूनाम घेती | सदा मुखी || ४ ||
टाळ टाळी वाजे | चंद्रभागे काठी ||
विठुराया साठी | गळा भेटी || ५ ||
पंढरी वसते | भक्तांची माऊली ||
प्रेमाची सावली | माय बाप || ६ ||
पांडुरंग हरी | पांडुरंग हरी ||
नामघोष वारी | देवा दारी || ७ ||
© आनंदराव रघुनाथ जाधव
पत्ता – खणभाग, भारत चौक, शिवगर्जना मार्ग, “श्री ज्योतिर्लिंग”, २०७, सांगली.. संपर्क…८८३०२००३८९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈