श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ अत्तर… ☆
काळोखाच्या कुपीत थोडे असते अत्तर
प्रणय विरांच्या भेटीसाठी झुरते अत्तर
परिश्रमाचे बाळकडू जो प्याला आहे
त्या देहाला सांगा कोठे कळते अत्तर
वास मातिचा ज्या सदऱ्याला येतो आहे
त्या सदऱ्याला पाहुन येथे हसते अत्तर
शौकीनांच्या गाड्यांसोबत असते कायम
खिशात नाही दमडी त्यावर रुसते अत्तर
शांत घराच्या चौकटीत हे कुठे थांबते
कायम उनाड वाऱ्यासोबत दिसते अत्तर
संस्काराच्या घरात झाला जन्म तरीही
नाठाळाच्या मागे का हे फिरते अत्तर ?
तुझ्या स्मृतीचे स्मरण मनाला होते तेव्हा
हळूच माझ्या डोळ्यांमधुनी झरते अत्तर
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈