सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
कवितेचा उत्सव
☆ वारी पंढरीची… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे☆
(अष्टाक्षरी)
वारी चाले पंढरीला,
टाळ, चिपळ्या, मृदुंग !
साथी घेतल्या घेतल्या,
भरून ये अंतरंग !
पंढरीचे वारकरी ,
धाव घेती वाटेवरी !
असे सर्वांचीच प्रीती,
विठूच्या राऊळावरी !
वाट असे ती लांबची,
पाउलांना होतो त्रास!
विठू माऊली भेटीचा,
सर्वांना लागला ध्यास!
भजनात रंगे रात्र,
पहाट ये उत्साहात!
पुढचा मार्ग सरे तो,
श्री विठ्ठलाच्या ध्यासात!
विठुराया आणि कृष्ण,
दोन्ही असे एकरूप !
जुळती हात भक्तांचे,
आठवता आपोआप!
ध्यान जसे करू मनी,
तसे रुप येई ध्यानी !
एका सृष्टी नियंत्याची,
ही अनंत रूपे जनी!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈