महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 88
☆ शापित गंधर्व.… ☆
काटा पायात रुततो
तरी तसाच राहतो
कुटुंब पोसण्या बाप
अजन्म हो लढतो…०१
काट्याचे कुरूप जाहले
बापाचा पाय तो सडला
रुतणाऱ्या काट्याने
पिच्छा नाहीच सोडला…०२
एक वेळ अशी येते
पायच तोडल्या जातो
उभ्या आयुष्याचा तेव्हा
स्तंभ सहज ढासळतो…०३
तरी हा पोशिंदा बाप
लढत पडत राहतो
त्याच्या रक्तात कधी
दुजा भावच नसतो…०४
पूर्ण आयुष्य बापाने
डोई भार वाहिला
कुटुंबास पोसण्या
दिस-वार ना पहिला…०५
ना रडला कधी बाप
ना कधी व्यथा मांडल्या
मोकळे आयुष्य जगतांना
कळा भुकेच्या सोसल्या…०६
असा बाप तुमचा आमचा
अहोरात्र झुंजला गांजला
का कुणास ठाऊक मात्र
बाप शापित गंधर्व का ठरला…०६
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈