सौ. गौरी सुभाष गाडेकर
☆ कवितेचा उत्सव ☆ डोहाळे ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
मावळत्या सूर्याची लालबुंद टिकली
चिकटवून गोऱ्यापान नितळ भाळी
चमचमत्या चांदण्या माळीन म्हणते
लांबसडक काळ्याभोर कुंतली
हिरव्यागच्च जंगल झाडांची मेखला
बांधून गरगरीत पोटाकमरेला
झुलावं झुळझुळणाऱ्या वाऱ्यासारखं
नाचावं खळखळणाऱ्या झऱ्यासारखं
राजा, करशील ना रे
माझे हे डोहाळे पुरे?
‘तू काय पृथ्वी समजतेस स्वतःला? ‘
एक गद्य टोमणा आला
आणि मग तेव्हापासून
मिटूनच घेतलं मी स्वतःला
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
फोन नं. 9820206306.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
डोहाळे:
मिटून घेतलं तरी कविता छान उमलली आहे.