कवितेचा उत्सव
☆ संवाद ज्ञानोबा तुकयाचा ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
संवाद ज्ञानोबा तुकयाचा
समस्त ज्ञानासी असशी तूच पाया
तूच ज्ञानराया, तुका म्हणे
केले तुवां खुले ज्ञानाचे भांडार
हर्ष अपरंपार होई लोका.
थोर तुझा महिमा
काय मी वर्णावा
निःशब्द हा तुका ज्ञानदेवा.
दावियली लोकां ऐसी शब्दकळा
फुलविला मळा अमृताचा
सोसुनी प्रहार लोकनिंदेचे
बोल अमृताचे प्रसवले.
गीतेचा तो अर्थ
सांगे ज्ञानेश्वरी
दिव्य ती वैखरी अमृताची.
म्हणे ज्ञानराजा ऐक ऐक रे तुकया
माझिया सखया भूलोकीच्या
रचियली तुवां अभंगाची गाथा
भाविक तो माथा टेकतसे.
रूढी परंपरा, दंभ अभिमान
व्यर्थ ते लक्षण भाविकांचे
दावियला तुवां भक्तिमार्ग लोका
धन्य माझा तुका बोले ज्ञानदेव.
काळावरी तरले तुझे ते अभंग
धरूनिया संग श्रीहरीचा.
असे मी जरी पाया
तू झालासी कळस
आली देवळास
अलौकिक शोभा.
तुका म्हणे ज्ञानराजा
आता वंदितो चरण
न करी वर्णन
आणिक माझे.
साक्षी तया दोघा
इंद्रायणी पार
सोन्याचा पिंपळ डुलतसे.
धन्य इंद्रायणी, धन्य चंद्रभागा
कृपा पांडुरंगा झाली तुझी.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈