श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 147
☆ स्वाद त्याचा… ☆
मी सुदाम्या गुंतलो पोह्यात आहे
स्वाद त्याचा आजही स्मरणात आहे
मार्ग मैत्रीचा बदलणे शक्य नाही
ती अजुनही वाहते धमन्यात आहे
मैत्रि म्हणजे जीवनाचा मंत्र मित्रा
फक्त इतके ठेवले ध्यानात आहे
संकटी धावून येतो मित्र माझ्या
म्हणुन त्याचे नाव ह्या ओठात आहे
भेद काही आजही आहेत कायम
अन् तरीही प्रेम हे दोघात आहे
कैक दशके लोटली आहे तरी ही
तीच मैत्री आजही बहरात आहे
तीच विट्टी तोच दांडू त्याच गोट्या
पाहतो सारे तुझ्या डोळ्यात आहे
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈