श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ ऐनवेळी… ☆ श्री तुकाराम दादा पाटील … ☆
मज याद बोचणारी येतेच ऐनवेळी
होतो पुढे खुलासा भलताच ऐनवेळी
मंजूर सर्व केले रुसवा कशास आता
मारू नकोस बाई मुरकाच ऐनवेळी
मोठ्या दिलेर बाता मारून खूप झाल्या
झाला आवाज त्यांचा फुसकाच ऐनवेळी
देवा पुढे पुजारी करतोच ढोंग सारे
भाळावरी टिळा का दिसतोच ऐनवेळी
या बोल घेवड्यांच्या शपथा हवेत गेल्या
आवाज गर्जनांचा नुसताच ऐनवेळी
विश्वास काय आहे ठाऊक ज्यास नाही
घ्यावी खुशाल त्याची फिरकीच ऐनवेळी
नाचून बैठकीला रंगेल खूप केले
गिरकी अचूक नाही जमलीच ऐनवेळी
अपमान झेलताना हसतो खुशाल ढोंगी
सोडून लाज घेतो डुलकीच ऐनवेळी
या राजकारण्यांनी केली धमाल आहे
झालीय चाल त्यांची दुडकीच ऐनवेळी
झाल्यात पेरण्या पण आहे जरूर आता
पाऊस ठार वेडा रुसलाच ऐनवेळी
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈