सौ. जयश्री पाटील
कवितेच्या उत्सव
☆ माझा विठ्ठल… ☆ सौ. जयश्री पाटील ☆
माझा विठ्ठल विठ्ठल
हरी नामाचा गजर
दिंडी संगे वारकरी
विठू भेटीला अतुर
दिंडी चालते चालते
भक्ती भावात तल्लीन
टाळ मृदुंग चिपळ्या
गोड भजन कीर्तन
वाट सरते सरते
ओढ भेटीची लागते
चंद्रभागा बोलाविते
कष्ट सारी निवविते
पाया रचितो ज्ञानोबा
होतो कळस तुकोबा
साधू संत सारे येती
साद घालितो चोखोबा
माझी पंढरी पंढरी
देव उभा विटेवरी
माय विठू रखुमाई
जसा विसावा माहेरी
अरे सावळ्या सावळ्या
रूप तुझे पाहुनिया
तृप्त होते मन माझे
मोक्ष मिळो तुझ्या पाया
© सौ. जयश्री पाटील
विजयनगर.सांगली.
मो.नं.:-8275592044
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈