मराठी साहित्य – कादंबरी ☆ मित….. (भाग-1) ☆ श्री कपिल साहेबराव इंदवे
श्री कपिल साहेबराव इंदवे
(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक के रुप में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हमें यह प्रसन्नता है कि श्री कपिल जी ने हमारे आग्रह पर उन्होंने अपना नवीन उपन्यास “मित……” हमारे पाठकों के साथ साझा करना स्वीकार किया है। यह उपन्यास वर्तमान इंटरनेट के युग में सोशल मीडिया पर किसी भी अज्ञात व्यक्ति ( स्त्री/पुरुष) से मित्रता के परिणाम को उजागर करती है। अब आप प्रत्येक शनिवार इस उपन्यास की अगली कड़ियाँ पढ़ सकेंगे।)
इस उपन्यास के सन्दर्भ में श्री कपिल जी के ही शब्दों में – “आजच्या आधुनिक काळात इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे. अनेक सोशल मिडिया अॅप द्वारे अनोळखी लोकांशी गप्पा करणे, एकमेकांच्या सवयी, संस्कृती आदी जाणून घेणे. यात बुडालेल्या तरूण तरूणींचे याच माध्यमातून प्रेमसंबंध जुळतात. पण कोणी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून झालेल्या या प्रेमाला किती यश येते. कि दगाफटका होतो. हे सांगणारी ‘मित’ नावाच्या स्वप्नवेड्या मुलाची ही कथा. ‘रिमझिम लवर’ नावाचं ते अकाउंट हे त्याने इंस्टाग्रामवर फोटो पाहिलेल्या मुलीचंच आहे. हे खात्री तर त्याला झाली. पण तिचं खरं नाव काय? ती कुठली? काय करते? यांसारखे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याची उत्तरं तो जाणून घेण्यासाठी किती उत्साही आहे. हे पुढील भागात……”
☆ मित…… (भाग 1)☆
“Hi”
शेवटी तो मॅसेज आलाच ज्याची मागच्या महिन्याभरापासून मित वाट बघत होता. इंस्टाग्रामवर ” रिमझीम लवर” नाव असलेल्या त्या अकाउंटवर एका मुलीचा फोटो पाहून मित त्यावर मोहित झाला होता. कितीही झूम केला तरी फोटो फूलस्क्रीन होत नव्हता. आणि लहानशा गोलाकारात बघून त्याचे मन भरत नव्हते. म्हणून त्याने त्या अकाउंटला फाॅलो केले. प्रायवैट अकाउंट असलयामूळे “रिक्वेस्टेड” त्याच्या स्क्रिनवर दिसत होते. नाव लक्षात राहावे म्हणून त्याने स्क्रीनशाॅट काढून ठेवला. पुर्ण फोटो पाहण्याची त्याची बेचैनी काही कमी होत नव्हती. पण अशा नावाची अकाउंट्स ही मुलांची पण असतात. फेसबूक, इंस्टाग्राम किंवा अन्य सोशल मिडिया अॅप वर बनावट आय डी ओपन करून मुलींच्या शोधात असणा-या मुलांची निव्वळ टर उडवण्यासाठी, कधी कधी जवळच्या मित्राची फजिती करण्यासाठी अशी अकाउंट तयार केली जातात. हे त्याच्या लक्षात आलेच होते. पण फक्त जाणून घ्यावे या उद्देशाने त्याने फाॅलो रिक्वेस्ट कॅन्सल केली नाही. बेचैनी एवढी होती की क्षणभर ही धीर त्याला निघत नव्हता. पण काय करणार, रिक्वेस्ट स्विकारली तेव्हाच त्याला तिची प्रोफाईल बघता येणार होती.
आज कित्येकदा मितने मोबाईल डाटा चालू करून इंस्टाग्राम नोटीफिकेशन चेक केले होते. एव्हाना सर्वच अॅपची नोटीफिकेशन त्याने बंद करून ठेवली होती. पण आज त्याने ती पुन्हा चालू करून पुन्हा पुन्हा तपासत होता. त्यांच हे बदलणं त्याच्या गृपच्या मुलांनाही नविन होतं. काहीतरी विचारांत राहणारा, शांत शांत एका कोप-यात राहणारा, आणि कोणाचा फोन आल्याशिवाय मोबाईलला न बघणारा मित आज मात्र मोबाईलला खुपदा चालू करून पाहत होता.
रात्रीच्या जेवणानंतर नित्य सवयीप्रमाने शत पावली करण्यासाठी कॅटीनबाहेर गेला. चालता चालता न राहवून त्याने पुन्हा मोबाईल डाटा चालू केला. आणि फायनली त्याला ती नोटीफिकेशन मिळाली “रिमझिम लवर अॅक्सप्ट युवर फ्रेंड रिक्वेस्ट”. ती पाहून तो आनंदुन गेला. अवघ्या काही तासांत त्याची रिक्वेस्ट अॅक्सेस्ट झाली होती. अती उत्साह न दाखवता नेहमीप्रमाणे शांत डोकं ठेऊन तो रूमवर जाऊन बेडवर पडून निवांत फोटो पाहावे असा विचार करून तो रूमवर परतला. आणि कोणाशीही न बोलता आपल्या रूममध्ये घुसला. संघरत्न, महेश आणि मित अशा तिघांची ती रूम होती. संघरत्नला उत्कृष्ट वाद्य वाजवता येत असल्याने त्याच्या बेडच्या आजूबाजू गिटार वगैरे असं त्याचं आवडतं साहित्य पडलेलं होतं. मित रूममध्ये आला तेव्हा संघरत्न कोणती तरी धुन वाजवण्यात मग्न होता. तसाच महेशही उत्तम कलाकार आणि तो छान डान्सरही आहे हे त्याचे कपडे केसांची स्टाईल आणि त्याच्या वागण्यावरून कोणीही ओळखून घेईल. मित आला तेव्हा संघरत्न त्याला म्हटला “मित अरे बघ तूझ्या नव्या नाटकासाठी मी नविन धून तयार करतोय. ती जरा एकून सांग मला कशी झालीय ते. तुला काही सुधारणा हव्या असतील तर त्या ही सुचव.” पण मित त्याची कोणतीही गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. म्हणून त्याने स्मित हसून त्याला म्हटले “अरे बाळं तू आज पर्यंत ज्या धून बनवलेल्या आहेत त्या कधी फेल गेल्या आहेत का? छानच असेल ही पण. तू सुरु ठेव” मितचे असं उत्तर देणं त्याला आवडलं नाही. त्याने रागाने गिटार बाजूला ठेवली. तेव्हा मित त्याच्या जवळ बसला. “अरे डार्लिंग, रागवतोय कशाला.” संघरत्न थोडा चिडलाच होता. ” रागावतोय म्हणजे मी एवढी मेहनतीने ती धून तुझ्यासाठी बनवली आणि हारामखोरा, तू इग्नोर करतोय” आणि त्याने मान तशीच रागात वळवली. त्याची मान स्वत कडे करण्याचा प्रयत्न करत मित त्याला म्हणाला. ” अरे मेरी जान. आय लव यू बोल दे एक बार” पण तो काही मानत नव्हता. म्हणून मितने मोबाईल घेतला आणि त्याच्यापुढे केला. ” अरे बघ इंस्टाग्रामवर एक मुलगी भेटलीय. खुप सुंदर आहे यार तीने आत्ताच फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेस्ट केली म्हणुन……” त्याचं बोलणं अपूर्णच सोडत संघरत्नने मोबाईल त्याच्या हातातुन घेतला. आणि म्हटला “काय? साल्या गुपचूप गुपचूप तू अशी कारस्थाने करतोयस आणि आम्हाला माहितीसुध्दा पडू देत नाही. दाखव कोण आहे ती, कशी आहे” मित ” अरे सावकाश. मी पण पाहिलं नाही तीला अजून पुर्ण” मितने त्याच्या हातातून मोबाईल परत घेतला. आणि नोटीफिकेशन आॅन केली. स्क्रिनवर “रिमझिम लवर” नावाचं अकाउंट दिसतं होतं. साधारण आठराएक फोटो पोस्ट केले होते. अधीर असलेल्या मितने पटकन एक फोटोवर क्लिक केले. फोटो फूलस्क्रीन दिसत होता. फोटो पाहताच त्याच्या अंगावर शहारा उठला. त्याचं. ह्रदय जणू बाहेर निघून नाचू लागलं होतं. तो हसत होता कि आणखी काही. हे त्यालासुद्धा कळत नव्हतं. त्याच्या चेह-यावरचे नेमके भाव काय आहेत हे सांगण्या पलिकडचे होते. एवढं सुंदर देखणं रूप, जणू तारूण्याची ती मिसालच होती. ते बारीक-बारीक छोटे डोळे, लांबसडक काळेभोर दाट केसं, दिसायला सडपातळ पण सौंदर्याची खाणच होती ती. तिचे ते स्मित अधिकच मोहत होते. हसतांना गालावर पडलेली खळी तीला शोभून दिसत होती. जास्त नाही पण उंच सडपातळ असलेली ती लावण्यवतीच भासत होती. तीला पाहताच त्याचं ह्रदय प्रेमाच्या सागरात हेलकावे खाऊ लागलं होतं. त्याची दिवानगी फोटोगणिक वाढतच होती. संघरत्नचंही काहीसं असंच होतं. पण मितला त्या फोटोत पुर्णपणे बुडालेलं पाहून त्याने खांदा मारत म्हटले ” अरे साल्या, कुठे भेटला हा कोहिनूर तूला.” मित फक्त स्मित देत होता. संघरत्नला कळाले कि त्याच्या मनात काय सुरू आहे. तो त्याला चिडण्यासाठी म्हटला ” काय? डायरेक्ट विकेट…….” मितने लाजून खाली मान घातली. संघरत्न ” अबे तू पण …….”
तो चकित होता. संघरत्न जेवढा मितला ओळखत होता. त्याला माहीत होतं प्रेम वगैरे या गोष्टींत मितला रस नव्हता. त्याच्या बाबांचं म्हणनं होतं की त्याने इंजिनियरींग करावं पण मितला लिखाणात फार रस होता. त्याने त्याच्या बाबांना सरळ सांगीतलं होतं कि त्याला लेखक, दिग्दर्शक व्हायचंय. त्याच्या निर्णयाचा सम्मान करत त्याच्या बाबांनी त्याला विद्यापिठात ड्रामा डिपार्टमेंटला प्रवेश घ्यायला परवानगी दिली होती. बाबांचा विश्वास सार्थ ठरवत मितने आतापर्यंत अनेक चांगल्या कथा लिहून त्यांना स्वतःच दिग्दर्शित करून अनेक बक्षिसांवर उत्कृष्ट दिग्दर्शक आणि लेखक म्हणून नाव कोरले होते. त्याने अनेक भयकथा, प्रेमकथा, प्रेरणादायी कथा लिहिल्या होत्या. त्याच्या शालेय जीवनात त्याने एक काव्य संग्रह ही प्रकाशीत केला होता. त्याला प्रेमकथा लिहीण्याची विशेष आवड होती. हे सांगणे अतिशयोक्तीचे नव्हते कि एवढ्या प्रेमकथा लिहीणारा मित अजूनही कोणत्या मुलीच्या प्रेमात पडला नव्हता. पण या मुलीचा फोटो पाहून तो तिच्यावर भाळला हे मात्र खरे होते. त्याने ते सर्वच फोटो कितीतरी वेळा झूम करून पाहिले होते.
( क्रमशः )
© कपिल साहेबराव इंदवे
मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो 9168471113