सौ. ज्योत्स्ना तानवडे
☆ काव्यानंद ☆ ‘सात’ – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆
स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’
रसग्रहण:
कविवर्य कुसुमाग्रज यांची ही अतिशय गाजलेली कविता; जिचे एक जाज्वल्य स्फूर्तीगीत झाले. शिवकालीन इतिहासातील एक घटना शब्दबद्ध करणारी ही नितांत सुंदर अशी कविता आहे. कुसुमाग्रजांना तेजाचे, समर्पणाचे अतिशय आकर्षण आहे.या आकर्षणातून व्यक्त झालेल्या त्यांच्या सर्वच कविता जणू झळाळणाऱ्या शलाकांसारखी स्फूर्ती गीते ठरल्या. त्यातीलच ही अतिशय बलशाली कविता आहे.
कवितेची सुरुवात होते छत्रपती शिवाजीराजांच्या पत्राने.रणात पाठ फिरवून पळालेल्या आपल्या सेनापतींना महाराज उपरोधपूर्ण; पण त्यांच्या पराक्रमाला चेतविणारे पत्र लिहितात. ‘रण सोडून पळून आलात. भर दिवसा रात्र झाली असे वाटले.अरे ‘पळून येणे’ हे काय मराठी शील झाले ? आपली जात विसरलात काय ?’
या पत्रातील प्रत्येक अक्षराने प्रतापरावांच्या वर्मावरच घाव घातला. ते त्वेषाने पेटून उठले. ‘काल रणात पाठ दाखविली. लढवय्या मराठी धर्म विसरलो. पण आज तळहाती शीर घेऊन शत्रू सैन्यावर तुटून पडतो ‘ असे म्हणत सहा सरदारांसह शत्रूवर तुटून पडले. ‘त्यांची भिवई चढणे’ ‘पटबंदाची गाठ तुटणे’ या शब्दातून वीररसाचा आविष्कार झाला आहे.
नाट्यात्मकता, दृश्यात्मकता हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कित्येक शतकांपूर्वीची ही घटना जणू आपण साक्षात अनुभवतो आहोत इतके नाट्य, इतकी वातावरण निर्मिती कविवर्य व्यक्त करतात. ही उत्कटता प्रत्येक कडव्या बरोबर वाढतच जाते.
‘खालून आग, वर आग,आग बाजूंनी’ या ओळींनी तिथल्या घनघोर युद्धाचे चित्र समोर उभे ठाकते आणि त्वेषाने लढता-लढता ‘खग सात जळाले अभिमानी वणव्यात’ ‘दगडावर दिसतील अजुनी तेथल्या टाचा | ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा’
या ओळी त्यांच्या पौरूषाचा आवेग केवढा प्रचंड होता याची साक्ष देतात. राजनिष्ठा, ध्येयनिष्ठा, वचनपूर्ती यासाठी त्यांनी केलेले हे समर्पण आहे. त्यांच्या झुंजार,पराक्रमी बलिदानाची ही गाथा. पण इथे पराभवाने सुद्धा विजयाची उंची गाठली आहे. अतिशय भावनिक,आवेशपूर्ण आणि लयबद्ध अशी ही कविता आहे. पुन्हा पुन्हा वाचावी अशी आहे. कुसुमाग्रजांनी या ऐतिहासिक घटनेचे हे काव्यशिल्प अजरामर केले आहे.
© सौ. ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈