सौ. राधिका भांडारकर
काव्यानंद
☆ (1) फसवाफसवीचा डाव (2) चेटूक – सदानंद रेगे ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. राधिका भांडारकर ☆
काव्यानंद (श्री. सदानंद रेगे यांची कविता)
[1]
फसवाफसवीचा डाव
तुझ्या एका हातात
ऊन आहे
एका हातात
सावली आहे
मला माहीत आहे
माझ्याशी खेळलीस
तसलाच
फसवाफसवीचा डाव
तुला श्रावणाशी
खेळायचा आहे..
–सदानंद रेगे….
[2]
चेटुक...
श्रावणाची सर
फुलांच्या पायांनी
येते आणि जाते
चेटूक करुनी..
पाने झाडीतात
पागोळ्यांची लव
फुलांच्या कोषात
ओलेते मार्दव….
वार्याच्या चालीत
हिरवी चाहूल
अंगणी वाजते
थेंबांचे पाऊल…
पिसे फुलारते
ऊन्हाचे लेकरु
लाडे हंबरते
छायेचे वासरु….
अभाळी झुलते
निळाईची बाग
इंद्रधनुला ये
रेशमाची जाग…
आणिक मनाच्या
वळचणीपाशी
घुमे पारव्याची
जोडी सावळीशी….
– सदानंद रेगे
☆ कवितेचे रसग्रहण – सौ. राधिका भांडारकर ☆
२१ सप्टेंबर हा कवी सदानंद रेगे यांचा स्मृतीदिन.
त्या निमित्ताने, त्यांच्या काव्याचा रसास्वाद—–
वास्तविक ते नाटककार,लघुकथा लेखक,व्यंगचित्रकारही होते…पण साहित्यविश्वात ते कवी म्हणून अधिक ठसले. त्यांच्या कवितेचे एक वैशिष्ट्य, वेगळेपणा म्हणजे,त्यांची मुक्त ,स्वैर कल्पनाशक्ती. वेगळा दृष्टीकोन. त्यांच्या कवितेत आढळणारा व्हिजन. मात्र त्यांच्या व्हीजनमधे त्याच त्याच मनोभूमिकेची बांधिलकी आढळत नाही .विषय एकच असला तरी कवितेतला आशय निराळा भासतो. कल्पनाशक्तीला चौफेर स्वातंत्र्य दिल्याचे जाणवते. कुठल्याही एकाच विचारात ती अडकून पडत नाही ती निरनिराळ्या कोनांतून व्यक्त होते. त्यामुळे सदानंद रेगे यांची कविता ही विशुद्ध वाटते. त्यांच्या कवितेतली भरारी अथवा कोलांटी ,यांचं कुतुहल वाटतं.
त्यांची कविता सर्वसमावेशक आहे. म्हणजे संस्कृती,परंपरा ,अस्मिता,आपली माती अशा वर्तुळात ती गिरक्या घेत नाही…ती संकुचीत नाही.विमुक्त आणि सर्वस्पर्शी आहे.मनमोकळ्या वार्यासारखी आहे.—-मात्र सदानंद रेगे यांची कविता ,गाभार्यातल्या जाड काळोखात ,प्रकाशाचे कण शोधावा तशी आहे..त्यांची कविता वाचताना जाणवतं, की कविता ही कवीचीचअसते. वाचकाचा असतो तो गर्भशोध. दडलेल्या आशयाचा शोध. कधी वाचकाची,कवीच्या मानसिकतेशी नाळ जुळते तर कधी ती अधांतरीही राहते. पण लहान ओळी,ओळीत गुंफलेले शब्द कधी मऊ,कधी भेदक–..पण त्यातून तयार झालेला हा काव्यसर वेगळ्याच तेजाने चमकतो.थक्क करतो.
फसवाफसवीचा डाव आणि चेटूक या दोन्हीही कवितेत श्रावण आहे. पण एकाच श्रावणाच्या माध्यमातून ,व्यथेला पाहण्याची, विचार करण्याची दृष्टी मात्र वेगळी आहे. फसवाफसवीचा डाव हे मुक्तछंदातील लघुकाव्य आहे.आणि चेटूक हे षडाक्षरी (षटकोळी) किंवा अक्षर
छंद काव्य आहे…
‘तुझ्या एका हातात ऊन आहे
एका हातात सावली आहे…’
–नियतीनं आयुष्यभर चकवलं. सुखदु:खाचे चटके दिले. चढउतार दाखवले. उन सावल्यांतून फिरवलं–असं हे विरोधाभासी आयुष्य जगताना, कवीला कुठेतरी श्रावणातल्या उनसावल्या जाणवतात. आणि हा फसवाफसवीचा खेळ मानवी जीवनात जसा आहे तसा निसर्गातही आहे याची समज मिळते. अगदी दहाच ओळीतला हा मानवी जीवनाचा निसर्गाशी असलेला संबंध श्रावणाकडे बघण्याची एक पलीकडची दृष्टी देतो. मानव आणि निसर्ग याची घातलेली ही सांगड मनात राहते.
‘श्रावणाची सर
फुलांच्या पायांनी
येते आणि जाते
चेटुक करुनी….’
—वास्तविक फुलं म्हणजे कोमलता. चेटूक या शब्दात उग्रता आहे. म्हणजे हे दोन्ही शब्द अर्थाने विरोधाभासी असले तरी कवितेच्या मानसिकतेत ते चपखल बसतात.
—मात्र सदानंद रेगे यांच्या फिनीक्सदुपाररस्ते, ब्रांकुशाचा पक्षी*, वगैरे कवितातून आढळणारे निखारे,ठिणग्या नागडेपणा ,काठिण्य हे ,चेटुक या कवितेत आढळत नाही. त्यामानाने ही कविता सौम्य आहे.
–पागोळ्यांची लव, ओलेतं मार्दव, हिरवी चाहुल, थेंबांचं पाउल, उन्हाचं लेकरु, छायेचं वासरु, हे शब्द एकेका घुंगरासारखे मनावर नाद उमटवतात.कवितेतला हा इंद्रधनु, रेशमी श्रावण मनावर तरंगत असतानाच, शेवटच्या कडव्यात मात्र ,कवीच्या एकाकीपणाशी येउन थबकतो.
‘आणिक मनाच्या
वळचणीपाशी
घुमे पारव्याची
जोडी सावळीशी…’
—हा रेशीम मुलायम श्रावण, कुठेतरी तुटलेल्या क्षणांपाशी येउन थांबतो.अन् आठवणींचे हे चेटुक कवीला वेदना देते असं वाटतं…
–त्यांचीच ‘अक्षरवेल’ या काव्यसंग्रहातील श्रावणावरचीच आणखी एक कविता सहज आठवते…
‘आला श्रावण श्रावण
गुच्छ रंगांचे घेउन
आता मेल्या मरणाला
पालवी फुटेल
गोठलेल्या आसवांना
पंख नवे येतील….’
–अशी आहे सदानंद रेगे यांची कविता!!—एकांगी किंवा एकात्म नसलेला ,विविधांगी,अनेक कोनी व्हीजन त्यांच्या कवितेत सातत्याने जाणवतो….विषय एक पण अंतरंग निराळे…
— ‘ सूर्याच्या नरडीवर उमटलेले सावल्यांचे व्रण…” अशा पंक्तीही जाणीवेला अंकुर फोडतात…आणि एक तीव्र कळ घेउनच, सदानंद रेगे यांची कविता जाणीवेच्या पलीकडे जात राहते….
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈