सौ. विद्या वसंत पराडकर

?  काव्यानंद  ?

Best Bhojpuri Video Song - Residence w

 ☆ एक धागा सुखाचा – गदिमा ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. विद्या वसंत पराडकर ☆

मराठी‌ सारस्वतांच्या आकाशातील एका दैदिप्यमान  ता-याप्रमाणे असणारे,महान‌ लेखक, कविवर्य,गीत रामायण कार ग. दि. माडगुळकर यांच्या

जन्म दिवशी  आदरांजली म्हणून त्यांनी च लिहिलेल्या एका अमर कलाकृतीचे म्हणजेच चित्रपट गीताचे रसग्रहण करीत आहे.

हे गीत १९६० च्या  “जगाच्या पाठीवर” या चित्रपटाने अजरामर केले आहे.पडदयावर  हे गीत “राजा परांजपे” या अष्टपैलू कलाकाराने  गायले असून सुधीर फडके यांच्या सुरेल गळ्यातून  स्वरबद्ध झाले आहे.हे गीत मराठी मनावर एखाद्या शिल्पा सारखे कोरल्या गेले आहे.

भारतीय संस्कृतीत त्रिवेणी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.हेच महत्त्व साहित्य,कला, संगीत या क्षेत्रालाही आहे. कविवर्य ग.दि.मा. ; संगीतकार गायक सुधीर फडके, जेष्ठ अभिनेते राजा परांजपे या त्रयीनी एका नाविन्यपूर्ण कलाकृतीची म्हणजे  एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे म्हणजे हे गीत होय. म्हणून हे गीत मराठी मनावर‌ अधिराज्य करीत आहे. या गीतांवर आजही प्रशंसेचा पाऊस पडत आहे.

“एक धागा सुखाचा”

एक धागा सुखाचा, शंभर  धागे दुःखाचे

जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे

एक धागा सुखाचा…||धृ||

 

पांघरसी जरी असला कपडा

येसी उघडा, जासी उघडा

कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे

एक धागा सुखाचा…

 

मुकी अंगडी बालपणाची, रंगित वसने तारुण्याची

जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे

एक धागा सुखाचा….

 

या वस्त्राते विणतो कोण? एकसारखी नसती दोन

कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचे

एक धागा सुखाचा….

                                  – ग.दि.मा.

हे काव्य १५ ओळींचे आहे . ३ कडवे व धृवपद आहे . मानवी जीवनातील एक कटू सत्य कविवर्याने जगा समोर मांडले आहे .

एक धागा सुखाचा , शंभर धागे दुःखाचे” हे त्रिकालाबाधित सत्य आहे . हे सत्य कविवर्यांनी  निरनिराळ्या दाखल्यातून स्पष्ट केले आहे . सुख व दुःखाच्या आडव्या व उभ्या धाग्यांनी हे जीवन वस्त्र विणले आहे . प्रत्येकाला या जीवनानुभवाला सामोरी जावे लागेल . प्रत्येक  वस्त्र एक सारखे नसते . यात विभिन्नता असते .

मानवी आयुष्यावर तीन अंकी नाटकाचे  रूपक केले आहे . नाटकात साधारणतः तीन अंक , तीन प्रवेश असतात . पहिला बाल्य- नैसर्गिक अवस्थेचे वर्णन  उदा. “येसी उघडा” अंगडी , “टोपडी” या शब्द सौंदर्याने बालपण संपते .

त्या नंतर जीवन रूपी नाटकाचा दुसरा अंक सुरू होतो . तारुण्याच्या वसंत बहराने . या अवस्थेत शृंगाराला बहर आलेला असतो . उदा.- रंगीत वसने – हे शब्द सौंदर्य स्थल .जीवन रुपी नाटकाचा तिसरा अंक सुरू होतो . “वार्धक्याने” – शब्द प्रयोग – “वार्धक्याची शाल घेऊनच” . वृद्धत्वाच्या विदीर्ण सत्याचे केलेले वर्णन मोठे हृदयभेदक आहे . जीवनाचा शेवट शेवटी “जासी उघडा” या कटू सत्याने केला आहे.

प्रस्तुत काव्यातील उच्चतम बिंदू climax म्हणजे वस्त्रातील विविधता हे तर आहेच , परंतु विणक-याचे वस्त्र विणतांना हात दिसत नाही . कर्ता असून अकर्ता राहतो . ज्या प्रमाणे सूत्रधार , परमेश्वर हा जग चालवतो पण दिसत नाही , पपेट शो मध्ये सूत्रधार दिसत नाही . पण बाहुल्या नाचतात . या सुंदर त्रिकाल बाधित सत्याने काव्याला विराम दिला आहे .

इंग्रजी साहित्यातील प्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपिअर म्हणतो ; “जग ही रंगभूमी आहे .”   ग.दि.मा  म्हणतात “मानवी जीवन हे नाटक आहे”. प्रसिद्ध अभिनेता , दिग्दर्शक राज कपूर ह्याने “मेरा नाम जोकर” मध्ये असेच जीवनाचे तत्वज्ञान मांडले आहे .

वर वर बघता हे चित्रपट गीत वाटत असले तरी मानवाला अंतर्मुख करण्याचा प्रयत्न ह्यातून केला गेला आहे . या गीताद्वारे दिलेला संदेश वास्तविक सत्याची ओळख करून देणारा वाटतो . सारस्वताच्या उद्यानातील हे एक “evergreen” पुष्प आहे असे म्हंटल्यास अतिशयोक्ती होणार नाही . मराठी सारस्वताच्या मंदिरातील नंदा दीपा प्रमाणे हे गीत भविष्यातही प्रकाशमय होईल . “झाले बहू , होतीलही बहू , परंतु यासम नसे , या उक्ती प्रमाणे ते मैलाचा दगड ठरो . याच अपेक्षेत लिखाणाला विराम देते .

© सौ. विद्या वसंत पराडकर

पुणे  

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments