श्रीमती अनुराधा फाटक

? काव्यानंद ?

☆ कुंपण…. कवी कै. वसंत बापट ☆ रसग्रहण.. श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

कवी कै. वसंत बापट

जन्म – 25 जुलाई 1922

मृत्यु – 17 सितम्बर 2002

? कुंपण ?

आई आपल्या घराला

किती मोठं कुंपण

तारामागे काटेरी

कां ग रहातो आपण?

पलिकडे कालव्याजवळ

मोडक्या तुटक्या झोपड्या

मुलं किती हाडकुळी

कळकट बायाबापड्या

लोक अगदी घाणेरडे

चिवडतात घाण

पत्रावळीतले उष्टे म्हणजे

त्यांचे जेवणखाण !

काळा काळा मुलगा एक

त्याची अगदी कमाल

हातानेच नाक पुसतो

खिशात नाही रुमाल

आंबा खाऊन फेकली

मी कुंपणाबाहेर कोय

त्यानं म्हटलं घेऊ कां?

मी म्हटलं होय

तेव्हापासून पोटात माझ्या

कुठतरी टोचतयं गं

झोपतानाही गादीमध्ये

कुंपण मला बोचतयं गं !

  • कवी कै. वसंत बापट

आपल्या घरापेक्षा वेगळे वातावरण बघणाऱ्या बालमनाला पडलेले प्रश्न आदरणीय कवी वसंत बापट यांनी मुलाच्याच शब्दातून या कवितेत मांडले आहेत

सुस्थितीतील एका कुटुंब

झोपडपट्टी जवळच्या सर्व सोयीनी युक्त एका शानदार

घरात रहायला आल्यावर त्या घरातल्या बाल्यावस्थेतील एका मुलाचे घराभोवती फिरणे,

निरीक्षण करणे सुरु झाले तेव्हा

‘आपल्या घराभोवती एक काटेरी कुंपण असून त्याच्या जवळ  असलेल्या मोडक्या तोडक्या झोपड्या त्याला दिसल्या.अशा झोपड्या कधीच न पाहिलेल्या त्याची झोपड्या व त्यात रहाणाऱ्या माणसांबद्दलची उत्सुकता वाढली.कुंपणाजवळ उभा राहून तो निरीक्षण करू लागला. ते पहात असताना त्याच्या मनात  जे बालसुलभ प्रश्न निर्माण झाले ते तो आईला विचारू लागला.

‘आई, आपण रहातो त्या घराभोवती मोठे काटेरी कुंपण कां आहे? आपल्या समोरच्या त्या मोडक्या तोडक्या झोपडपट्ट्या आहेत तेथे कितीतरी मुलं असून ती  हाडकुळी असून तिथल्या बायाबापड्या कळकट असतात. ही घाणेरडी माणसे आपण टाकलेल्या पत्रावळीतले अन्न चिवडतात, जेवण म्हणून खातात. त्यातला एक काळा मुलगा खिशात रुमाल नसल्याने हातानेच नाक पुसतो. आंबा खाऊन मी कोय फेकली ती त्याने मला विचारून घेतली.

तेव्हापासून आई मला काहीतरी वाटते,

झोपलेल्या मऊ गादीवर मला कुंपण बोचतेयं ‘

कविवर्य वसंत बापट यांनी मुलाच्या मनातील प्रश्नातून समाजाचे विदारक चित्र आपल्यासमोर उभे केले आहे कुंपण हे गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये असलेल्या दरीचे प्रतिक असून ते साधेसुधे नाही तर काटेरी आहे गरीब हे शेवटपर्यंत गरीबच रहाणार आणि श्रीमंत आपल्याजवळ कोणी येऊ नये स्वतःभोवती कुंपण घालणार. श्रीमंत, गरिबांचे खाणे,रहाणीमान यातील तफावत बालवृत्तीला न समजल्याने त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाले .मऊ गादीवर त्याला झोप येत नाही. तर घराभोवतीच्या कुपणाचे काटे त्याला टोचतात म्हणजे असे कां? आपण आंबा खायचा आणि त्यांनी कोय कां? त्याना केव्हा आंबा मिळणार?आपल्या घराभोवतीचे काटेरी कुंपण निघाले तर….त्याना काहीतरी देता येईल. कधी निघणार हे कुंपण ही अस्वस्थता,’ मऊ गादीमध्ये कुंपण बोचते या ओळीतून जाणवते.

लहान मुलांना पडणारे प्रश्न मोठ्यांना पडले तरच समाजभान जागे होईल असाही या कविता लेखनाचा हेतू असावा.समाजदरी कमी करण्याचा एक प्रयत्न म्हणजे ही कविता असे वाटते.विचार प्रवृत्त करणारी ही कविता बरेच काही सांगून जाते.

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित/सौ.मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments