सौ राधिका भांडारकर
काव्यानंद
☆ वृषोक्ती …. वि.दा.सावरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆
सावरकरांची कविता…रसग्रहण
☆ वृषोक्ती ☆
गाडीला वृष जुंपिला धरित जो जू मानेवरी
आला ऊंच चढून घाट दमला गेला आवांका तरी
होता वाहून नेत वाहत तरी तो?! मंदचारी तया
कोणी हिंदु वदे सगर्व ह्रदये धिक्कारवाणीस या।।१।।
हा धिक् रे वृष,मान वाकवूनिया तू दाससा राबशी
मोठे जूं जड हे असह्य भार हा विश्रांतिही ना तशी
तोंडी ये बहु फेस त्राण नुरला मारी धनी हा तरी
वाटे पापचि मूर्तिमंत वृष रे त्वजन्म हा अंतरी ।।२।।
ऐके तू वृष शांतिने सकल हे उद्गार त्याचे असे
दावोनि स्मित मंद ज्यांत बहुधा धिक्कार भारी वसे.
बोले हिंदुसी त्या,अरे मज बहु निंदावचे ताडिले
दावि त्वस्थिति अल्पही न तुजला हे म्यां मनी ताडिले।।३।।
निंदाव्यंजक शब्द योजूनी बहु माझ्या धन्या निंदसी
कैसा वागवितो तुला तव धनी शोधूनी पाहे मनी।।४।।
ज्याते राज्य अफाट आर्यवसुधा तैसी जया अर्पिली
दोहायास सुवर्णभू सतत त्वां हस्ते ज्याला दिली
लोखंडी असताही कांचनमया केलीस यद् भू अरे
तो देई तुज काय वेतन तुझा स्वामी कधी सत्वरे।।५।।
किंवा तू म्हणशील की तव धनी आभार भारी वदे
राजे रावबहाद्दुरादिक तुला मोठ्या किताबांसी दे
ऐसे शुष्क किताब घेउनी तुवा स्वातंत्र्य संपत दिली।।६।।
दारिद्र्यासह पारतंत्र्य दुबळ्या मानेवरी लादती
तेव्हां येउनि मानवी तनुस बां तू साधिले काय ते
भूभारापरी गर्वभार अजुनु त्वचित्त का वाहते।।७।।
सोडी गर्व स्वदेशभार हरण्या यत्नांसी आधी करी
होई इशपदी सुलीन पुरवी सद्हेतुला श्रीहरी।।८।।…..
☆ रसग्रहण ☆
वृषोक्ती ही कविता सावरकरांनी १९०१ साली लिहीलेली आहे. एकदा जव्हार घाटातून बैलगाडीने प्रवास करत असताना त्यांना ती सुचली. या कवितेतली त्यांची कल्पकता आणि विचार दोन्हीही थक्क करणारे आहेत.
१९०१ सालचा काव्यकाळ हा वृत्तबद्ध ,
छंद काव्याचा होता.अलंकारिक भाषेचा होता.आजची मराठी आणि तेव्हांची मराठी यात खूप अंतर होते. त्यावेळची भाषा संस्कृतप्रचुर,नटलेली अवघड होती.पण अर्थातच रसाळ होती.वृषोक्ती या सावरकरांच्या कवितेचं रसग्रहण करताना मला ते जाणवलं.शिवाय ,ने मजसी ने …किंवा जयोस्तुते ..या काव्यरचनांची संगीतबद्ध गाणी झाली म्हणून ती आपल्यापर्यंत पोहचली पण सावरकरांच्या अशा अनेक कविता आहेत की त्यातून सावरकर एक संवेदनशील ,डोळस,कणखर व्यक्तीमत्व आपल्याला दिसतं..
वृष म्हणजे बैल आणि वृषोक्ती म्हणजे बैलाने ऊद्गारलेले…ही काव्यरचना शार्दुलविक्रीडित या वृत्तात बद्ध आहे.या वृत्तात चार चरण, १९वर्ण आणि प्रत्येक बारा वर्णानंतर यती असतो.या दृष्टीनेही ही कविता व्याकरण शुद्ध आहे.लयीत आहे म्हणून अर्थ उलगडता येतो.
या कवितेत एक काल्पनिक संवाद आहे.
बैलाचा आणि एका गर्विष्ठ माणसाचा..
तो पारतंत्र्याचा काळ होता.आणि स्वातंत्र्याचे वारे हळुहळु वाहत होते.
गाडीला जुंपलेल्या, हळुहळु घाट चढून पार दमलेल्या बैलाकडे पाहून एक स्वत:त रमलेला भारतीय माणूस त्याची निर्भस्तना करतो.मानेवर जू ठेवून धन्याची सेवा करणारा बैल म्हणून त्याचा धिक्कार करतो.
त्याचवेळी हा बैल मनोमन हसतो आणि त्याला एक चपखल, प्रखर उत्तर देतो.
“अरे! तू माझी आणि माझ्या धन्याची काय निंदा करतोस..तू कधी तुझा विचार केला आहेस…आज तुझी काय स्थिती आहे हे कळलंय् का तुला..आर्यांची तुझ्या कष्टाने उभारलेली ही सुवर्णभूमी तू परकीयांच्या हवाली केलीस.स्वत:च्याच भूमीत तू त्यांची चाकरी करतोस. त्याचं वेतन तरी तुला कधी मिळतं का वेळेवर ? त्यांनी दिलेले राजे रावबहादुर या किताबातच तू खूष आहेस…त्यांच्या भाषेतला आभार हा बेगडी शब्द तुला भुलवतो…अरे त्या बदल्यात तुझं लाखमोलाचं स्वातंत्र्य हरण केलय् त्यांनी.. याची जाणीव आहे कां तुला..
त्यापेक्षा मी बैल बरा ..धन्याच्यात आणि माझ्यात परस्पर सांमजस्य आहे..प्रेम आहे.
तू माणसाच्या जन्माला येऊन काय मिळवलंस…? परकीयांची गुलामगिरी..
धिक्कार असो तुझा…माणूसपणाचा मला जो गर्व दाखवतोस ,तो सोड..स्वभूमीला पारतंत्र्यातून सोडव…
प्रयत्नांची पराकाष्ठा कर…या उदात्त कार्यात परमेश्वरही तुला मदत करेल…..
हा या कवितेचा सारांश! एक सुंदर रुपकात्मक संदेश देणारा…ही कविता वाचताना स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सावरकर किती झपाटलेले होते हे जाणवतं.
लोकांमधे जागृती निर्माण करण्याची त्यांची तळमळ दिसून येते.अरे परकीयांचं जोखड घेऊन जगण्यार्या तुझ्यापेक्षा तो बैल बरा…
अशा शब्दात ते त्याची कानउघाडणी करतात…
सावरकरांचा कणखरपणा ,विद्रोह शब्दाशब्दात जाणवतो.ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी वीर सावरकरांनी काव्य हे माध्यम प्रभावीपणे वापरलं.त्याचा थेट परिणाम लोकांच्या मनावर नक्कीच झाला.
या काव्यात उद्विग्नतेबरोबर उपहासही जाणवतो…
शिवाय ही कविता, आता काळ ओलांडून गेली असेही वाटत नाही.ती कालातीत आहे.
जेव्हांजेव्हां माणसाच्या मनावर वैचारिक गंज चढतो तेव्हा माणूस परिस्थितीचा गुलामच बनतो.आज देश स्वतंत्र असला तरीही एक बौद्धीक पांगळेपण समाजात जाणवतं. अशावेळी सावरकरांची ही वृषोक्ती नक्कीच परिणामकारक आहे..
२६फेब्रुवारी हा सावरकर यांचा स्मृतीदिन!! त्या निमीत्ताने त्यांच्या कवितेतलं हे विचार मंथन…
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈