सौ ज्योती विलास जोशी
☆ काव्यानंद ☆ ‘वेळ झाली भर माध्यान्ह’ कवितेचं रसग्रहण ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆
ख्यातनाम कवी अनिल यांनी शब्दबद्ध केलेले आणि यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत आपल्या धारदार आणि नाविन्यपूर्ण आवाजाने उषाताई मंगेशकर यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
एरवी सकाळ आणि संध्याकाळ यांचं अप्रूप असणाऱ्या कवींनी उपेक्षिलेली अशी ही माध्यान्ह! यशवंत देवांनी हीच माध्यान टिपून या गाण्यात पेरली आहे. माध्यान हा शब्द या गीताची लय छान संभाळतो.‘प्रीतीच्या फुला’ या शब्दांवर समेची टाळी येते.
मथळ्यावरुन हे गाणे प्रियकराला उद्देशून असावे असे वाटणारे हे गीत एका कामगार स्त्रीने आपल्या लेकराला उद्देशून म्हटले आहे त्यामुळे हे प्रेम गीत आर्त गीत झाले आहे.
कवी गीतामध्ये ज्या माध्यानीचे वर्णन करतात ती ग्रीष्म ऋतूतील तळपणारी, सर्वांगाची लाहीलाही करून टाकणारी अशी आहे. सूर्य माथ्यावर आल्याने त्याची किरणे जास्ती दाहक आहेत, त्यामुळे तिचे बाळ अर्थात तिचे प्रीतीचे फुल कोमेजून जाईल अशी तिला काळजी वाटते.
उन्हाची तीव्रता दाखवण्यासाठी कवीने ‘तप्त दिशा झाल्या चारी,भाजतसे तसेच सृष्टी सारी’अशा ओळी लिहिल्या आहेत.
निसर्गापुढे मानव हतबल असतो हे तिला गृहीत आहे. म्हणून ती मुलाबरोबर परिस्थितीशी मिळतंजुळतं घ्यायचा आग्रह धरते आहे. ‘कसा तरी जीव धरी’ या ओळीतून ते लक्षात येते.
वारे उष्मा वाहतात आणि बाळाच्या नाजूक देहाला पोळतात. त्यामुळे ती बेचैन आहे.
तिची अगतिकता कवीने फार अचूक शब्दात दर्शवली आहे. तिच्याच पायात पडणारी तिची सावली तिच्या बाळाचे पांघरूण होऊ शकत नाही तसेच तिच्या डोळ्यातील अश्रू हे डोळ्यातच आटतात त्यामुळे ती बाळाची तृषा ही भागवू शकत नाही.‘दाटे दोन्ही डोळा पाणी आटेनयनातच सुकुनी’ या ओळीतून ते दाखवले आहे.
या परिस्थितीत आशेचा एकही किरण तिला दिसत नाही त्यामुळे ती चिंताक्रांत आहे या नीरभ्र आकाशाखाली तिला एक मृगजळ दिसतयं तेही फसव!
तिची खूप तगमग होते आहे पण आयुष्याशी तडजोड करायला हवी म्हणून ती आपल्या बाळाला आपल्या सोबत आनंदाचं एखादं गाणं गुणगुणायला प्रवृत्त करते ‘चल रंगू सारंगात’ या ओळी तो अर्थ देतात
सारंग हा माध्यानी गाण्याचा राग आहे म्हणून या रागाचा उल्लेख कवीने केला आहे.
माध्यान या शब्दावर उषा ताईंचा ठहराव आणि उन शब्दाची मिंड घेऊन गायकी सगळं काही कमाल!…..
कवी अनिल संगीतकार यशवंत देव आणि उषाताई या त्रिकुटाचा हे एक अजरामर गीत!
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
9822553857
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
माध्यान्हीच्या कवितेतील सौंदर्य छानपैकी उलगडून दाखवले आहेत.त्यामुळे कवितेची वत्सलतेची दुसरी बाजू समजून आली.सारंग रागाचा योग्य उल्लेखही समजला.यापुढे गाणे ऐकताना त्याची गोडी नक्कीच वाढेल.
रसग्रहण खुपच छान.मनास भावले.