सौ.ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ माझिया माहेरा जा ! … कवी राजा बढे  ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे 

माझिया माहेरा जा !

माझिया माहेरा जा,  रे पाखरा,

माझिया माहेरा जा !

 

देतें तुझ्या सोबतीला, आतुरलें माझें मन

वाट दाखवाया नीट, माझी वेडी आठवण

मायेची माउली, सांजेची साउली माझा ग भाईराजा !

 

माझ्या रे भावाची ऊंच हवेली

वहिनी माझी नवीनवेली

भोळ्या रे सांबाची भोळी गिरिजा !

 

अंगणात पारिजात, तिथं घ्याहो घ्या विसावा

दरवळे बाई गंध, चोहिंकडे गावोगावा

हळूच उतरा खाली, फुलं नाजुक मोलाची

माझ्या माय माऊलीच्या काळजाच्या कीं तोलाचीं

‘तुझी ग साळुंकी, आहे बाई सुखी’

सांगा पाखरांनो, तिचिये कानी

एवढा निरोप माझा !

 

गीत — राजा बढे

संगीत — पु. ल. देशपांडे

स्वर — ज्योत्स्ना भोळे

संकलक — ज्योत्स्ना तानवडे. पुणे

 

☆ रसग्रहण ☆ ” माझिया माहेरा जा ” कवी — राजा बढे ☆

श्री. राजा बढे हे संपादक, चित्रपट अभिनेते, गद्यलेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक असले तरी त्यांची खरी ओळख कवी आणि गीतकार अशीच होती.

अतिशय भावमधुर, नाजूक, हळव्या भावनांची अप्रतिम भावगीते लिहिणारे ते कोमलवृत्तीचे प्रतिभासंपन्न कवी होते. संस्कृत काव्य आणि उर्दू शायरीचाही त्यांचा खूप अभ्यास होता. त्यांची भावगीते प्रचंड लोकप्रिय झाली होती.

चांदणे शिंपीत जाशी, हसतेस अशी का मनी, दे मला गे चंद्रिके, त्या चित्त चोरट्याला, कशी ही लाज गडे, कळीदार कपुरी पान, कशी रे तुला भेटू, जय जय महाराष्ट्र माझा, दार उघड बये आता दार उघड अशी एकाहून एक अप्रतिम गीते लिहिणाऱ्या राजा बढे यांचे असेच एक सर्वांग सुंदर गीत म्हणजे ” माझिया माहेरा जा ! “

‘माहेर’ हा समस्त स्त्री वर्गाच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. मग स्त्रीचे भावविश्व व्यापणाऱ्या माहेर या विषयावर अतिशय संवेदनशील शब्दप्रभू राजा बढे लिहीत असतील तर काय ? एक अतिशय हळुवार, भावसंपन्न काव्य जन्माला आले, ” माझिया माहेरा जा पाखरा “

पूर्वीच्या काळी सतत माहेरी जाणे सहज शक्य व्हायचं नाही. संपर्काची तर कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. पण मन मात्र सतत माहेरच्या विचारात गुंतलेले असायचे. मग हेच विचार जात्यावरील ओव्यातून, उखाण्यातून, नाहीतर अशा एखाद्या गाण्यातून व्यक्त व्हायचे. म्हणून ते गाणाऱ्याच्या, ऐकणाराच्या दोघांच्याही अंतर्मनाला स्पर्शुन जायचे.  त्यामुळेच या गीतात एक सासुरवाशीण एका पाखराला आर्जवी स्वरात विनंती करते ती आपल्या मनाला भिडते.

आईला कुणा हाती निरोप पाठवावा हे न समजून ती पाखरापाशी आपले मन मोकळे करते. त्याच्याबरोबर निरोप पाठवायची ही कल्पनाच मनोहरी आहे. माहेरच्या विचाराने अधीर, उत्सुक बनलेले तिचे मन प्रत्येक शब्दातून प्रत्ययाला येते. आपले माहेर ओळखण्याच्या खाणाखुणा ती सांगते. सोबतीला आपले आतुरलेले मन आणि वाटाडी म्हणून आपली आठवण देते. भावाची हवेली उंच आहे. ती सापडणे अगदी सहजशक्य आहे. नवीन लग्न झालेली नवीनवेली वहिनी घरी आहे. ही वहिनी म्हणजे भोळ्या शंकराची जणू भोळी गिरिजा अशीच आहे. घराबद्दल सांगताना घरातल्यांच्या बद्दलच्या आपल्या भावना पण ती पाखराला सांगून जाते. अंगणातल्या पारिजातकाचा दरवळ म्हणजे मायेच्या माहेराची चहूकडे पसरलेली कीर्ती. माय माऊलीचे काळीज या फुलांच्या इतकेच नाजूक. किती छान उपमा आहेत ना ! ‘तुझी लेक सासरी सुखात आहे’ एवढाच निरोप आईला सांगायची तिची विनंती आहे. एवढ्या निरोपानेही दोघीजणी आपापल्या ठिकाणी बिनघोर होणार आहेत. हे अंतर्मनाचे संकेत आहेत.

‘माहेर’ या भावनेची पकड संपूर्ण गीतात कुठेच सैल होत नाही. यातूनच हे उत्तम काव्य साकार  होते. पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न संगीतकाराने या गीताला अप्रतिम चालीत बद्ध केले आहे. योग्य तिथे येणारा ताल आणि गायनाचा ठेहराव शब्दांची परिणामकारकता वाढवितो. ‘हळुच उतरा खाली’ या ओळीच्या सुरावटीने अगदी पायर्‍या खाली उतरल्या सारखे वाटते. संपूर्ण गाणे एक हळुवार अप्रतिम सुंदर अनुभूती देऊन जाते.

राजा बढे यांचे भावपूर्ण शब्द, पु.ल.देशपांडे यांची भावानुकूल स्वररचना आणि मन आकर्षित करणारी ज्योत्स्ना भोळे यांची गायन शैली यांच्यामुळे हे भावगीत प्रचंड लोकप्रिय झाले होते. या त्रिवेणी संगमा मुळे ही भावकविता आजही तितकीच मनाला जाऊन भिडते.

आज सतत माहेरी जाता येते, हाताशी संपर्काची विविध माध्यमे उपलब्ध असण्याच्या काळात या गीताची अपूर्वाई तितकी जाणवणार नाही. पण त्या काळाची कल्पना करून गीत ऐकले तर निश्चित ती अनुभूती जाणवेल.

माझे वडील हार्मोनियमवर हे गाणे वाजवत आणि आई अतिशय सुंदर ते म्हणत असे. त्यामुळे माझ्यासाठी तर ही मर्मबंधाची ठेव आहे.

कवी. राजा बढे यांच्या या सुंदर रचनेला सलाम आणि त्यांना विनम्र अभिवादन.

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments