श्री सुहास रघुनाथ पंडित

? काव्यानंद ?

☆ लिम्ब… शांता शेळके ☆ रसग्रहण – श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ लिम्ब… शांता शेळके ☆

निळ्या निळ्या आकाशाची

पार्श्वभूमी चेतोहार

भव्य वृक्ष हा लिंबाचा

शोभतसे तिच्यावर

 

किती रम्य दिसे याचा

पर्णसंभार हिरवा

पाहताच तयाकडे

लाभे मनाला गारवा

 

बलशाली याचा बुंधा

फांद्या सुदीर्घ विशाला

भय दूर घालवून

स्थैर्य देतात चित्ताला

 

उग्र जरा परी गोड

गन्ध मोहरास याच्या

कटु मधुर भावना

जणु माझ्याच मनीच्या

 

टक लावून कितीदा

बघते मी याच्याकडे

सुखदुःख अंतरीचे

सर्व करीते उघडे!

 

माझ्या नयनांची भाषा

सारी कळते यालाही

मूक भाषेत आपुल्या

मज दिलासा तो देई

 

स्नेहभाव आम्हातील

नाही कुणा कळायाचे

ज्ञात आहे आम्हांलाच

मुग्ध नाते हे आमुचे !

– शांताबाई शेळके

☆ काव्यानंद – लिम्ब….शांताबाई शेळके ☆

शांताबाई शेळके यांच्या आत्मपर कवितांपैकी एक कविता–लिम्ब  (अर्थात  कडुलिम्ब!)

निसर्गाचा आणि मानवी मनाचा संबंध हा अनादी कालापासूनचा आहे.आपल्या आनंदाच्या उत्सवात माणूस निसर्गाला विसरलेला नाही आणि आपल्या दुःखाचा भार हलका करण्यासाठी निसर्गासारखा दुसरा मित्र नाही.’आपुलाच वाद आपणाशी’ हा सुद्धा निसर्गाच्या सहवासातच होतो.त्यामुळे शांताबाईंसारख्या कवयित्रीने निसर्गाशी साधलेली जवळीक आणि संवाद समजून घेण्यासारखा आहे.

‘लिम्ब’ ही  कविता वाचल्यावर प्रथमदर्शनी ती  निसर्ग कविता वाटते.असे वाटण्याचे कारण म्हणजे कवितेचे शिर्षक आणि पहिली तीन कडवी.पहिल्या तीन कडव्यात बाईंनी  लिंबाच्या झाडाचे फक्त वर्णन केले आहे.बलशाली बुंधा असलेला,विशाल फांद्या असलेला,त्याच्या पर्णसंभारामुळे मनाला गारवा देणारा,आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर पसरलेला हा भव्य वृक्ष मन आकर्षित करून घेणारा असा आहे.कुठे दिसला असेल हा वृक्ष त्यांना ? एखाद्या माळावर,प्रवासात,एखाद्या खेड्यात किंवा कदाचित अगदी घराजवळही.पण त्यांनी केलेले वर्णन हे इतके बोलके आहे की तो आपल्याला मात्र पुस्तकाच्या पानातून सहज भेटून जातो.पण कविता इथे संपत नाही तर इथे सुरू होते.कारण कुठेही सहजासहजी दिसणारा हा वृक्ष कवयित्रीचा सखा बनून जातो.

पुढच्या तीन कडव्यात त्या काय म्हणतात पहा.कडुलिम्बाच्या मोहोराला येणारा गंध गोडसर उग्र असा असतो.आपल्या मनातील भावनाही अशाच नाहीत का? थोड्या गोड तर थोड्या गोड.त्यामुळेच त्यांची आणि लिंबाची  मैत्री होते.आत्ममग्न अवस्थेत एकटक त्याच्याकडे बघत असताना,नकळतपणे आपल्या मनातील सुखदुःख  त्या वृक्षासमोर उघडे करत असतात.जितक्या नकळतपणे मैत्रिणिशी बोलावे तितक्या सहजपणे त्या वृक्षाशी मनातल्या मनात बोलत असतात.या एकटक बघण्यातूनच त्या वृक्षालाही त्यांच्या डोळ्यांची भाषा समजू लागली आहे आणि तोही आपल्या मूक भाषेतून त्यांच्याशी समजुतिचा संवाद साधत आहे.निसर्गाशी एकरूप होणं याशिवाय वेगळं काय असतं ?त्यामुळे ही मैत्री इतकी घट्ट झाली आहे की त्यांच्यातले मुग्ध नाते हे शब्दांच्या पलिकडले आहे आणि म्हणूनच ते इतरांना समजण्यासारखे नाही.

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे तसा तो निसर्गप्रियही आहे.आपण निसर्गाशी जितकी जवळीक साधावी तितका तो आपलासा होऊन जातो.मग तोच आपला सुखदुःखातील भागीदार बनतो.आपली विमनस्क अवस्था दूर करायला मदत करतो.कवयित्रीच्या आत्ममग्नतेमुळे रसिकांना ,साध्या सोप्या भाषेतील पण उत्तम कविता वाचायला मिळाली आहे.लिम्बासारखीच गारवा देणारी आणि मन सदैव हिरवे गार

ठेवणारी!

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments