सुश्री नीलिमा खरे
अल्प परिचय
बॅंकेतून रिटायर झाल्यावर काही वर्षे एका खाजगी कंपनीत काम केले.
कामाच्या व्यस्ततेमुळे मागे पडलेली वाचनाची आवड परत सुरू केली. कविता लेखनाची सुरुवात झाली. कवितेचे रसग्रहण हा प्रांत ही आवडू लागला आहे.
काव्यानंद
☆ वचन देई मला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆
डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या निशिगंध या काव्यसंग्रहात कवीने प्रेम विषयक विविध भाव वेगवेगळ्या कवितांतून वाचकांसमोर उलगडले आहेत. उदात्त ,शाश्वत ,समर्पित प्रेम तर कधी विरहाग्नीत होरपळणारे तनमन ,प्रतारणेतून अनुभवाला येणारे दुःख ,कधी प्रेमाच्या अतूटपणाबद्दल असलेला गाढ विश्वास आणि त्या विश्वासातून एकमेकांकडे मागितलेले वचन अशा विविध प्रेमभावना अत्यंत तरल पणे व तितक्याच बारकाव्याने आणि समर्थपणे काव्य रसिकांसमोर प्रस्तुत केल्या आहेत. या संग्रहातील वचन देई मला ही कविता अशीच प्रेमात गुंतलेल्या, रमलेल्या, प्रेमावर विश्वास असलेल्या प्रियकराचे भावविश्व आपल्यासमोर साकारते.
साधारणतः प्रियकर प्रेयसीला विसरतो अशी मनोधारणा असते.या कवितेचे वैशिष्ट्य असे की येथे प्रेयसी विसरेल अशी शंका प्रियकराच्या मनात आहे.रुढ मनोभावनेला छेद देणारी ही कविता लक्षवेधी ठरते.
कवितेतील प्रेयसी जर कवितेतील प्रियकराला विसरली तर त्याच्या स्मृतीत तिने एक तरी अश्रू ढाळावा एवढी माफक अपेक्षा करणारा प्रियकर कवीने काव्य रसिकांसमोर शब्दांतून उभा केला आहे .
☆ वचन देई मला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆
विसरलीस जर कधी जीवनी एक वचन तू देइ मला
कधी झाकलो स्मृतीत तुझिया अश्रू एक तू ढाळ भला ।।ध्रु।।
प्रीत तरल ना देहवासना ही आत्म्याची साद तुला
एकरूप मी तव हृदयाशी क्षण न साहवे द्वैत मला
पवित्र असता प्रेम चिरंतन विसरणार मी कसे तुला
कधी झाकलो स्मृतीत तुझिया अश्रू एक तू ढाळ भला ।।१।।
जगायचे ते तुला आठवत मरणही यावे तुज साठी
कधी न सुटाव्या शाश्वत अपुल्या प्रेमाच्या रेशिमगाठी
मृत्यूनंतर येउ परतुनि प्रेमपूर्तीची आंस मला
कधी झाकलो स्मृतीत तुझिया अश्रू एक तू ढाळ भला ।।२।।
डॉ निशिकांत श्रोत्री
निशिगंध – रसग्रहण
प्रेम विश्वात रममाण असणाऱ्या प्रियकराच्या मनात उगीच शंका येते आणि तो प्रेयसीला म्हणतो की जर कधी जीवनात तू मला विसरलीस तरी एक वचन मात्र तू मला दे .ती विसरणार नाही याची खात्री विसरलीस जर या शब्दातून व्यक्त होते. तसेच पुढे तो म्हणतो की तू विसरलीस आणि जर कधी मी तुझ्या स्मृतीत डोकावलो म्हणजे त्याचा आठव जरी तिच्या मनात आला तर एक अश्रू मात्र तू ढाळ. भला हा शब्द अश्रूशी निगडीत करताना तिच्या मनात त्याच्याविषयी कुठलाही गैरभाव ,गैरसमज नसावा हे सूचित केले आहे. विरह किंवा वियोग जर का झाला तर तो केवळ परिस्थितीमुळे होईल त्याच्या वर्तनाने नाही असा विश्वास या कवितेतून आपल्यासमोर व्यक्त केला गेला आहे .विसरली तरी प्रेयसी कडून वचन मागणारा, कधी तरी तिच्या स्मृतीत डोकावण्याची ,झाकण्याची मनोमन खात्री बाळगणारा हा प्रियकर मनाला मोहवून जातो.
ध्रुवपदामध्ये विसरलीस जर कधी ,तरी एक वचन दे, हा विरोधाभास मनाला भावतो.तसेच अश्रूला भला हे अत्यंत वेगळे विशेषण वापरले आहे.प्रियकराच्या सात्विक प्रेमाची साक्ष पटवणारा हा समर्पक शब्द कवितेतील आशयाला पुष्टी देतो.
पहिल्या कडव्यात तो म्हणतो माझी प्रीत ही तरल निष्कलंक आहे .त्या भावनेत देहवासना,कामवासना नाही. तर ही आत्म्याची आत्म्याला साद आहे .तो खात्रीपूर्वक म्हणतो की तो तिच्या हृदयाशी एकरूप झाला आहे. ही समरसता, हे तादात्म्य आहे ते मनोमन झालेले आहे. त्यात अंतर नाही. त्यातले बंधन अनाठायी नाही.त्यामुळे कुठलेही ,कसलेही द्वैत अगदी क्षणा पुरते ही त्याला सहन होणार नाही.त्यांच्यातले प्रेम हे पवित्र तसेच चिरंतन आहे याची ग्वाही त्याच्या मनाला आहे त्यामुळे तो तिला कधीच विसरणार नाही हे ही तो स्पष्ट करतो. आणि असे असूनही जर कधी ती विसरली तर तो तिच्याकडून एकच वचन मागतो त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक भला अश्रू तिने ढाळावा.
देह व आत्मा यांचा उल्लेख प्रीतिला आध्यात्मिक उंची देतो.द्वैत व अद्वैत यांचा सुस्पष्ट व सुसंस्कृत विचार प्रेमाचा अर्थपूर्ण आविष्कार घडवतो.जे पवित्र ते चिरंतन हा साक्षात्कार प्रीतीच्या भावनेला पटणारा. एकरूप व द्वैत या विरोधाभासातून प्रीतिचे खरे स्वरूप प्रकटते. तुला, मला, भला अशा यमक सिध्दीने कवितेला सुंदर गेयता लाभली आहे.त्यामुळे कवितेतील भावार्थ सहजपणे लक्षात येतो.कवितेशी वाचकांची समरसता प्रस्थापित होते.
दुसऱ्या कडव्यात प्रेयसीच्या केवळ एका अश्रूची माफक अपेक्षा ठेवणारा तो म्हणतो की जे जगायचं ते तिला आठवत जगायचं आणि जर मरण आलं तर तेही तिच्यासाठी यावं असं त्याला वाटतं. सर्वस्व ,आपले जीवन तिच्यावर ओवाळून टाकण्याची त्याची मानसिक तयारी आहे. त्याच वेळी शाश्वत असलेल्या प्रेमाच्या रेशीमगाठी कधी न सुटाव्यात अशी योग्य व रास्त अपेक्षा तो बाळगून आहे .त्यांच्या प्रेमावर त्याची अढळ श्रद्धा आहे. त्यामुळे त्याला खात्री आहे जर कधी मृत्यू आला तर परत येऊन म्हणजे जणू काही पुनर्जन्म घेऊन आपण या इहलोकी परतू .कारण त्याला या प्रेमपूर्तीची आस आहे.स्वतः चे प्रेयसी वरील पवित्र,शाश्वत,निरंतर प्रेम याची कल्पना,जाण तिला देता देता प्राक्तनी कदाचित येईल अशा विरहाचा विचार त्याला सर्वथैव बैचेन करतो. त्यामुळे व्यथित तो प्रेयसीच्या प्रेमाविषयी खात्री असूनही साशंकता व्यक्त करतो.पण ती व्यक्त करताना ही त्यात तिच्या शाश्वत प्रेमाचा अर्थपूर्ण उल्लेख करतो.एकमेकांच्या सान्निध्यात जगत असताना चिरंतन प्रेमभावनेची जाण असूनही शाश्वत मरणाचे भान त्याला आहे.मृत्युने वियोग घडला तरी पुनर्जन्मी पुन्हा भेट होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.तुजसाठी, रेशिमगाठी हे यमक साधले आहे.रेशिमगाठी शब्द वापरून प्रीतिची मुलायमता अधोरेखित केली आहे.
संपूर्ण कवितेत प्रीत भावनेला सुयोग्य पणे व्यक्त करताना समर्पक व सुलभ शब्द योजना कवीने केली आहे.त्यामुळे प्रीतिचा तरल, पवित्र शाश्वत भाव मनाला स्पर्शून जातो.भावनेचा खरेपणा व त्यातली आर्तता मनाला भिडते.साहित्यिक अलंकारांचा अट्टाहास न ठेवता भावनेचा प्रांजळ पणा जपण्याचे भान कवीने ठेवले आहे. कवीची साहित्यविषयक, भाषाविषयक व काव्य विषयक सजगता यातून प्रतीत होते.साधी पण भावुकतेत न्हालेली ही कविता सर्वांना आवडेल अशीच आहे.
© सुश्री नीलिमा खरे
३-१०-२०२२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
Very Proud of you Dear Nilima….सुरेख रसग्रहण
प्रेम किती निरालस असू शकते हे रसग्रहणा तून जास्ती लक्षात येते. सुंदर साधी कविता आणि तिचे अध्यात्मिक अंग लक्षात आणून देणारे समर्पक असे हे रसग्रहण..