डॉ निशिकांत श्रोत्री

? काव्यानंद ?

☆ दावा परमार्थ… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – श्री श्रीकांत पुंडलिक ☆

☆ दावा परमार्थ… डॉ निशिकांत श्रोत्री ☆

तुमच्या पायी आलो मजला दावा परमार्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ   ||ध्रु||

 

जीवन सारे व्यतीत केले मानव सेवेत

नव्हती कसली जाण काय आहे अध्यात्म

परउपकार न मजला ठावे अथवा ना स्वार्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ||१||

 

दारी आले त्यांच्या ठायी तुम्हांस देखियले

नाही आले त्यांच्यातुनिया तुम्हांस जाणीले

तुम्हाविना ना काहीच भासे जीवनात अर्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ||२||

 

जाणीव आता पैलतिराची शिरी असो हात

नाही कसली आंस असो द्या तुमचीच साथ

कृपा असावी उजळावे हो जीवन न हो व्यर्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ॥३॥

©️ डॉ. निशिकांत श्रोत्री, ९८९०११७७५४

☆ दावा परमार्थ – डाॅ. निशिकान्त श्रोत्री यांच्या कवितेचा रसास्वाद – श्री श्रीकांत पुंडलिक ☆

कविवर्य डॉ निशिकांत यांची ही एक भावपूर्ण कविता आहे. ही कविता म्हणजे कविवर्यानी आपल्या आयुष्याकडे वळून बघताना केलेले आत्मपरीक्षण आहे.जणू काही आयुष्याचा लेखाजोखाच मांडला आहे.

माणसाचं जीवनच प्रश्नमय आहे. जन्मल्याबरोबर माणसाला प्रश्न पडतो, “कोsहं?” या प्रश्नापासून सुरू झालेलं आयुष्य ‘”सोहं” या उत्तराप्रत येईपर्यंत अनेक प्रश्नांनी भारलेलं असतं. आणि माणूस त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. या जीवन प्रवासात पुष्कळ वेळा आत्मकेंद्री बनत जातो आणि तो फक्त स्वतःपुरता जगायला लागतो. मी, माझं कुटुंब, माझा उदरनिर्वाह, माझी समृद्धी याचा विचार करताना स्वार्थ काय परमार्थ काय या संबंधी तो विचार देखील करत नाही. पण जो ज्ञानी मनुष्य असतो तो मात्र या सर्व क्रियाकलापापासून अलिप्त होत स्वार्थ, परमार्थ, जीवन याचा, साकल्याने विचार करितो. प्रस्तुत  कविता म्हणजे याच विचाराचं भावपूर्ण प्रकटीकरण आहे.

कविवर्य आपल्या कवितेच्या पहिल्या कडव्यात अतिशय नम्रपणे, त्याच्या जीवनाचं अधिष्ठान असलेल्या सद्गुरू स्वामी समर्थाच्या चरणी लीन होतात आणि त्यांना आपल्या आयुष्यात केलेल्या जीवन प्रवासाची माहिती देतात.

कविवर्य स्वतः आयुःशल्य विज्ञान  स्नातक आहेत. त्यांना शारीरिक व्याधी आणि त्यातून सुटकेचा मार्ग माहिती आहे. या ज्ञानाच्या आधारे त्यांनी अनेकांना व्याधीमुक्त केलेलं आहे. त्यात त्यानी कुठलाही स्वार्थ जोपासला नाही. त्यामुळे स्वतच्याही नकळत कविवर्य अध्यात्मच जगले आहेत.

दुसऱ्या  कडव्यामध्ये कवींनी आपल्या कामागची प्रेरणा स्पष्ट केली आहे. कवींचा व्यवसाय जरी वैद्यकीचा असला तरी त्यामागची प्रेरणा मात्र, “शिव भावे जीव सेवा” हीच होती.  जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये कवींनी आपल्या आराध्य देवतेलाच पाहिले. व्यवसाय आणि जीवनातील यशाचं श्रेय मात्र विनम्रपणे कवी  स्वामी समर्थाना देतात.

मी कर्ता म्हणशी तेणे तू कष्टी होसी।

परा कर्ता म्हणस। तेणे तू पावसी। यश कीर्ती प्रताप॥”

ही समर्थ रासमदास स्वामी याची उक्ती कवी आचरणात आणतात. स्वामी समर्थाविना जीवन निरर्थक आहे हीच भावना या कडव्यात कवींनी मांडली आहे.

तिसऱ्या कडव्यात मात्र कविवर्याची भावना मात्र व्याकुळ झाली आहे. “संध्या छाया भिवविती हृदया” अशी भावना या कडव्यातून व्यक्त होते आहे. व्यासाच्या या वळणावर फक्त स्वामी समर्थाची साथ असावी आणि जीवन उजळून निघावे हीच भावना प्रकट होते आहे. आयुष्य हेच स्वामी समर्थाची पूजा, आणि आता उत्तरपूजा सुरू झाली आहे

न्यूनं संपुर्णतांयाती सद्यो वंदेतमच्युतं

ही कविता वाचत असताना शब्दांचा साधेपणा, प्रासादिकता, यामुळे कवितेमध्ये अंगभूत नादमाधुर्य निर्माण झाले आहे. कवितेतील आर्तता थेट  जगद्गुरू संत तुकारामाच्या, “तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता” या भावनेशी नाते सांगणारी आहे.

© श्री श्रीकांत पुंडलिक

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
भालचंद्र चितळे

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
आजवरचे सगळे श्री स्वामींच्या चरणी अर्पण केले. निस्वार्थ भावनेने.
जे आले त्यांच्यात स्वामी पाहिले आणि जे आले नाही त्यांच्यातून स्वामी जाणण्याची दृष्टी ठेवली. आता उरले काय? अवघे स्वामीमय झाले.
स्वामींवरचीची ही डॉ. श्रोत्री यांची प्रार्थना पर कविता आणि श्री. श्रीकांत पुंडलिक यांचा रसास्वाद, दोन्ही स्वामीकृपे सारखेच मधुर आहे.