सौ. अमृता देशपांडे

 ☆ काव्यानंद ☆ ‘दिवनाली’ कवितेचं रसग्रहण ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

रसग्रहण:

व्यक्तीच्या स्वभावाच्या, आचारविचारांच्या साधेपणाचे उत्कृष्ट प्रतीक जर दाखवायचे तर ते म्हणजे, कवयित्री इंदिरा संत. खरंतर त्यांचा फोटो बघितल्यावर जाणवतं की,  यांचं आडनाव फक्त आणि फक्त ” संत” च योग्य आहे. त्यांच्या कविता म्हणजे अतिशय साध्या सोप्या शब्दात गुंफलेला उत्कट भावनांचा रम्य आविष्कार.

इंदिरा संत आणि त्यांचे पती, दोघेही कवी मनाचे .

आयुष्यात अवेळी अचानक कोसळलेल्या पतिनिधनाच्या आघातामुळे त्यांची कविता नेहमीच वेदना, विरह, स्मृति यांतून गुंतून राहिली. आणिे  स्वाभाविक होते.

पण ” दिवनाली ” ही कविता बहुतेक त्यांच्या संसाराच्या सुरवातीच्या काळातली असावी.

नव्या नवतीच्या विवाहोत्तर काळात सगळं जग त्याच्याच ठिकाणी एकवटलेलं असतं.केंद्र बिंदू तोच.त्यानं सतत जवळ असावं, प्रेमानं त्याच्याकडे काही मागावं, आणि त्यानंही ते भरभरून द्यावं , ही स्त्री सुलभ चिरंतन भावना.

शब्द इतके साधे, सोपे की वाचू लागताच अर्थ उमलू लागतो. वाचक इतका समरस होतो की ही कविता आपल्यासाठीच आहे असे वाटू लागते. तीच तल्लीनतेची तद्रूपतेची भावना व्यक्त करणारी कविता “दिवनाली”.

तू नेहमी जवळ असावास किंवा तू जवळ असल्याचा भास व्हावा म्हणून तुझ्याकडे एकच फूल मागितले,  म्हणजे त्याच्या सुगंधी दरवळाने तू जवळ असल्यासारखे वाटेल, तर तू…….माझ्या अंगणातले हिरवेगार वृक्षच तिन्ही त्रिकाळ बहरत ठेवलेस !

कानात कायम तुझा आवाज गुंजत रहावा म्हणून मी एक शब्द हवा म्हटले , तर तू……समुद्राच्या लाटांची फेसाळ थेंबांची कर्णफुले माझ्या कानांवर गुंफलीस !

तुझा स्पर्श,  तुझा रोमांचित करणारा स्पर्श मला हवा म्हणून मी मान जरा उंचावून धरली तुझ्यासमोर,  तर तू……स्पर्शाने अशी लाली पसरवलीस की कपाळावर ज्योतशी उमटली.

अशा तुझ्याकडून भरभरून मिळालेल्या सुखाने मी इतकी सुखावले, आणि भारावून गेले की नखशिखांत उजळून निघाले. जणू काही निरंतर तेवणारी दिवनाली झाले. प्रकाशमयी समई झाले.

तिनं इतकंसं मागावं, त्यानं भरभरून द्यावं. ह्या सगळ्या सुखात न्हाऊन, प्रेमरंगात रंगून ती ज्योती प्रमाणेच तेजाळली. स्वतःच ज्योत झाली. ज्योतीची दिवनाली झाली.

पती-पत्नीच्या प्रेमाचं इतकं उत्कट, इतकं ऐश्वर्यी रूप दैवी अलौकिक आहे.

नवीन लग्न झालेल्या मुलीच्या प्रेमभावना इतक्या साध्या सोप्या शब्दात पण अतिशय समर्पकतेने व्यक्त करणं हेच इंदिरा संतांच्या कवितांचे वैशिष्ट्य आहे. अतिशय स्वाभाविक,  जे हवे ते मागून घ्यायचं, आणि त्यानं उधळलेलं सुख तन मन भरून आणि भारून व्यक्त व्हायचं,  हा कवितेचा साधा सरळ अर्थ. शब्द कसे? तर थेट इच्छा प्रकट करणारे.लपवाछपवी नाही कि लाजरेबुजरेपणा नाही. पण तरीही कुठेच उथळपणा नाही.  उच्छृंखलता नाही. जे व्यक्त करायचे ते अगदी हळुवारपणे, ओंजळीतून फुले हलकेच ठेवावीत तसे.

कवयित्रीला जे सांगायचं आहे, जे मनातले भाव पोचवायचे आहेत ते अगदी अलवारपणे ह्रुदयापर्यंत पोचतात, कुठेही तोल न ढळता.

कविता वाचताना सुरवातीपासून एक अव्यक्तअर्थ डोकावत रहातो. देवघरातील देव आणि तेवत असणारी समई यांचं अजोड नातं आहे.  समईचं प्रकाशणं हे देवाचं देणं, आणि त्या ज्योतीप्रकाशात देवांचं तेज उजळून दिसतं, हा तन्मयतेचा भाव  आहेच. स्त्रीच्या स्थानी एका समईची कल्पना केली तर, उत्कटता तीच आहे. समईचं  निरंतर तेवणं आणि ईश्वराने भरभरून वरदान देणं.  दिवनालीच्या ज्योतीची तेवत राहणारी, ईश्वरी प्रचीतीच्या अपरूपात रंगून नित्य तेवणारी दीपशिखा,  तीच दिवनाली.

असा दुहेरी गोफ उलगडून दाखवणारी आणि मनात कायम रुंजी घालणारी कविता  ” दिवनाली “ .

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments