सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆  हाचि नेम आता…संत तुकाराम महाराज ☆ रसग्रहण – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

काव्यानंद

☆तुकाराम गाथा – अभंग ☆

हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥

घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥

बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥

रसग्रहण 

मला जाणवलेला व उमगलेला अर्थ…….

मनाचा निर्धार आणि संपूर्ण श्रद्धा यांचा अर्थ प्रकट करणारा हा अभंग आहे.

आता हाच माझा नेम (निश्चय केला, व्रत घेतले  किंवा मी ठरवले ) आहे.गोविंदा जवळ आहे,तिथून माघारी फिरायचे नाही.

संसाराचा मोह धरायचा नाही.

त्या गोविंदाच्या घरात मोठ्या प्रयासाने ( जप,तप,नामस्मरण, सदाचारी वर्तणूक, भूतदया इ.मुळे) आले आहे.व माझ्या वर्तणुकी मुळे पट्टराणी झाले आहे. त्या सावळ्या परब्रह्माला मनापासून वरले आहे.आता तेथून माघारी फिरणे नाही.

त्या बलवान म्हणजे सर्वव्यापी,सर्वांना जीवदान देणारा,चिंता हरणारा व षडरिपूं पासून दूर नेणारा असा जो गोविंद आहे त्याचा सहवास लाभला आहे.म्हणून आता कोणतेही भय,चिंता राहिली नाही.

यात गोविंद हा शब्द अचूक वापरला आहे. गो म्हणजे गायी पण त्याचा अजून एक इंद्रिये असाही अर्थ आहे.गोविंद म्हणजे इंद्रियांचा व्यवहार जाणतो व त्याचे नियमन  ( इंद्रिय विषयी विचारांचे उन्नयन ) करतो.

“घररिघी झाले” या चरणात “बळे” म्हणजे बळजबरीने असा अर्थ नसून बळे म्हणजे जो सर्वशक्तिमान आहे त्याची पट्टराणी असा आहे.

या वर विचार केल्यावर असे लक्षात आले की ते जीव व आत्मा यांच्या संदर्भात बोलत आहेत.जो जीव आजवर द्वैताच्या भावनेने वेगळा रहात होता,तोच जीव आता आत्मस्वरूपाच्या आनंदाने सर्वशक्तिमान परब्रह्माशी एकरूप झाला आहे. व संपूर्ण स्वयंभू झाला आहे.

अशा सर्वसाक्षी सर्वव्यापी गोविंदा पासून दूर जायचे नाही. इतर कोणत्याच मोहपाशात परतायचे नाही.परत षडरिपूंच्या आहारी जायचे नाही.आता कोणतीच भय,चिंता राहीली नाही.असे तुकाराम महाराज म्हणतात.

हा अर्थ व्यक्ती परत्वे भिन्न असू शकतो.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments