सुश्री शोभना आगाशे
काव्यानंद
☆ अखिल हिंदु विजयध्वज गीत… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆
☆ अखिल हिंदु विजयध्वज गीत…. स्व. वि. दा. सावरकर ☆
अखिल – हिंदु – विजय – ध्वज हा उभवुया पुन्हा ॥ध्रु॥
या ध्वजासची त्या काली । रोविती पराक्रमशाली
रामचंद्र लंकेवरती । वधुनि रावणा ॥१॥
करित जैं सिकंदर स्वारी । चंद्रगुप्त ग्रीकां मारी
हिंदुकुश – शिखरी चढला । जिंकुनि रणा ॥२॥
रक्षणी ध्वजाला ह्याची । शालीवाहनाने साची
उडविली शकांची शकले । समरि त्या क्षणा ॥३॥
हाणिले हुसकिता जेथे । हूणांसि विक्रमादित्ये
हाच घुमवि मंदसरच्या । त्या रणांगणा ॥४॥
जइं जइं हिंदू सम्राटे । अश्वमेध केले मोठे
करित पुढती गेला हाचि । विजय घोषणा ॥५॥
उगवुनि सूड हिंदूंचा । मद मर्दुनि मुस्लीमांचा
शिवराय रायगडी करिती । वीरपूजना ॥६॥
ध्वज हाच धरुनि दिल्लीला । वीरबाहु भाऊ गेला
मुसलमीन तख्ता फोडी । हाणुनि घणा॥७॥
पुढती नेम कांही ढळला । ध्वज जरी करातुन गळला
उचलुया पुनरपि प्राणा । लावुनि पणा ॥८॥
(आंग्ल दैत्य तोचि आला । सिंधुतूनि घालुनि घाला
बुडविला सिंधुतचि त्याही । करुनि कंदना ॥८॥)
– कवी – वि. दा. सावरकर
☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆
भारत पारतंत्र्यात असताना १९३८ साली सावरकरांनी ही कविता लिहिली होती. त्यावेळी त्या कवितेत पहिली आठ कडवी होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५१ साली या कवितेतलं आठवं कडवं बदलून, त्याजागी सावरकरांनी वर कंसात दिलेलं आठवं कडवं जोडलं.
या देशातल्या पौराणिक व ऐतिहासिक वीरांनी परकीय आक्रमणाला कसं तोंड दिलं, शत्रूला पळवून लावलं आणि हिंदूंचा विजयध्वज कसा फडकत ठेवला याचं वीरश्रीपूर्ण वर्णन या कवितेत केलेलं आहे. कवितेतले जोशपूर्ण शब्द, काळजाला भिडणारे प्रसंग, प्रत्येक कडव्याच्या शेवटी येणारे, यमक साधणारे खणखणीत शब्द, भारतीयांची छाती अभिमानाने फुगविणारे इतिहासातले दाखले देऊन हिंदुंच्या वीरश्रीला साद घालणारी, त्यांचा आत्मविश्वास वाढविणारी विजयाची वर्णने अपेक्षित परिणाम नक्कीच साधतात, रोमांचित करतात. सावरकर या कवितेत, प्रभू रामचंद्रांनी केलेला रावणवध, सम्राट चंद्रगुप्ताने सिकंदराचा पराभव करून त्याचा सेनापती सेल्युकसला, त्याच्या ग्रीक सैन्यासह हिंदुकुश* पर्वतापर्यंत घ्यायला लावलेली माघार, शक व हूणांचा* शालिवाहन व विक्रमादित्य* यांनी केलेला पराभव, मुस्लीम पातशाही नेस्तनाबूत करण्यासाठी शिवाजी महाराजांनी उभारलेला स्वातंत्र्यलढा व मिळवलेले विजय, सदाशिवभाऊ पेशव्यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेची मोहिम फत्ते केल्यानंतर उत्तरेच्या मोहिमेत २ ऑगस्ट १७६० रोजी मराठ्यांनी जिंकलेलं दिल्लीचं तख्त* या व अशा ओजस्वी इतिहासाची हिंदु बांधवांना आठवण करून देऊन, इंग्रजी सत्तेविरुद्ध लढण्यासाठी व हिंदू विजयध्वज फडकविण्यासाठी कवी या कवितेद्वारे हिंदूंना उद्युक्त करीत आहेत.
*हिंदुकुश पर्वत = हिमालयीन पर्वत रांगांचा अफगाणिस्तान पासून ताजिकिस्तान पर्यंत पसरलेला पश्चिमेकडील भाग.
*शक व हूण = पूर्व/मध्य आशियातील रानटी, लुटारू टोळ्या
*शालिवाहन = गौतमीपुत्र सातवाहन/ सालाहन/ सालीहन ( इ स ७२ ते ९५) म्हणजेच शकारी किंवा शककर्ता शालीवाहन. शकांवरील विजयाचे (इ.स.७८) स्मरण म्हणूनच त्याने चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारे शालिवाहन शक १९४५ वर्षांपूर्वी सुरू केले. हे युद्ध आताच्या नाशिक परिसरात झालं, कारण नाशिकला लागूनच गुजरात व राजस्थान इथं शक राजा नहापानने आपली सत्ता प्रस्थापित केली होती.. याविषयीचा शिलालेख नाशिक येथे उपलब्ध आहे.
*विक्रमादित्य = दुसर्या चंद्गुप्ताचा नातू स्कंदगुप्त. याने देखिल आपल्या आजोबांप्रमाणे विक्रमादित्य हे बिरुद धारण केले होते.
*मंदसर(मंदोसर/मंदसौर)= मेवाड व माळवा यांच्या बाॅर्डरवरील शहर. येथे अफूची शेती होते. हे रावणपत्नी मंदोदरीचं माहेर मानलं जातं. येथे झालेल्या युद्धात विक्रमादित्याने हूणांचा दारूण पराभव केला. त्यानंतर ४०/५० वर्षे हूणांनी भारतावर आक्रमण केले नाही.
*दोन ऑगस्ट १७६० रोजी दिल्ली जिंकल्यानंतर दोन महिन्यांनी मराठ्यांनी १० ऑक्टोबर रोजी शाह आलम या मुघल वंशजाला दिल्लीच्या गादीवर बसवलं.
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈