सुश्री शोभना आगाशे
काव्यानंद
☆ हिंदुजातीचा श्री पतितपावन धावा… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆
पूर्वपिठीका –
इंग्रज सरकारला विनंती करून, त्यांच्या अटी मान्य करून अंदमानातून मुख्य हिंदुस्थानात येण्यामागचा सावरकरांचा मुख्य उद्देश राष्ट्रसेवा हाच होता. त्यांना माहित होतं की अंदमानात जेलमधून राहून आपण देशासाठी कांहीच करू शकणार नाही. तेच हिंदुस्थानच्या मुख्य भूमीवरून आपण अप्रत्यक्षरित्या का होईना स्वातंत्र्यचळवळीचा भाग होऊ शकू. निदान या कार्यासाठी लोकांना प्रेरित करू शकू. त्यासाठी अखिलहिंदू एकतेचं महत्व लोकांच्या गळी उतरवून जातीपातीमुळे विखुरलेला हिंदुसमाज एकसंध व्हावा यासाठी प्रयत्न करू. परकियांच्या ‘divide and rule’ या धोरणाला त्यावाचून खीळ बसणार नाही.
अखेर अंदमानातून आणून रत्नागिरी इथे सरकारने त्यांना स्थानबद्धतेत ठेवल्यानंतर चार महिन्यातच त्यांनी हिंदूसभेची स्थापना केली व आपले स्थानबद्धतेतील पहिले भाषण दिले, अस्पृश्यता निर्मूलन कार्याची मुहूर्तमेढ रोवली. सकलहिंदुएकतेचं आपलं ध्येय त्यानी सात वर्षांतच गाठलं व रत्नागिरी इथं श्रीपतीतपावन मंदीर उभारलं, जिथं सर्व जातींच्या हिंदूंना मुक्त प्रवेश होता; इतकंच नव्हे तर गाभाऱ्यात जाऊन पूजापाठ करण्याची, वेदमंत्रोच्चाराची मुभा होती. हिंदुएकता व अस्पृशता निर्मूलनावर त्यांनी अनेक कविता रचल्या व त्या विविध संघटनांद्वारे, विविध ठिकाणी, विविध समारंभातून जाहीर रित्या गायल्या गेल्या अशा प्रकारे समाज प्रबोधन करून त्यांनी ही सामाजिक चळवळ पुढे नेली. थोर समाजसुधारक कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, आपल्या एका भाषणात म्हणाले होते, “मी आयुष्यभर अस्पृश्यता निर्मूलनासाठी काम केलं पण अवघ्या सात वर्षांतच या निधड्या छातीच्या वीराने जी सामाजिक क्रांती घडवली आहे ती पाहून मी इतका प्रसन्न झालो आहे की देवाने माझं उरलेलं आयुष्य त्यांनाच द्यावं.”
सावरकरांच्या प्रेरणेतूनच शेठ भागोजी कीर यांनी रत्नागिरी येथे साकारलेल्या पतितपावन मंदिरात देव प्रतिष्ठेचा अभूतपूर्व समारंभ २२ फेब्रुवारी १९३१ रोजी झाला तेंव्हा सर्व जाती, उपजातीचे पाच हजारांहून अधिक हिंदू जमले होते. अनेक सामाजिक व राजकीय नेते, संतमहंत तसेच वेदान्ताचे गाढे अभ्यासक, ‘महाभागवत’ डाॅ शंकराचार्य कुर्तकोटी हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्याप्रसंगी सर्व जाती, उपजातीच्या वीस हिंदु युवतींनी सावरकरांचे हे गीत एक कंठाने गायले.
☆ हिंदुजातीचा श्री पतितपावन धावा... स्व. वि. दा. सावरकर ☆
उद्धरिसी गा हिंदुजातिसी केंव्हा
हे हिंदुजातिच्या देवा ॥ धृ. ॥
आब्राम्हण चंडाल पतितची आम्ही
तुम्ही पतितपावन स्वामी
निजशीर्ष विटाळेल म्हणुनि कापाया
चुकलो न आपुल्या पाया
आणि पायांनी राखु शुद्धता साची
छाटिले पावलांनाची
ऐकू न पडो आपुलिया कानाते
मुख कथी न म्हणुनि ज्ञानाते
निज सव्यकरे वामकरा जिंकाया
विक्रियली शत्रुला काया
करु, बंधूसी बंद करु दारा, जे
चोर ते घराचे राजे
हे पाप भयंकर झाले । रे
पेरिले फळाला आले। रे
हृदि असह सलते ते भाले । रे
उद्धार अता! मृत्युदंड की दे वा
हे हिंदुजातिच्या देवा! ॥१॥
अनुताप परी जाळितसे या पापा
दे तरि आजि उःशापा
निर्दाळुनि त्या आजि भेद – दैत्यासी
ये हिंदुजाति तुजपाशी
ते अवयव विच्छिन्न सांधिले आजि
तू फुंकी जीव त्यामाजी
देऊनि बळा वामनासि ह्या काळी
तो घाल बळी पाताळी
जरि शस्त्र खुळा कर न आमुचा कवळी
परि तुझी गदा तुजजवळी
जरि करिसी म्हणू जे आता। रे
म्हणशील करू ते नाथा । रे
उठू आम्ही परि दे हाता। रे
दिधलासि जसा कंस मारिला तेंव्हा
हे हिंदु जातीच्या देवा ॥२॥
कवी – वि दा सावरकर
रसग्रहण
सावरकरांच्या सर्वच कविता गेय आहेत कारण त्या वृत्तबद्ध आहेत. बहुतांश कविता जरी विविध मात्रावृत्तात बांधलेल्या असल्या तरी त्यांनी इतर वृत्तांचा वापर देखिल केलेला आहे.
या कवितेत ते पतितपावनाचा धावा करीत आहेत. अस्पृश्यता पालनामुळे हिंदु धर्माचे नुकसान कसे झाले व आता आम्ही ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करीत असताना आम्हाला तुमच्या सहाय्याची कशी आवश्यकता आहे, हे या कवितेत कवी पटवून देतात. आम्ही पापी आहोत, संपूर्ण हिंदु समाजच पतीत आहे, पण तुम्ही पतितपावन आहात तर तुम्ही आमचा हा हिंदु समाजपुरूष एकसंध करून आमचा उद्धार करा.
वेदांनी ब्राम्हणांना समाजपुरूषाचे मस्तक मानले आहे तर शूद्रांना पाय. कवी म्हणतात आमच्या मस्तकाला विटाळ होऊ नये म्हणून आम्ही आमचे पाय तोडले, इतकच नव्हे तर पायांनी देखिल आपली शुद्धता राखण्यासाठी पावलं तोडली. म्हणजे जसे सवर्णांनी दलितांना दूर लोटले तसेच शूद्रांनी पण अतिशूद्रांना दूर केले, सामावून घेतले नाही.
कानांनी ज्ञान ग्रहण करू नये म्हणून मुखाने त्याचा उच्चार केला नाही. म्हणजे ब्राम्हणांनी शूद्रांना वेदाध्ययनापासून म्हणजेच ज्ञानार्जनापासून वंचित ठेवलं.
क्षत्रियांनी देखिल अशाच चुका केल्या. डाव्या हाताला जिंकण्यासाठी उजव्या हाताने आपलं पूर्ण शरीरच शत्रूला विकलं. जसे जयचंदाने पृथ्वीराजास जिंकण्यासाठी महंमद घोरीला आपलं स्वातंत्र्य विकलं. सख्ख्या भावाला घरात कोंडून चोराच्या हातात आम्ही जामदारखान्याच्या किल्ल्या दिल्या. असं करून आपण आपलच नुकसान करून घेत आहोत हे आम्हाला कळलं नाही.
आता आम्हाला आमच्या चुका समजल्या आहेत. आम्ही पश्चातापदग्ध आहोत. आमच्या चुकांमुळेच हिंदु समाजपुरूष पंगु झाला आहे. आता याची जाणीव आम्हाला झाली आहे.
हा सल भाल्याप्रमाणे आम्हास टोचतो आहे. आता आम्ही हे तोडलेले अवयव जोडले आहेत पण त्यात जीव येण्यासाठी, एकसंधता येण्यासाठी तुझ्या कृपेची आवश्यकता आहे.
तेंव्हा हे हिंदूंच्या देवा, तूच आम्हाला सहाय्य करून आमचा उद्धार तरी कर नाहीतर मृत्युदंड तरी दे. भेदाभेद राक्षसाचे निर्दालन करून आम्ही तुला शरण आलो आहोत, तरी आम्हाला उःशाप दे.
कंसासारख्या दुष्ट प्रवृतींचे उच्चाटन करण्यासाठी जसा तू आम्हाला मदतीचा हात दिलास तसाच आताही दे जेणेकरून अशा समाजविघातक कुप्रथांचे उच्चाटन करून हा हिंदुसमाजपुरुष एकसंध व बलशाली होईल. एवढीच विनंती मी तुला करतो आहे.
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈