सौ. अमृता देशपांडे
☆ काव्यानंद ☆ संधीप्रकाशात – कवी: बा. भ. बोरकर ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
रसग्रहण:
श्रेष्ठ कवी बा.भ.बोरकर निसर्गदत्त प्रतिभेचे कवी. ईश्वराने गोमंतभूमीला बहाल केलेला निसर्ग खजिना म्हणजे गर्द दाट हिरवाई, उंच उंच एकमेकांना लगटून उभे असलेले माड, फणस, पोफळी, खळाळणा-या नद्या, अथांग समुद्र, आणि लोभसवाणे समुद्रकिनारे. जिथे निसर्गाची लयलूट तिथे प्रेमाची बरसात. निसर्ग आणि बोरकरांचे शब्द जेव्हा तद्रूप होतात, तेव्हा जे साहित्यशिल्प आकार घेतं, त्या असतात त्यांच्या कविता.
हिरवाईच्या कॅनव्हासवर रंगीत फुलांच्या नक्षीने चितारलेली छोटी छोटी खेडी, ती कौलारू घरे, लहान लहान ओहोळ, झरे हाच त्यांच्या कवितेचा खरा बाज. बा.भ.बोरकर म्हणतात, ” हिरवळ आणिक पाणी तेथे सुचती मजला गाणी “.
सारं तारूण्य असं रोमांचित निसर्गा बरोबरच फुलण्यात गेलेलं, प्रेमात आकंठ बुडालेलं. वय जसंजसं पुढे सरकत गेलं, तशी तशी कविता जास्त मुक्तपणे बहरत गेली. पुढे गंभीर होत गेली. तारूण्य सरलं, तरी प्रेम अधिष्ठित होतंच. पैलतीराकडे चालताना आधार म्हणून जीवनसाथी पत्नीचा हात घट्ट धरून चालावेसे वाटू लागले. तिच्यासाठी अनेक प्रेमकविता करताना रंगणारं मन आयुष्याचं अंतिम सत्य समोर येताच गंभीर झालं. तिचं असणं जास्त जवळ असावंसं वाटू लागलं. तेव्हा मनातल्या भावनांनी कवितेचं रूप घेतलं, आणि ही कविता जन्मली.
“संधीप्रकाशात अजुन जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी”
संध्याकाळी फिकट अबोली, गडद केशरी प्रकाशात जोपर्यंत मावळत्या सुर्यकिरणांचे सुवर्ण मिसळते आहे, अशाच सांजवेळी माझे डोळे मिटावेत.
आयुष्य छानपणे जगता जगता अशा सुंदर संध्याकाळी आयुष्य थांबावे, ते ही कसे? तर शेवटच्या क्षणी तू जवळ असावीस. बस् इतकीच इच्छा!
खळखळंत वहात येणारी अल्लड नदी जेव्हा समुद्राला मिळते, तेव्हा शांत, समाधानी, आणि संपूर्णं असते.
पत्नीप्रेम, निसर्ग प्रेम, मत्स्याहार प्रेम अशा वैविध्यपूर्ण प्रेमाची मुशाफिरी करणार-या प्रेमाचा बहर ओसरून एक धीर गंभीर, निर्व्याज, अशारिरीक, तितकिच खोल अशी अद्वैत रूपी अथांगता मनात भरून राहते.
अशावेळी पत्नीला सांगतात, ” सखे, तुळशीचे एक पान माझ्या रसनेवर ठेव आणि त्यावर तू माझ्यासाठीच विहिरीतून ओढलेलं स्वच्छ, निर्मळ पाणी घाल, ” थोर ना त्याहुनि तीर्थ दुजे “.
तुलसीपत्र हे पावित्र्याचं, मांगल्याचं, आणि निष्ठेचं प्रतीक.
आयुष्यभर अनुभवलेलं हे पावित्र्य, ही निष्ठा अनमोल आहे. ते म्हणतात, ” तुझ्याकडे तुलसीपत्रांची मुळीच कमतरता ( वाण) नाही. ” हा तिच्या निष्ठेचा केवढा सन्मान आहे! निष्ठेचं तुळसीपत्र , त्यावर प्रेमाचे निर्मळ पाणी जिभेवर शेवटच्या क्षणी पडणं, यासारखं सद् भाग्य ते दुसरं कोणतं?
इथेच सर्व भावना थबकतात. विचारशक्ती थांबते. कल्पनाशक्ती सुन्न होते.रोम रोम शहारतो.
पुढच्या ओळीत जाणवतं मुरलेलं खरं प्रेम काय असतं! ” तुझ्या मांडीवर डोकं विसावावं. ” ती मांडी कशी? तर ” रंभागर्भी वीज सुवर्णाची कांडी “. केळीच्या बुंध्यातल्या नितळ, मऊस्पर्शी, गो-या गाभ्यात सुवर्णलडी सारखी सचेतन वीज असावी तशी
इतकी सूक्ष्म थरथर जाणवणा-या तुझ्या मांडीवर डोकं ठेवून विसावावे. आता एकच शेवटचं मागणं, ” वाळल्या ओठा दे निरोपाचे फूल, भुलीतली भूल शेवटली. “.
शृंगार, आसक्ती, प्रेम, अद्वैत या सर्वांचा एकबंध.
“संधीप्रकाशात अजुन जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी”
मृत्यू सारख्या अबोध, गूढ सत्याबद्दल दोन ओळीत केवढे मोठे तत्वज्ञान भरून राहिले आहे!
अतिशय शांत,समाधानी आयुष्य उत्कटपणे जगून शृंगार, प्रेम, निसर्ग असे सगळे धुमारे घेऊन पुढे कविता अध्यात्मात विलीन होते. तिचा सहवास हाच श्वास, कासावीस जीवाला निष्ठेचं तुळशीपत्र हेच चिरंतन सत्य, तिनंच ओढलेलं पाणी हेच तीर्थ असतं. शेवटी एक लाडीक मागणी, ” वाळल्या ओठा दे निरोपाचे फूल “…… ह्या एकाच क्षणात पराकोटीची अनेक सुखे, अपरिमित समाधान ” संतर्पणे ” सामावली आहेत.
उत्कट, बहारदार आणि तृप्त भावना आपल्या कवितांमधून व्यक्त करणारे बा.भ. बोरकर आणि त्यांच्या अप्रतिम कविता हा मराठी साहित्याचा खजिना आहे.
© सौ अमृता देशपांडे
पर्वरी- गोवा
9822176170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈