सुश्री शोभना आगाशे
काव्यानंद
☆ दिपवाळीचे लक्ष्मीपूजन… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆
☆ दिपवाळीचे लक्ष्मीपूजन… स्व. वि. दा. सावरकर ☆
लक्ष्मीपूजन करू घरोघर आम्ही जरी भावे
प्रसन्न पूजेने ना होता लक्ष्मी रागावे
आणि इंग्रज पूजी जरि ना लक्ष्मीची मूर्ती
राबे रिद्धिसिद्धी त्याच्या दाराशी तरि ती
काय बंधुंनो, कारण? रुसली भारतलक्ष्मी कां?
लाथाडुनि दे पूजा अमुची शतकांची देखा
कारण आम्ही सुमें अर्चितो परि ना सुमनानें
विनवू परि ना, विष्णुसम तिला जिंकु विक्रमाने
लक्ष्मीपूजन करावया जैं करितो स्नानाला
परका साबू, परकी तेलें लावू अंगाला
परदेशीचे रेशीम त्याचा मुकटा नेसोनी
देवघरी परदेशी रंगे रंगीत बैसोनी
विदेशातली साखर घालुनि नैवेद्या दावू
अशा पूजनें प्रसन्न होईल लक्ष्मी हे भावू
साबू नेई कोटी, कोटी तेल रुपाया ने
नेई लुटोनी विदेश कोटी अन्य उपायाने
विलायती जी साखर नैवेद्यासी लक्ष्मीच्या
आणियली ती नेत विदेशी कोटी रुपयांच्या
अशा रीतीने लक्ष्मी दवडुनि दाराबाहेरी
लक्ष्मीपूजन करीत बसतो आम्ही देवघरी
आणि विदेशी नळे, फटाके, फुलबाजा अंती
उडवुनि डिंडिम पिटू आपल्या मौर्ख्याचा जगती
अहो हिंदुंनों, कोटी कोटी रुपयांची या दिवशी
लक्ष्मी पूजावयासि लक्ष्मी धाडू विदेशासी
म्हणुनि आम्ही जरी पुजू घरोघर ही लक्ष्मी भावें
प्रसन्न पूजेने ना होता लक्ष्मी रागावे
तरी हिंदुंनों, घरात लक्ष्मी आधी आणावी
विदेशीसि ना शिवू शक्यतो वृत्ती बाणावी
देशी तेलें, देशी साबू, देशी वस्त्रानें
देशी साखर, देशी अस्त्रे, देशी शस्त्रानें
स्वदेशलक्ष्मी पूजू साधुनि जरी मंगलवेळ
गजान्तलक्ष्मी हिंदुहिंदुच्या दारी डोलेल
– वि दा सावरकर
रसग्रहण
परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातल्याशिवाय या देशाची भरभराट होणार नाही; ही वस्तुस्थिती सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी स्वा. सावरकरांनी ही कविता १९२५ साली रचली. दिवाळीसारख्या सणांच्या वेळी सावरकरांनीच स्थापन केलेल्या हिंदुसभेचे कार्यकर्ते, मेळावे घेऊन, अशा कविता गाऊन, समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न करायचे. सर्वसामान्य जनतेला कळावी, पचावी, रुचावी म्हणून सावरकरांनी या कवितेत अगदी सोपी शब्दयोजना केलेली दिसते. तसेच लोकांना सहज पटतील असे दैनंदिन व्यवहारातील दाखले ते देतात. मात्र कितीही सोपी शब्दरचना केली तरी त्यांच्यातला शब्दप्रभू कुठेतरी डोकावतोच. उदा. ‘सुमनें’ वरचा श्लेष किंवा ‘मूर्खता’ साठी वापरलेला शब्द ‘मौर्ख्य’.
लक्ष्मीपूजनादिवशी घराचा दरवाजा उघडा ठेवला की लक्ष्मी घरात येते असा समज आहे. याचाच उपयोग करून कवी सांगतात की, परदेशी फटाके, तेल, साबण, साखर अशा वस्तू वापरून तुम्ही लक्ष्मीला केवळ दरवाजाबाहेरच नव्हे तर देशाबाहेर घालवीत आहात. आपलाच कच्चा माल कवडीमोलाने घेऊन, त्यांच्या देशात बनलेल्या वस्तू हे इंग्रज आपल्याला विकतात व कोट्यावधी रुपये भारतातून लुटून नेतात. अशा परिस्थितीत लक्ष्मी तुमच्या आमच्यावर कशी प्रसन्न होईल. ती रुसून परदेशीच निघून जाणार. याउप्पर आणि परदेशी फटाके वाजवून तुम्ही जणु आपल्या मूर्खतेचा डिंडोराच पिटता. म्हणून हे देशबंधूंनों, आधी देशाबाहेर जाणाऱ्या लक्ष्मीला थांबवा म्हणजेच एका अर्थाने आधी लक्ष्मीला घरांत घेऊन या व मग तिची पूजा करा.
कविता संपता संपता का होईना पण ‘देशी साखर, देशी अस्त्रे, देशी शस्त्राने’ या ओवीत त्यांच्यातला क्रांतिकारक डोकावतो. ते म्हणतात, देशी वस्त्रे नेसून, देशी साखरेने नैवेद्य बनवून, देशी अस्त्राशस्त्रांने आपण स्वदेशलक्ष्मीची पूजा करू. म्हणजेच स्वातंत्र्यलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण सशस्त्र आंदोलन करू. देश स्वतंत्र झाल्यानंतरच हिंदुस्थानातील प्रत्येकाकडे गजान्तलक्ष्मी नांदेल, देशाची भरभराट होईल.
हे विचार जवळ जवळ १०० वर्षांनंतर, सद्यपरिस्थितीत देखिल अचूक लागू पडतात. आपण पहातो की दिवाळी आली की चिनी बनावटीच्या वस्तूंचा बहिष्कार करण्याची टूम निघते पण विविध कारणांमुळे हे फारच कमी प्रमाणात साधलं जातं. म्हणूनच महान, द्रष्ट्या कवींच्या कविता ह्या सार्वकालिक असतात असं म्हटलं जातं.
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈