सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ निशाशृंगार… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

काव्यानंद:

शृंगार हा रसांचा राजा आहे, रसपती आहे.  प्रेम— रती हा शृंगाराचा स्थायीभाव.  शृंगार उत्तान असेल, सात्विक असेल अथवा वियोगातला विप्रलंभ शृंगार असेल  पण मानवी जीवनातच नव्हे तर अवघ्या निसर्गातच या रसराजाचं दर्शन होत असतं.  गीतकार आणि कवी मंडळींचा तर हा लाडका विषय.  मग त्यात प्रेम, संध्याकाळ, नदीकाठ, समुद्रकिनारा तर असतातच पण अग्रभागी असतो तो चंद्र!  प्रियतमेच्या नजरेतला प्रियकर. चित्तवृत्ती फुलवणारी चंद्र, चांदणं, यामिनी यांची शेकडो गीत आज पर्यंत रचली गेली आहेत.  अगदी  महान कवी कालीदासांचे मेघदूत हे काव्य विप्रलंभ शृंगारचे एक अप्रतिम उदाहरण आहे.  असंच एक सुंदर शृंगार गीत घेऊन येत आहेत डॉ. निशिकांत श्रोत्री.  या गीताचं शीर्षक आहे निशाशृंगार ( निशिगंध काव्यसंग्रह)

☆ – निशाशृंगार – डॉ निशिकांत श्रोत्री ☆

असुन रंग काळा रुपेरी हा साज सजली निशा

नटूनी थटूनि घेऊनि येई धुंदी नशा।।ध्रु।

 

हिर्‍यांची कटी मेखला दिव्य शोभे

आकाशगंगा सजविण्यास लाभे

शेल्यावरी कृष्ण नक्षत्र शोभे

अलंकार सजवीत रजनीस या ।१।।

 

जरी रात्र काळी निशानाथ भाळी

किती कौतुकाने मिरवी झळाळी

रिझविण्यास कांता निशा सज्ज झाली

लपेटूनिया भवती दाही दिशा ।।२।।

 

रजनीकांत प्रणये निशा तृप्त झाली

धुंदीस बघुनी हवा कुंद झाली

तृप्त शशांक धन्य ती रजनी

संपन्न हो प्रीतीचा हा वसा ।।३।।

डाॅ. निशिकान्त श्रोत्री.

हे गीत वाचत असताना अक्षरशः अंगावर मोरपीस फिरतं. इतकं नाजूक, इतकं कोमल आणि तरल शब्दातले हे गीत सहजपणे एका धुंद लहरीत तरंगायला लावतं.

असून रंग काळा रुपेरी

हा साज सजली निशा

 नटूनी थटूनि  घेऊनि

 येईल धुंदी नशा …

यात प्रत्यक्ष निशा— रात्रच प्रियतमेच्या भूमिकेत आहे. ही निशा कशी? तर कृष्णवर्णी काळी.  पण तिनेही रुपेरी साज चढवलेला आहे. नटलेली, थटलेली चंदेरी चांदण्याचा पेहराव घातलेली निशा प्रणय भावनेने धुंद झालेली भासत आहे.

 *हिऱ्यांची कटी मेखला दिव्य शोभे

 आकाशगंगा सजविण्यास लाभे

 शेल्यावरी कृष्ण नक्षत्र शोभे

अलंकार सजवीत रजनीस या …

 

प्रथम याओळींचा अन्वयार्थ लावूया.

कटी, हिर्‍यांची मेखला दिव्य शोभे

सजविण्यास आकाशगंगा लाभे

कृष्ण शेल्यावरी नक्षत्र शोभे

अलंकार सजवीत रजनीस या…

खरोखरच ही चार चरणे  वाचल्यानंतर प्रथम मनात येतं ते

जे न देखे रवी ते देखे कवी

 किती सुंदर कल्पनांची ही शब्दसरी!

 निशेच्या साज शृंगारकडे पाहताना कवी म्हणतात, या निशेच्या कमनीय कटीवर— कमरेवर जणूं काही आकाशगंगारूपी हिऱ्यांची  साखळी आहे. आकाशगंगा म्हणजे तारका समूहाचा डोळ्यांना लुब्ध करणारा नभातला एक लांबलचक पट्टाच. आज कवीच्या नजरेत मात्र ही आकाशगंगा  काळ्या निशेचा  हिऱ्यांचा कमररपट्टाच आहे. आकाशातलं चमचमणारं चांदणं, निशेच्या काळ्या शेल्यावर कसं चंदेरी बुट्ट्यांसारखं शोभिवंत वाटत आहे.  खरोखरच या कृष्णवर्णी रजनीने हेच अलंकार चढवून स्वतःला नटवले आहे, सजवले आहे. ते कुणासाठी बरे? पाहूया पुढच्या कडव्यात.

 जरी रात्र काळी निशानाथ भाळी

 किती कौतुकाने मिरवी झळाळी

 रिझविण्यास कांता निशा सज्ज झाली

 लपेटुनिया भवती दाही दिशा…

ही प्रियतमा रात्रीच्या रूपात आहे. ती काळी आहे. पण तिच्या भाळावर —कपाळावर मात्र चमचमणारा, लखलखीत, प्रकाशमय असा शशांक आहे. किती कौतुकाने, अगदी मालकी हक्कानेच ती तिच्या निशानाथाची झळाळी मिरवत आहे!  तिच्या संपूर्ण काळ्या रंगालाच त्याने उजळवून टाकलेले आहे.

 रिझविण्यास कांता या ओळीतला कांता हा शब्द खूपच रसभरीत आहे. प्रणयात किंवा प्रणय भावनेत धुंद झालेली स्त्री ही कांता असतेच. पण या ठिकाणी कांता याचा अर्थ प्रियकर हा आहे आणि या प्रियकराला रमविण्यासाठी ही रजनी पहा कशी  दाही दिशांचं वस्त्र लपेटून तयार झाली आहे.  ही ओळ इतकी तरल आहे की ती वाचताना असे वाटते की प्रणयोत्सुक प्रियतमा जणू कुठल्याशा पारदर्शक वस्त्रातून तिचं कायिक सौंदर्यच प्रियकराला दाखवत आहे.

  रजनीकांत प्रणये  निशा तृप्तझाली

  धुंदीस बघुनी हवा कुंद झाली

 तृप्त शशांक धन्य ती रजनी

 संपन्न हो प्रीतीचा हा वसा…

वा! क्या बात है कविराज?  या काव्यपंक्ती वाचताना मला क्षणभर खजुराहोची कामोत्सुक, शंकर-पार्वतीच्या कामक्रीडेची शिल्पच पाहते आहे की काय असेच वाटले. किती नाजूक! किती तरल हा प्रणय! आणि प्रणय क्रीडेचा हलकेच गाठलेला तो शिखरबिंदू! एक तृप्तीचा क्षण जो रजनीकांताशी झालेल्या काम क्रीडेनंतर निशेने अनुभवलेला. आणि निसर्गातलं हे धुंद प्रणयमग्न युगुल पाहून वातावरणातल्या हवेलाही कशी नशा चढली आहे. तीही कुंद—धुंद झाली  आहे.

ये राते ये मोसम ये चंचल हवा…जणू काही कुठल्यातरी अज्ञात अस्तित्वाच्या अंतरातूनच अस्फूटपणे उद्गार उमटतात,

 तृप्त शशांक धन्य ती रजनी

 संपन्न हो प्रीतीचा हा वसा ..

हा चंद्र ही तृप्त आणि ही रजनीही धन्य!

समागमातला आनंद,मीलनाची आकंठ तृप्ती!

खरोखरच एका दिव्य, रसमय, तरल शृंगाराचा हा सोहळाच जणू काही संपन्न झालेला आहे!

अहाहा! कविराज, खुदा की कसम लाजवाब है।

निशाशृंगार हे गीत म्हणजे चेतनागुणोक्ती अलंकाराचं एक मूर्तीमंत सुंदर उदाहरणच. चेतनागुणोक्ती हा अगदी भावयुक्त अलंकार आहे.  अचेतन गोष्टीला चेतनामय मानून तिला सचेतनाचे गुणधर्म जोडणे हे या अलंकाराचे वैशिष्ट्य आहे.  याकरिता परानुभूती कौशल्याची गरज असते. या अलंकारामुळे कवीच्या कल्पनेला खूप वाव मिळतो आणि कविता अंगोपांगी बहरते.

डॉ. श्रोत्री यांच्या प्रस्तुत निशाशृंगार या गीतात हे प्रकर्षाने जाणवते.  निशा म्हणजे रात्र. एक काळाचा प्रहर खरंतर. पण कवीने या कृष्णकाळ्या रात्रीलाच प्रियतमेच्या रूपात पाहिले आहे.  इथे निशा ही प्रणय धुंद प्रियतमा आणि रजनीनाथ हाच प्रियकर आहे आणि त्यांच्या रुपेरी प्रणायाला गुंफणारं हे अप्रतिम काव्य.  इथे हवेला सुद्धा चैतन्य रूप दिलेले आहे. वास्तविक चेतनागुणोक्ती अलंकार आणि रूपक हे तसे एकमेकात गुंतलेलेच असतात असे का म्हणू नये?  निशाशृंगार या गीतात चेतनागुणोक्ती अलंकार साधणारी निशा, निशानाथ, आकाशगंगा, मेखला, कृष्ण शेला, दिशा ही सारी रूपकेच आहेत आणि ती या गीतात चेतना रूपात आहेत. सचेतन आहेत.

डॉ. श्रोत्रींची ही रजनी जशी निसर्गाने बहाल केलेल्या अलंकाराने झळाळत आहे तसेच हे काव्यही साहित्यालंकाराने सजलेले आहे.

यात आकाशगंगेला निशेच्या कटीवरच्या मेखलेची उपमा दिलेली आहे.किंवा आकाशगंगा म्हणजे जणू काही निशेच्या कटीवरची मेखलाच भासे, असा उत्प्रेक्षा अलंकारही यात आहे.

लपेटूनिया भवती दाही दिशा या काव्यपंक्तीत साधलेला श्लेष अलंकार फारच बहारदार आहे.

एका अर्थी या काळ्या निशेने दाही दिशांचे हे उंची, भरजरी वस्त्र प्रियकराला रिझवण्यासाठी लपेटलेले आहे तर दुसऱ्या अर्थी दाही दिशांचे वस्त्र म्हणजे दिक् + अंबर म्हणजे दिगंबर.  प्रियकराला रिझविण्यासाठी सज्ज झालेली निशा ही दिगंबरावस्थेत आहे.  विवस्त्र आहे आणि या विवस्त्रतेत तिचे समर्पण आहे.   दिशारुपी वस्त्रातला हा श्र्लेष अलंकार थक्क करणारा आहे.  कवीच्या अफाट कल्पनाशक्तीला,दृष्यात्मक प्रतिभेला(visualisation)  दाद द्यावी तितकी थोडीच आहे.

रात्र काळी— निशानाथ भाळी— किती कौतुकाने मिरवी झळाळी या काव्यपंक्तीतला अनुप्रासही अत्यंत लयकारी आहे.  तसेच शोभे— लाभे, भाळी— झळाळी ही स्वरयमके गीताला गेयता देतात.  गीतातल्या ध्रुवपदाशी जुळणारी नशा— दिशा— वसा ही यमकेही सुरेख आणि सहज आहेत. गीताला एक अंगभूत चाल देणारी आहेत. शिवाय या शृंगारिक रात्रीचं एक प्रकारे सुरेख वर्णनच या काव्यात केलेले आहे.  स्वभावोक्तीची ही झलक फारच काव्यात्मक आणि सुंदर आहे.

हे गीत वाचताना सहजच म्हणा अथवा चोरटेपणाने म्हणा उगीचच पर्यायोक्ती अलंकाराचा अविष्कार ही जाणवतो. पर्यायोक्ती अलंकार म्हणजे आडवळणाने किंवा मिस्कीलपणे सांगितलेली गोष्ट . यात अशी कुठली दडलेली गोड गोष्ट आहे की जी कवीला सांगायची आहे?  कवी राजांची माफी मागून अथवा परवानगी गृहीत धरूनच लिहिते, न जाणो या रजनी— शशांकची ही प्रणय घटिका म्हणजे कवीचा स्वतःचाच  काव्यात्मक आधार घेऊन व्यक्त केलेला मधुर अनुभव असेल का?  कारण काव्य हे अनुभूतीतून आणि संवेदनशील मनातूनच प्रसवतं. म्हणून या काव्यात परानुभूतीपेक्षा स्वानुभूतीही जाणवते.   कारण निशा, रजनीकांत हे गीतातले शब्द थोडेसे वैयक्तिक वाटले मला.  कवीच्या नावाशी साधर्म्य साधणारे.  असो अतिरंजीतपणा नको आणि उगीच विनोदही नको.

या पलीकडे जाऊन एकच म्हणेन की शृंगार रसाचे सौंदर्य खुलवणारं, अलंकारिक पण बोजड नसलेलं हे काव्य आहे. उत्तान आणि सात्विक शृंगाराची ही सुरेख सरमिसळ आहे. म्हणून अश्लीलता अजिबात नाही. वाचक अगदी त्रयस्थपणे  कोमल, अत्यंत हळुवार, अलवार, सुंदर प्रणय भावनेच्या प्रवाहात सहजपणे तरंगत राहतो आणि हेच या काव्याचे परमोच्च यश आहे.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments