सुश्री तृप्ती कुलकर्णी

? काव्यानंद ?

☆ ती वेळ निराळी होती…ही वेळ निराळी आहे… श्री अरुण म्हात्रे ☆ रसग्रहण – सुश्री तृप्ती कुलकर्णी

☆ ती वेळ निराळी होती…ही वेळ निराळी आहे… श्री अरुण म्हात्रे ☆

छातीत फुले फुलण्याची

वार्‍यावर मन झुलण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

डोळ्यात ऋतुंचे पाणी

मौनात मिसळले कोणी

वाळूत स्तब्ध राहताना

लाटेने गहिवरण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

तू वळून हसलीस जेव्हा

नक्षत्र निथळले तेव्हा

मन शहारून मिटण्याची

डोळ्यात चंद्र टिपण्याची …

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

ज्या चंद्र कवडशा खाली

कुणी साद घातली ओली

मग चंद्र वळून जाताना

किरणात जळून जाण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

पाऊस परतला जेव्हा

नभ नदीत हसले तेव्हा

कोरड्या मनाने कोणी

गावात परत येण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

थबकून थांबल्या गाई

की जशी शुभ्र पुण्याई

त्या जुन्याच विहिरीपाशी

आईस हाक देण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

गावाच्या सीमेवरती

जगण्याच्या हाका येती

त्या कौलारु स्वप्नांना

आयुष्य दान देण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

हे गाणे जेव्हा लिहिले

मी खूप मला आठवले

शब्दास हाक देताना

आतून रिते होण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 – श्री अरुण म्हात्रे 

काही काही गोष्टी आपल्या समोर येण्याच्या वेळा किती अचूक असतात असं ही कविता पुन्हा पुन्हा वाचताना मला जाणवलं. वर्षाचा शेवटचा महिना   मला आठवणींचा महिना  वाटतो… वर्षभरातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या एखाद्या चित्रपटातल्या फ्लॅशबॅकप्रमाणे आपल्या नजरेसमोरून तरळत जात असतात. वर्ष आणि वय जसं उलटत जातं तसं भूतकाळाची वही भरायला सुरुवात होते.

या वहीतल्या प्रत्येक पानावर वर्षभरातले अनेक प्रसंग आपल्याही नकळत लिहिले जातात… गंमत म्हणजे काही प्रसंग लिहायचं ठरवलं नसलं तरीही आपसूकच लिहिले जातात. आणि एका छोट्याशा ज्योतीनं सारा आसमंत नजरेत यावा तसे ते प्रसंग कुठल्यातरी एका छोट्याशा जाणिवेतून स्मृतीतल्या एखादा दिवस, विशिष्ट प्रहर लख्ख उजळवून टाकतात.

अरुण म्हात्रे यांच्या या कवितेत या कवीच्या स्मृतिकोषात अशाच काही आठवणी बद्ध झालेल्या आहेत. ज्या साध्या दिवसांनाही ‘विशेष पण’ बहाल करून गेल्या आहेत. प्रत्येकाचा भूतकाळ हा तसा रमणीय असतो. पण कवी हा भूतकाळ ज्या पद्धतीने बघतो ती पद्धत जास्त ‘रमणीय’ असते. कारण त्याला गेलेल्या वेळेची किंमतही माहिती आहे आणि आत्ताच्या वेळेचीही जाण असते. ऋतुंप्रमाणे बदलणाऱ्या निसर्गा इतकंच सहजपणे ऐलतीरावरून पैलतीराकडे बघण्याची ताकद कवी आत्मसात करतो, किंबहुना ते त्याचं बलस्थान असतं.

आर्तता, आत्मीयता, आत्ममग्नता आणि त्याचवेळी आत्मसमर्पणता अशा सगळ्यांच भावना तो कवितांमधून मांडत जातो. इतक्या सहज की जणू सागराच्या लाटेनं जोमाने उसळुन आपलं वेगळेपण सिद्ध करावं आणि ते लक्षात येईस्तोवर समुद्रात तितक्याच वेगाने मिसळून जावं. ‘क्षणाचा जन्म’ आणि ‘क्षणाचा मृत्यू’ इतक्या सुंदर पद्धतीने कवी मांडतो की जणू कविता ही त्याची प्रेयसी असावी आणि तिचं वर्णन करण्याची शब्दांची अहमिका लागलेली असावी.

या कवितेतील ‘ती वेळ निराळी होती… ही वेळ निराळी आहे’ या ओळीतून आपल्यालाही दोन वेळांमधला आणि दोन परिस्थिती, मनस्थिती यांतला फरक चटकन जाणवतो.

मला तर ही कविता कवितेलाच उद्देशून लिहिलीय असं वाटतं. जणू तो कवितेलाच सांगतो आहे ‘ती वेळ निराळी होती… ही वेळ निराळी आहे’. एका टप्प्यावरती आल्यावर कवीनेच आपल्या कवितांकडे तटस्थपणे बघण्याचा आणि तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर तो याच पद्धतीने तिच्याशी बोलेल.

घटना जेव्हा वर्तमानात घडत असतात तेव्हा प्रत्येक वेळी त्यांना अर्थ असतोच असं नाही. अनेकदा काळ उलटून गेल्यावर त्या घटनांना विशेष अर्थ प्राप्त होतो. या कवितेतल्या सगळ्या कडव्यांमधून कवीला हेच मांडायचं असावं.

येणाऱ्या नव्या वर्षाकडे आशेने पाहताना मागील वर्षातल्या अनेक बारीक बारीक गोष्टी देखील आपण आता अशाच नजरेने पाहतो आणि आपल्याला त्या तेव्हा साधा वाटलेल्या घटनाही, आता विशेष वाटतात. ही जगण्यातली गंमत कवीला खूप छान उमगलेली असते.

मला भावलेली कविता अशी आहे. तुम्हाला ती आणखीन वेगळ्या प्रकारे भावू शकते. कारण आपल्या प्रत्येकाचा भूतकाळ वेगळा आहे आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments