सौ. ज्योत्स्ना तानवडे
काव्यानंद
☆ अडगळीची खोली… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
डाॅ. निशिकांत श्रोत्री
अडगळ हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. मग तो अडगळीचा कोपरा घराची एक मागची खोली किंवा पडवी असो किंवा मनाचा कोपरा असो; तो असंख्य वस्तू आणि आठवणी, जुन्या विचारांनी व्यापलेला असतो. एखाद्या दिवशी निवांत वेळी ही अडगळ उपसणे हा मनाचाच कधी आनंददायी तर कधी वेदनादायी खेळ असतो. या अडगळी विषयीच लिहिले आहे डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी अडगळीची खोली या त्यांच्या कवितेमध्ये. आज आपण या वेगळ्या कवितेचा रसास्वाद घेणार आहोत.
☆ अडगळीची खोली ☆
जपली आहे मी मोठ्या शर्थीने
एक खोली अडगळीची.
काय कोंबलं त्यात
केव्हा केव्हा
कशाचच भान नाही
कळत असो वा नकळत
आयुष्याच्या प्रत्येक वळणावरचा
मैलाचा दगडच काय
बारीक सारीक खडा सुद्धा
दिला भिरकावून त्या अडगळीत
नाही केला विवेक
उपयोगी का निरुपयोगी याचा
जे आले त्या सगळ्यालाच
फक्त माझे माझे म्हटले
दुसऱ्याला द्यायचे तर नावच नाही
मन माझे खोली अडगळीची
कोणी कोणी आले
नकळत खोली भरत गेले
आपापल्या स्मृतींनी
आपापल्या मायेनी
आणि खडूस वैराने सुद्धा
त्या सगळ्यांनाच
माझेच म्हटले
परतफेड करायचे कधी
नावही नाही काढले
आता मात्र डोकावून पाहतोय मी
मोठ्या आशाळभूतपणे
त्याच अडगळीच्या खोलीत
कुठे सापडतोय का ते पाहायला
परतीचा तर सोडाच
निदान पुढे जायचा तरी मार्ग
जो करेल कमी
या भीरु मनाची अस्वस्थता
गोंधळलेल्या मनाला
करेल कायमचं शांत
आणि देईल करून ओळख
माझ्या खऱ्या शाश्वत अस्तित्वाची
पण सापडलीच नाही मला ती वाट
हरवून गेलीय त्या ढिगात
आणि गर्दीत
आयुष्यभर साठवलेल्या
मायेच्या, वासनांच्या, आणि दुस्वासाच्या
षड्रिपूंच्या बंधनात
कसं शोधू मी कसं शोधू
सांगेल का कोणी मला?
लावेल का कोणीतरी
या खोलीतली अडगळ
नीटनेटकेपणे टापटिपीने
एकदा तरी?
©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री
९८९०११७७५४
जपली आहे मी मोठ्या शर्थीने
एक खोली अडगळीची
काय कोंबलं त्यात
केव्हा केव्हा
कशाचंच भान नाही
ही कविता मुक्तछंदातील आणि प्रथम पुरुषी एक वचनातील आहे. त्यामुळे कवी आपल्याशी त्याच्या आयुष्याबद्दल सरळ संवाद साधत आहे. अडगळ ही प्रत्येकाच्या घराचा, मनाचा मोठा भाग व्यापणारी एक स्वाभाविक गोष्ट असते. रोजच्या जगण्यातल्या पण आता वापरात नसलेल्या असंख्य गोष्टी आपण मोठ्या जिव्हाळ्याने जपून ठेवतो. हळूहळू हा पसारा वाढत जातो आणि शेवटी ‘धड टाकवत नाही आणि ठेवता पण येत नाही’ अशा या गोष्टींचे अडगळीत रूपांतर होते.
कवीने इथे यासाठी ‘कोंबलं’ हा शब्द अचूकपणे वापरला आहे. या अडगळीतल्या गोष्टी आपण ‘हे असू दे, ते असू दे’ करत त्यावेळी काहीही विचार न करता जागा दिसेल तिथे अक्षरशः कोंबतच असतो. ‘आत्ता असू दे, मग बघू’ एवढीच भावना त्यावेळी मनात असते.
तीच गोष्ट आयुष्यात आलेली माणसे, नातलग, असंख्य घटना, आठवणी यांचीही असते. मनाचा एक भाग या ठासून कोंबलेल्या विचारांनी व्यापलेला असतो. कवीच्या आयुष्यातील अशा अडगळी बद्दल कवी आपल्याशी बोलतो आहे.
कळत असो वा नकळत
आयुष्याचा प्रत्येक वळणावरचा
मैलाचा दगडच काय
बारीक सारीक खडा सुद्धा
दिला भिरकावून त्या अडगळीत
नाही केला विवेक
उपयोगी का निरुपयोगी याचा
जे आले त्या सगळ्यालाच
फक्त माझे माझे म्हटले
दुसऱ्याला द्यायचे तर नावच नाही
आयुष्याच्या वाटचालीसाठी कवीने ‘मैलाचा दगड’ हे रूपक वापरलेले आहे आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे टप्पे, चांगली वाईट वळणं येतात त्यांनाच कवी मैलाचा दगड म्हणतो. म्हणजे चांगल्या उपलब्धी, मोठी कामगिरी यांच्याबरोबरच आपले शिक्षण, नोकरी व्यवसाय, लग्न,मुलंबाळ, खूप आनंदाचे प्रसंग, मोठे आजारपण, अपघात, संकटं अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्या आयुष्याला प्रसंगी वेगळी दिशा देतात. आयुष्यावर खूप मोठे परिणाम करत आयुष्य पुरते बदलून टाकतात.
अशा मोठ्या घटनांच्या चांगल्या वाईट आठवणी, परिणाम, काही वस्तू, फोटो, कागदपत्रं अशा असंख्य,अगदी बारीक सारीक गोष्टी सुद्धा असतात ज्या आपण घरात आणि मनात अगदी जपून साठवत साठवून ठेवतो. त्यातले बारीक सारीक खडे म्हणजे त्या घटनांमुळे मनावर झालेले आघात, उमटलेले ओरखडे जे सतत बोचत राहून मनस्तापच देतात. त्यांनाही आपण जपतो. अशावेळी या सगळ्या गोष्टी उपयोगी आहेत का निरूपयोगी याचा सारासार विचारही आपण कधी करत नाही. जे जे पदरात पडत गेलं ते ते आपलेपणानं स्वीकारलं. त्यामुळे ते इतर कुणाला देण्याचा कधी प्रश्नच येत नाही. कवीही त्याच्या याच अनुभवाबद्दल बोलतो आहे.
मन माझे खोली अडगळीची
कोणी कोणी आले
नकळत खोली भरत गेले
आपापल्या स्मृतींनी
आणि खडूस वैराने सुद्धा
त्या सगळ्यांनाच
माझेच म्हटले
परतफेड करायचे कधी
नावही नाही काढले
आपले मन हे अदृश्य गोष्टींची अडगळीची खोली असते. आपल्या आयुष्यात असंख्य माणसे येतात त्यांच्या आठवणी, त्यांचे चांगले वाईट वागणे, वैर, भांडणे या सगळ्या गोष्टी मनात साठून राहतात. पण एकदा आपण त्यांना आपलं मानलं की या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्याच होतात. मग कशाचीही परतफेड करायचा प्रश्नच येत नाही. या आठवणी आपल्या मनाला अडगळीची खोली बनवून कायम तिथेच राहतात. आपण त्यांना मनातून काढून टाकत नाही, म्हणजे विसरून टाकत नाही तोपर्यंत त्या मनातून आपण होऊन कधीच बाहेर जात नाहीत.
आता मात्र डोकावून पाहतोय मी
मोठ्या आशाळभूतपणे
त्याच अडगळीच्या खोलीत
कुठे सापडतोय का ते पहायला
परतीचा तर सोडाच
निदान पुढे जायचा तरी मार्ग
जो करेल कमी
या भीरु मनाची अस्वस्थता
गोंधळलेल्या मनाला
करेल कायमचं शांत
आणि देईल करून ओळख
माझ्या खऱ्या शाश्वत अस्तित्वाची
ही मनाची अडगळ आता अस्वस्थ करते. मन सतत बेचैन होते. कारण बऱ्याच आठवणी, अनुभव हे विसरायचे म्हटले तरी विसरता येत नाहीत. कवीची आता या अडगळीत घुसमट होते आहे. मन घाबरते आहे. आता यातून परतीचा मार्ग तर उरलाच नाही. पण यातून निदान बाहेर पडायचा तरी काही मार्ग आहे का हे कवी आशाळभूतपणे बघतो आहे. पण बाहेर पडायचा मार्ग सापडत नाही. असा एखादा मार्ग, एखादी युक्ती मिळावी ज्यामुळे घाबरलेल्या मनाची अस्वस्थता कमी होईल, गोंधळलेले मन शांत होईल अशी कवी अपेक्षा करतो आहे.
आपली प्रत्येकाची अशीच अवस्था होत असते. या नकोशा आठवणी, घटना, अनुभव मनातून बाहेर काढल्याशिवाय मन स्वच्छ, शांत होतच नाही. कारण या अनावश्यक पसाऱ्यात आपली एक वेगळीच प्रतिमा तयार झालेली असते. पण या जुन्या गोष्टीतले अनावश्यक रुसवे फुगवे, गैरसमजुती जर दूर झाल्या आणि सत्याचे आकलन झाले तर आपल्याच खऱ्या अस्तित्वाची नव्याने ओळख होऊ शकते. त्यासाठी बाहेर पडता येणारा एखादा मार्ग मिळावा यासाठी कवी फार फार उत्सुक आहे.
पण सापडलीच नाही मला ती वाट
हरवून गेलीय त्या ढिगात
आणि गर्दीत
आयुष्यभर साठवलेल्या
मायेच्या, वासनांच्या, आणि दुस्वासाच्या
षड्रिपूंच्या बंधनात
कसं शोधू मी कसं शोधू
सांगेल का कोणी मला ?
लावेल का कोणीतरी
या खोलीतली अडगळ
नीटनेटकेपणे टापटिपीने
एकदा तरी ?
पण कवीला या अडगळीतून बाहेर नेणारी अशी वाट अजूनही सापडलेलीच नाही. कारण ती वाट त्या पसाऱ्याच्या ढिगामध्ये हरवून गेलेली आहे असे वाटते. खरंतर अशी वाट असतच नाही. कारण अशी अडगळ ही आपली मानसिक, भावनिक गरज असते. राग, लोभ, मोह, माया,मद, मत्सर अशा षड्रिपूंच्या पाशात आपण गुरफटलेले असतो.
यातून पूर्णपणे बाहेर पडण्याची आपली मानसिक तयारी नसते. कारण या जुन्या घटना, त्यांच्या आठवणी या आपल्यासाठी कधी स्फूर्तीदायक असतात, दिशादर्शक असतात तर कधी कधी त्या वेदनादायी निराशाजनकही असू शकतात. पण त्याचवेळी त्या मार्गदर्शकही असतात. पुढे नक्की कसं वागायचं, काय टाळायचं, स्वतःला कसं बदलायचं याचं अचूक मार्गदर्शन आपलंच मन आपल्याला करत असतं.
पण तरीही या मनाच्या गुंत्यात अडकून पडणे ही गोष्ट जीवनाच्या प्रवाहीपणाला अडथळा ठरत असते. अशावेळी मानसिक आजारांचा सामना ही करावा लागू शकतो. कवीही इथे बेचेन आहे. त्यामुळेच तो यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो आहे. किमान कुणीतरी असा मार्ग दाखवावा अशी त्याची अपेक्षा आहे. निदान कुणीतरी या सर्वांचे योग्य वर्गीकरण करून नकोशा गोष्टी काढून टाकत चांगल्या आनंददायी गोष्टी व्यवस्थित आवरून ठेवाव्यात जेणेकरून जगण्याला एक शिस्त लागून जगणे आनंददायी सुलभ होईल या गोष्टीची कवी वाट पाहत आहे.
आपली प्रत्येकाची पण अशीच अवस्था असते. घरात साठवलेल्या अडगळीतल्या वस्तू आपण निवड करून कमी करू शकतो. नकोश्या गोष्टी टाकून देऊ शकतो. पण मनाच्या अडगळीचे काय करायचे ? त्यातून पूर्ण सुटका कधीच होत नाही. तिथे ‘क्लियर चॅट’चे बटन नसतेच. मनाला योग्य दिशा दाखवत त्याचा पसारा कमी करणे हे शेवटी आपल्याच हातात असते. खरंतर माणसाला स्मृती आणि विस्मृती ही दोन मोठी वरदान लाभलेली आहेत. त्यांचा योग्य समन्वय साधत यातून मार्ग निघू शकतो. याच अडगळीवर डॉ .निशिकांत श्रोत्रींची ही अडगळीची खोली कविता अतिशय सुंदर सखोल असे भाष्य करते.
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
१०/०८/२०२३
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈