सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ आत्मविश्वासकवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

तरुण वयात, उमेदीच्या काळात स्वतःची महत्त्वाकांक्षा, इच्छाशक्ती आणि क्षमता यावर ठाम विश्वास असतो. अशावेळी काही भरीव कामगिरी, समाजोपयोगी काही मोठे कार्य करण्याची उर्मी असते. पण अशावेळी समाजातील नकारात्मक प्रवृत्तींचा विरोध, अडथळे यांचा सामनाही करावा लागतो. शेवटी स्वप्न अर्धवट सोडायची देखील वेळ येते. अशा काही चांगलं करू पाहणाऱ्यांचा संघर्ष डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी ” आत्मविश्वास ” या त्यांच्या कवितेत मांडला आहे. आज आपण या कवितेचा रसास्वाद घेणार आहोत

☆ आत्मविश्वास ☆

पंख फुटले बळकटसे

रंगेबेरंगी पिसांचे

मोठ्या अभिमानाने अन् कौतुकाने

वळवून डौलदार मान

नजर टाकली त्यांच्याकडे

हरखून गेलो पाहून

त्यांच्यावरचे अभेद्य कवच

 

झेपावलो —- विस्तीर्ण आकाशी

विसंबून त्या पंखांच्या बळावर

मनात आकांक्षा

विजिगीषु गगनभरारीची —

— ब्रह्मांडाला गंवसणी घालायची

 

घेतांना वेध शब्दजाचा

जाणवली त्याची अथांगता

अन् तरीही असहाय्यता

क्षितिजाला गंवसणी घालून

आपल्या कवेत सामावण्याच्या

एका केविलवाण्या प्रयत्नाची

 

हबकलो क्षणभर

नजरेच्या कवेपेक्षासी विस्तीर्ण

व्योमाच्या दर्शनाने

तरी आत्मविश्वास मात्र

आशेची कास धरून होता

पंखांमधल्या ताकतीची —-

— त्यांच्यावरच्या अभेद्य कवचाची

 

क्षण आला वज्रासारखा

निष्ठुरपणे भेदून टाकायला जेव्हा

मनाचाच आत्मविश्वास

साहजिकच नजर वळली

पंखांकडे, पिसांकडे

अन् त्या अभेद्य कवचाकडे

पकडू ठेवायला निसटणारा आत्मविश्वास

 

मात्र,

जेव्हा का दिसले ते काळे ढग

त्याच्यावर स्वार

भेदक सौदामिनी

अन् त्यावर बसून

खंवटपणे वेडावणारे

खत्रूड डोमकावळे

तेव्हा मात्र धास्तावलो

 

विश्वास सारा

कर्तव्याच्या पंखांचा

कर्मांच्या पिसांत

आणि संस्कारांच्या कवचात

 

पण हे सगळंच

ठिसूळ ठरतंय

डोमकावळ्यांना मिळालेल्या

विचित्र भेसूर वरदहस्तानं

—– जाणवलं —–

मग मात्र ढेपाळलो

पंखांतील शक्ती ढासळू लागली

आता भीती एकच

आत्मविश्वासाला तडा गेलेले

संस्काराच्या कवचाचे पंख

सुरक्षित नेतील का

परत घरट्यात तरी?

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

पंख फुटले बळकटसे

रंगेबेरंगी पिसांचे

मोठ्या अभिमानाने अन् कौतुकाने

वळवून डौलदार मान

नजर टाकली त्यांच्याकडे

हरखून गेलो पाहून

त्यांच्यावरचे अभेद्य कवच

मुक्तछंदातील प्रथम पुरुषी एकवचनातील ही कविता पूर्ण रूपकात्मक आहे. अतिशय कर्तबगार, महत्त्वाकांक्षी तरुणासाठी रंगीबेरंगी पिसांच्या देखण्या पक्षाचे रूपक योजले आहे. त्या पक्षाच्या वर्णनातून त्या महत्वाकांक्षी तरूणाचे यथार्थ वर्णन केलेले आहे. पक्षी मोठ्या अभिमानाने आपली डौलदार मान वळवून आपल्या रंगीत पिसांकडे पहातो. त्यांच्या बळकटपणाचे त्याला फार कौतुक वाटते. आपल्या पिसांचा त्याला फार अभिमान वाटतो.

तसाच कवी तरुण सळसळत्या उत्साहाचा आहे. चांगले शिक्षण घेतले. मनात जबरदस्त इच्छाशक्ती आहे. आपल्या क्षमतांवर विश्वास असणारा तो ‘काय करू आणि काय नको ‘ अशी त्याची अवस्था आहे.  त्याच्या वागण्या बोलण्यात आपल्या प्राविण्याने, क्षमतांमुळे एक प्रकारचा रुबाब दौल आहे. त्याच्या कृतीतून ती ऐट, अभिमान डोकावतो हे डौलदार मान वळवणे या शब्दातून व्यक्त होते. असा तो आपल्याशी भरभरून बोलतो आहे.

झेपावलो… विस्तीर्ण आकाशी

विसंबून त्या पंखांच्या बळावर

मनात आकांक्षा

विजिगीषु गगनभरारीची….

… ब्रम्हांडाला याची गवसणी घालायची

कवीने विस्तीर्ण आकाशात झेप घेतली. त्याला आपल्या क्षमतांवर, कार्यकर्तृत्वावर अतूट विश्वास होता. त्यांच्या भरवशावरच त्यांनी या ब्रम्हांडाला गवसणी घालण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीत जग जिंकण्याच्या जबरदस्त महत्वाकांक्षेने गगनभरारी घेतली. सर्वसमावेशक असे काहीतरी मोठे भव्यदिव्य करण्याचे त्याचे ध्येय होते. त्यासाठी त्याने ही झेप घेतली होती.

घेताना वेध शब्दजाचा

जाणवली त्याची अथांगता 

अन् तरीही असहायता ?

क्षितिजाला गवसणी घालून

आपल्या कवेत सामावण्याच्या

एका केविलवाण्या प्रयत्नाची

गगनभरारी तर घेतली खरी पण या विस्तीर्ण आकाशाची अथांगता अनुभवल्यावर अवघे क्षितिज आपल्या कवेत घेण्याचे प्रयत्न केविलवाणे वाटू लागले आणि असहाय्यता जाणवू लागली.

कवीच्या मनाने सर्वांच्या उद्धारासाठी काहीतरी मोठे समाजकार्य करण्याचे ठरवून मनाने भरारी घेतली होती. पण त्याची विस्तीर्ण कार्यकक्षा, त्यासाठी करावे लागणारे प्रचंड कार्य, नियोजन यांचा आवाका बघून कवीला थोडी असहाय्यता जाणवू लागली. त्यासाठी आपले प्रयत्न अपुरे पडतील का असेही वाटू लागले.

हबकलो क्षणभर

नजरेच्या कवेपेक्षाही विस्तीर्ण

जीवनाच्या दर्शनाने

तरी आत्मविश्वास मात्र

आशेची कास धरून होता

पंखांमधल्या ताकतीची…

….. त्यांच्यावरच्या अभेद्य कवचाची

आपल्या दृष्टीच्या आवाक्यापेक्षाही विस्तीर्ण अंतरिक्ष म्हणजेच आपले अफाट कार्यक्षेत्र पाहून कवी थबकलाच. पण क्षणभरच. आपल्याला हे कार्य जमेल की नाही असेही क्षणभर त्याला वाटले. पण तेही क्षणभरच.  कारण त्याचा आपल्या कर्तृत्वावर, क्षमतांवर, निर्णयावर गाढ विश्वास होता. त्यामुळेच हे कार्य आपण निश्चितपणे करू शकू ही ठाम आशा तो मनात बाळगून होता.

क्षण आला वज्रासारखा

निष्ठूरपणे भेदून टाकायला जेव्हा

मनाचाच आत्मविश्वास

साहजिकच नजर वळली

पंखांकडे, पिसांकडे

अन त्या अभेद्य कवचाकडे

पकडून ठेवायला निसटणारा आत्मविश्वास

कुणीही आपल्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी काही वेगळे करत असेल तर त्याचे कुणाला सोयरसुतक नसते. पण तो जर दुसऱ्यांसाठी, समाजासाठी काही उदात्त हेतूने चांगले कार्य करू पहात असेल तर मात्र काही विघ्नसंतोषी माणसे त्याच्या मार्गात आडवी येतात. त्याला यश मिळू नये म्हणून ते छुपी कारस्थाने करून त्याच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. तो स्वतःच मनाने खचून हे कार्य थांबवेल असे त्यांना वाटत असते. त्यासाठी आत्मविश्वास ढळेल अशी परिस्थिती ते निर्माण करतात .पण आपला आत्मविश्वास शाबूत ठेवण्यासाठी तो आपल्या क्षमता, मनोनिग्रह, आपले नियोजन यासर्व गोष्टी पुन्हा पुन्हा पडताळून पहातो आणि आपल्या मार्गावर चालायचा प्रयत्न करतो.

मात्र जेव्हा का दिसले ते काळे ढग

त्याच्यावर स्वार

भेदक सौदामिनी

अन त्यावर बसून

खवटपणे वेडावणारे

खत्रुड डोमकावळे

तेव्हा मात्र धास्तावलो

जेव्हा त्याने पाहिले, आपल्या विरुद्ध समाजातील नकारात्मक प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. अशा नकारात्मक प्रवृत्तींना खतपाणी घालून त्यांचे उदात्तीकरण करण्याचा कुटील उद्योग काहीजण करत आहेत. अशी माणसे स्वतःचे महत्त्व शाबूत ठेवण्यासाठी आणि समाज एकत्र येऊ नये म्हणून काहीही करून समाजात फूट पाडत आहेत. चांगल्याच्या पायात खोडा घालणे हाच त्यांचा उद्देश बघून तो धास्तावून गेला.

इथे काळे ढग म्हणजे समाजातील या नकारात्मक प्रवृत्ती, त्यांचे झगमगते उदातीकरण म्हणजे भेदक सौदामिनी आणि आपले समाजातले महत्त्व, ताकद कमी होऊ नये म्हणून कुठल्याही गैरमार्गाचा बिनधास्त वापर करणारे आपमतलबी लोक म्हणजे डोमकावळे या रूपकांमधून कवीने समाजातील या दुष्प्रवृत्तींचे अचूक वर्णन केलेले आहे.

विश्वास सारा

कर्तव्याच्या पंखांचा

कर्मांच्या पिसांत

आणि संस्कारांच्या कवचात

 

पण हे सगळंच

ठिसूळ ठरतंय

डोमकावळ्यांना मिळालेल्या

विचित्र भेसूर वरदहस्तानं

………. जाणवलं……….

 मग मात्र ढेपाळलो

पंखातील शक्ती ढासळू लागली

आता भीती एकच

आत्मविश्वासाला तडा गेलेले

संस्काराच्या कवचाचे पंख

सुरक्षित नेतील का

परत घरट्यात तरी ?

कवी धास्तावला होता. तरीही त्याचा स्वतःच्या कार्यकर्तृत्वावरचा, स्वतःवरील संस्कारांवरचा विश्वास ठाम होता. पण जेव्हा कवीने हे पाहिले की, ‘ जे आपमतलबी लोक असे अडथळे आणत आहेत, लोकआंदोलन  घडवून आणत आहेत त्यांना विरोध करायचं सोडून लोक त्यांनाच पाठिंबा देत आहेत आणि ज्यांच्यासाठी कवी चांगले उदात्त काही करू पाहतोय त्यालाच  त्यांचा पाठिंबा मिळत नाही. त्या विरुद्ध काही केले तरी आपली ताकद कमी पडते आहे,’ तेव्हा मात्र त्याचा आत्मविश्वास पूर्ण ढेपाळला.

या सर्व नकारात्मक प्रवाहात आपण वहावत तर जाणार नाही ना कुठे, अनवधानाने प्रलोभनांना बळी तर पडणार नाही ना अशी त्याला आता वेगळीच भीती वाटू लागली. आपली तत्त्वे, आपले संस्कार यांच्या आधाराने आपण घरात तरी सुरक्षित राहू शकू की नाही अशी शंका सतावू लागली.

एखादा वेगळा उद्योग सुरू करून जम बसवलाय,  चांगली संस्था सुरू केलीय अन् ती लोकप्रिय होतेय असे पाहिले की त्याला पुरते नेस्तनाबूत करण्यासाठी काही विघ्नसंतोषी माणसे कशी खोडा घालतात, त्यांच्याविरुद्ध लोकांना भडकवतात अशी उदाहरणे आपण समाजात नेहमी बघत असतो. आपल्या चांगल्या कामामुळे काही लोक यशस्वी होतात, समाज मान्यता मिळवतात हे अशा काही जणांना खटकते आणि ते त्यांना बदनाम करून त्यांच्या कामात विघ्न आणून स्वतः समाजात मोठे होतात. सतत आपले वर्चस्व कायम राखण्याचा प्रयत्न करतात.

या कवितेत रुबाबदार देखणा पक्षी म्हणजे तो ध्येयासक्त, महत्वाकांक्षी तरूण, काळे ढग म्हणजे नकारात्मक प्रवृत्ती, त्या प्रवृत्तींचे उदात्तीकरण म्हणजे भेदक सौदामिनी, समाजातले आपले महत्त्व, ताकद कमी होऊ नये म्हणून कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब करणारे आपमतलबी लोक म्हणजे हे डोमकावळे या रूपकांमुळे कवीची भूमिका अचूक आणि  स्पष्टपणे विशद होते.

अभेद्य म्हणजे भेदण्यास कठीण असे कवच, विजिगीषु  गगनभरारी म्हणजे कोणत्याही परिस्थितीत विजयी होणार या विश्वासाने घेतलेली झेप, ब्रम्हांडाला क्षितिजाला गवसणी म्हणजे अतिशय अशक्य गोष्ट करायला धावाधाव करणे, शब्दज म्हणजे आकाश, अथांगता, व्योम म्हणजे अंतरिक्ष, वज्र म्हणजे कठोर, भेदक सौदामिनी, खत्रूड म्हणजे कृश मरतुकडे डोमकावळे यासारखे आशयघन अनोखे शब्द अचूक वापरल्याने कवितेला एक छान शब्दवैभव प्राप्त झालेले आहे. अशा रीतीने समाजोध्दार किंवा चांगली समाजसेवा करू पहाणारा आणि समाजविघातक प्रवृत्ती यांच्यातल्या संघर्षाची कहाणी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी ‘आत्मविश्वास’ या कवितेत अतिशय परिणामकारकपणे सांगितलेली आहे.

रसास्वाद:

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

१०/०८/२०२३

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments