सुश्री अरुणा मुल्हेरकर

? काव्यानंद ?

☆ मुक्त… – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

मुक्त (गझल~सौ. राधिका भांडारकर)

रसग्रहण

आयुष्यात सर्वच गोष्टी मनाप्रमाणे होत नसतात. जे आपल्याला हवं असतं ते मिळतच असंही नाही. पण हवं असलेलं न मिळाल्यामुळे आयुष्य थांबत नाही. ते पुढे जात असतं, त्यासाठी अनेक वाटा असतात आणि त्यातलीच एखादी वाट भविष्यासाठी निवडायची असते. आपलं वर्तमान आपण जगायचं असतं अर्थात जगताना भूतकाळाचा कप्पा मधून मधून किलकिला होतो आणि त्यातून पुन्हा झिरपणाऱ्या कवडशाने कधी कधी मन व्याथितही होतं. अशाच आशयाची सौ. राधिका भांडारकर यांची मुक्त ही गझल नुकतीच वाचनात आली आणि त्याचा रसास्वादही घ्यावासा वाटला.

सौ राधिका भांडारकर

☆ मुक्त ☆

अपराध काय माझा भांबावले कशाला

वाटेतल्या रिपुंना  ओवाळले कशाला

*

नव्हते कधीच माझे ते दूर ठेविले मी

कळले जरी मला हे मी त्रासले कशाला

*

वेडातल्या स्मृतींना केव्हांच दूर केले

आता उगा उजाळी पाणावले कशाला

*

डोळ्यातल्या छबीला पुसलेच मी जरीही

आता फिरोनि दुःखा कुरवाळले कशाला

*

अंधार जात आहे वाटेतल्या उजेडी

मुक्तीतल्या मनाला मी बांधले कशाला

 – राधिका भांडारकर

ही गझल वाचल्यावर प्रथम असेच वाटले की ही एका असफल प्रेमाची वेदना असावी. अर्थात हे प्रेम एखाद्या मित्रावरचे असेल, अथवा मैत्रिणीवरही  असू शकते. शिवाय प्रेमाचे रंगही वेगळे असतात. प्रेम म्हणजे प्रीत. प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी वाटणारा लोभ, ओढही असू शकते .शिवाय प्रेमात देवाणघेवाण अपेक्षित असते ती जर नसेल तर असे प्रेम एकतर्फी असू शकते आणि ते मनाला वेदना देणारे ठरू शकते असा काहीसा सूर या गझलेत नक्कीच जाणवतो. हा स्वतः कवयित्रीचा अनुभव असेल किंवा तिच्या सहवासातल्या  एखाद्या व्यक्तीविषयीचं कवीने टिपलेलं मनही असू शकतं.

मतल्यातच कवयित्री म्हणते

अपराध काय माझा भांबावले कशाला वाटेतल्या रिपुंना ओवाळले कशाला…

मी प्रेम केलं हा काय माझा अपराध आहे का? जरी ते सफल झालं नाही तरी मला सैरभैर होण्याची काय गरज आहे? या माझ्या असफल प्रेमाबाबत मला सल्ला देणारे अनेक भेटले. वरवर मला ते चांगले वाटायचे, खरे वाटायचे म्हणून मी त्यांना त्यावेळी मानही दिला. पण त्याही बाबतीत माझी निराशाच झाली ते केवळ हितशत्रूच होते आणि त्यांना मी विनाकारणच महत्त्व दिले असे आता वाटते.

इथे भांबावले हे क्रियापद मनाच्या सैरभैरतेची जाणीव देते आणि ओवाळले म्हणजे महत्त्व दिले याअर्थी असावे.

नव्हते कधीच माझे ते दूर ठेवले मी कळले जरी मला हे मी त्रासले कशाला

मला पक्कं माहित होतं की ज्याची मी मनी ओढ धरली होती ती व्यक्ती माझ्यासाठी कधीच असणार नव्हती आणि म्हणूनच मी त्याही वेळेला जाणून बुजून त्या व्यक्तीला दूरच ठेवले होते. माझ्या मनाची तशी पूर्ण तयारी होती मग आता त्या नकारात्मकतेचा मी कशाला त्रास करून घेऊ?

नाहीच घेणार

हे त्यामागचं अव्यक्त उत्तरही या पंक्तीत जाणकार वाचकाला सहज मिळून जातं.

वेडातल्या स्मृतींना केव्हाच दूर केले आता उगा उजाळी पाणावले कशाला..

काळ कोणासाठी थांबत नाही तो पुढे वाहतो शिवाय काळाबरोबर भावनाही स्वाभाविकपणे बोथट होतात पण असा एखादा क्षण निवांतपणे सहज मनावर रेंगाळतो तो असतो आठवणींचा. पण मनावर ताबा मिळवण्यासाठी कवयित्री पुन्हा पुन्हा म्हणते !”छे! आता कशाला त्या आठवणी? वेड्या, अनघड, अजाण वयातलं ते सारं काही केव्हाच पुसून टाकलय्  मग आता पुन्हा कशापायी त्यात गुंतून उदास व्हायचं?

डोळ्यातल्या छबिला पुसलेच मी जरीही आता फिरोनी  दुःखा कुरवाळले कशाला

आता त्या व्यक्तीचा चेहराही मला आठवत नाही इतका काळ व्यथित झाला आहे मग आता गेल्या गोष्टीची खंत कशासाठी बाळगायची?

या शेरातल्या दोन पंक्ती कवयित्रीच्या मनाचा एक ठाम कल व्यक्त करतात.

आता फिरोनी दुःखा कुरवाळले कशाला या त्यांनी स्वतःच्या मनाला विचारलेल्या प्रश्नातच एक उत्तर दडलेलं आहे …आता सगळंच पुसलंय आणि भूतकाळाविषयी मला जराही खेद वाटत नाही.

अंधार जात आहे वाटेतल्या उजेडी मुक्तीतल्या मनाला मी बांधले कशाला

आता आयुष्यातला तो अंधकार जाऊन वाटा  प्रकाशमय झाल्या आहेत. यातला दडलेला अर्थ असा आहे की स्वतःची चूक समजल्यामुळे आता आयुष्याचा पट लख्ख झाला आहे आता त्या सर्वांतूनच मी मुक्त आहे मग का मी माझं मन अजूनही त्या गतस्मृतींत गुंतवून ठेवू? पुन्हा यातलं अलिखित उत्तर… मी आता गुंतून राहणारच नाही, कारण आता मी या साऱ्यातून कधीच मुक्त झाले आहे.

याच गझलेला आणखी एका वेगळ्या अर्थातही  पाहता येईल.

सहजीवनात, आपल्या जोडीदाराविषयी आपल्या काही अपेक्षा किंवा कल्पना असतात आणि आता मागे वळून पाहताना कवयित्रीला वाटत आहे की अशा कल्पना, अपेक्षा बाळगणे काही चुकीचे होते का? कदाचित या कल्पनांच्या निर्मितीमागे आपल्या सभोवतालची माणसेच असतील ज्यांच्या सांगण्यामुळे आपण प्रवृत्त होत गेलो. आता मात्र वाटत आहे की त्यांचं आपण कां  ऐकलं?

खरं म्हणजे जे कधीही घडू शकणार नव्हतं, बदलू शकणार नव्हतं त्या  सहजीवनाविषयीच्या कल्पना बाळगून आपण कां त्रास करून घेतला? आता आपण मनातून काढून टाकलेत ते विचार मग तरी कधी कधी डोळे का पाणावतात?

जे जीवनाचं चित्र रेखाटलं होतं ते प्रत्यक्षातून आता पुसूनच टाकले आहे मग त्याच त्याच विचाराने पुन्हा पुन्हा का खेद करायचा?

आता आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहोत की मन स्थिर आहे, स्वीकृत आहे. कदाचित तो अविचार असेल, अविवेकी बुद्धीतून ते उपजलं असेल पण आता या साऱ्या कल्पना, अपेक्षांच्या पलीकडे मन गेले आहे, आता ते मुक्त आहे. आणि या मुक्ततेतच मला राहायचं आहे

राधिका भांडारकर यांची ही गझल वरवर जरी व्यथित मनाची कहाणी वाटत असली तरी वास्तवात ती तशी नाही हे विचारांती जाणवते. कवयित्रीचं एक कणखर आणि ठाम मन त्यामागे असल्याचं जाणवतं आणि ते अत्यंत सकारात्मक आहे. “झालं गेलं विसरून जावे आणि पुढे जावे” असा एक सुरेख संदेश त्यांनी यातून दिला आहे. जीवन हे वर्तमानात जगावे. भूतकाळाच्या वेदनेची सावली त्यावर कशाला पडू द्यायची असा एक स्थिर मनाचा विचार त्यांच्या या गझलेत दडलेला आहे आणि म्हणूनच ही गझल मनाला भावते. पटकन “वा!” अशी दाद दिली जाते.

राधिका भांडारकर यांची ही गझल आनंदकंद वृत्तात बांधलेली आहे मतला आणि चार शेर अशी या गझलेची बांधणी आहे. कशाला हा रदीफ आहे आणि भांबावले, ओवाळले, त्रासले, पाणावले, कुरवाळले,बांधले या कवाफी  गझलेची खयालयात उत्तमपणे राखतात. खरोखरच एक छान अर्थ देणारी मनावर रेंगाळणारी अशी ही सुरेख गझल… मुक्त

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments