सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ संधीप्रकाश… – कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री  ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

निवृत्ती हा आयुष्यातील अवघड कालखंड असतो. शरीराने ज्येष्ठत्वाकडे झुकलेला पण मनाने अजूनही कार्यक्षम अशा अवस्थेत मनाची कुतरओढ होते. डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी त्यांच्या “संधीप्रकाश” या कवितेत याच अवस्थेतील मनस्थिती मांडली आहे. आपण या कवितेचा आता रसास्वाद घेणार आहोत.

☆ संधीप्रकाश ☆

घेरून टाकलं अचानक मला

मनाला मरगळ आणणाऱ्या

त्या अंधूक संधीप्रकाशांनं 

अन् बावरून गेलो मी एकदम

*

ना त्यावेळी पुरेसा सूर्यप्रकाश

तर विजेच्या दिव्यांचा पिवळा उजेड कुचकामाचा

सारी दृष्टीच होऊ लागली होती

भेसूरपणे धूसर

*

गर्क झालो होतो इतका

माझ्या यशोमार्गक्रमणात

उमगलंच नाही मला

त्या संधीप्रकाशाचं स्वरूप …..

पहाटेचा की कातरवेळेचा ….. ?

*

ते काही नाही !

टाळलाच पाहिजे

हा मळभ वाढविणारा

धूसर संधीप्रकाश

धावलंच पाहिजे प्रकाशाकडे;

अन्  मग काय …..

सुटलो धावत

जीवाच्या आकांताने

मागे टाकायला

त्या अशुभ संधीप्रकाशाला

*

धावतोय धावतोय केव्हाचा

लाज वाटली असती सुवर्णकन्येला

इतका धावलो ….. इतका धावलो

पण संधीप्रकाश काही मागे पडेच ना

*

 मनावरचं मळभ दाटतच होतं

भेसूरता वाढवतच होतं

कसं टाकावं मागे

सिंदबादच्या मानगुटीवर बसलेल्या म्हाताऱ्यासारख्या

लोचट संधीप्रकाशाला

काहीच उमगत नव्हतं

किती जोरात धावू अजून ?

छातीचा भाता फुटेल ना !

*

अन् अचानक लख्ख विजेसारखा

प्रकाश चमकला

माझ्या धूसर मनात …..

भेदरवणाऱ्या शंकेच्या स्वरूपात …..

धावत तर नाही मी

या संधीप्रकाशाबरोबरच …..

नेमकं उलट्या दिशेने ?

©️ डॉ‌. निशिकांत श्रोत्री

९८९०११७७५४

घेरून टाकलं अचानक मला

मनाला मरगळ आणणाऱ्या

त्या अंधूक संधीप्रकाशानं

अन् बावरून गेलो मी एकदम

पूर्ण रूपकात्मक असणारी ही कविता मुक्तछंदातील प्रथम पुरुषी एकवचनातील आहे. आयुष्यातील एका महत्त्वाच्या वळणावर पोहोचल्यावर प्राप्त परिस्थितीने गांगरलेला कवी आपली मनोव्यथा सांगतो आहे. अखंड कार्यरत असणारा कवी कालपरत्वे निवृत्तीच्या वयावर येऊन ठेपला. वय विसरून काम करताना अचानक सामोऱ्या आलेल्या निवृत्तीने तो कावराबावरा होतो. मनाला एक प्रकारची मरगळ आल्याने गोंधळून जातो.

इथे संधीप्रकाश हे निवृत्तीसाठी योजलेले रूपक आहे. त्यावेळी उजेड मंदावतो. एक विचित्र उदासी मनाला घेरून टाकते. इथे तशीच अवस्था निवृत्त होण्याच्या विचाराने कवीची झालेली आहे.

ना त्यावेळी पुरेसा सूर्यप्रकाश

तर विजेच्या दिव्यांचा पिवळा उजेड कुचकामाचा

सारी दृष्टी होऊ लागली होती

भेसूरपणे धूसर

इथे कवीने सूर्यप्रकाश, दिव्यांचा पिवळा उजेड ही रूपके वापरली आहेत ती उमेद म्हणजे जोम असणे आणि क्षमता कमी होणे यासाठी. तरुणपणात अंगात जोम असतो, मनात उमेद असते. आता वाढत्या वयाबरोबर तेवढी क्षमता राहिलेली नाही. आता आपली ताकद कमी पडेल अशी जाणीव व्हायला लागल्याने कवी बावचळून जातो आणि आता कसे होणार ही भीती त्याला सतावू लागते.

गर्क झालो होतो इतका

माझ्या यशोमार्गक्रमणात

उमगलंच नाही मला

त्या संधीप्रकाशाचं स्वरूप…..

पहाटेचा की कातरवेळचा…….?

कवी आपल्या कामकाजात इतका गढून गेलेला होता, यशोमार्गावर चालण्यासाठी अगदी झोकून देऊन कार्यरत होता की त्याला संधीप्रकाश दाटून आलेला कळलेच नाही आणि म्हणूनच क्षणभर त्याला हे लक्षातच येईना की हा संधीप्रकाश पहाटेचा आहे का संध्याकाळचा ?

पहाटे आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला संधीप्रकाश पसरतो. पहाटेच्या संधीप्रकाशा नंतर लख्ख सूर्यप्रकाश पसरतो आणि आपण मोठ्या उमेदीने कामाला लागतो. तेच संध्याकाळच्या संधीप्रकाशाने हळूहळू उजेड कमी होत जाऊन अंधार वेढून येतो आणि आपोआप काम थंडावते. नेमकी अशीच अवस्था वाढत्या वयाच्या निवृत्तीमुळे होते. पण कामाच्या तंद्रीत ही गोष्ट कवीला वेळेवर लक्षात येत नाही.

ते काही नाही !

टाळलाच पाहिजे

हा मळभ वाढविणारा

धूसर संधीप्रकाश

धावलंच पाहिजे प्रकाशाकडे ;

अन् मग काय…..

सुटलो धावत

जीवाच्या आकांताने

मागे टाकायला

त्या अशुभ संधीप्रकाशाला

 

धावतोय धावतोय केव्हाचा

लाज वाटली असती सुवर्णकन्येला

इतका धावलो….. इतका धावलो

पण संधीप्रकाश काही मागे पडेच ना

अजून सकाळ आहे, अजून खूप काम करायचं आहे असं मनात असतानाच संध्याकाळ झालेली जाणवल्यामुळे कवीची दोलायमान अवस्था होते. मग तो ही निवृत्ती, हा संधीप्रकाश पुढे ढकलण्यासाठी जीवतोड मेहनत करायच्या मागे लागतो. जिद्दीने काम करून निवृत्ती टाळायचा प्रयत्न करू लागतो. पण त्यामुळे आणखीन आणखीनच थकू लागतो. इथे सुवर्णकन्या हे मेहनती तरुणांचे रूपक आहे.

कवी सुध्दा तरूणांना लाजवेल इतकी मेहनत घेतो. पण त्यामुळे त्याची ताकद आणखी कमी होऊ लागते. वयाचा आणि कामाचा मेळच बसत नाही. कारण मनाची उभारी अजून शाबूत आहे पण शरीरच त्याला साथ देत नाही ही अवस्था म्हणजेच संधीप्रकाश. त्यामुळे कितीही जरी प्रयत्न केले तरी ही निवृत्ती कवीला किंवा कुणालाच टाळता येत नाही हेच सत्य आहे.

मनावरचं मळभ दाटतच होतं

भेसूरता वाढवतच होतं

कसं टाकावं मागे

सिंदबादच्या मानगुटीवर बसलेल्या म्हाताऱ्यासारख्या

लोचट संधीप्रकाशाला

काहीच उमगत नव्हतं

किती जोरात धावू अजून

छातीचा भाता फुटेल ना !

कवीने कितीही प्रयत्न केला तरी तो पूर्वीच्या जोमाने काम करू शकत नव्हता‌. निवृत्तिचा संधीप्रकाश टाळू शकत नव्हता. त्यामुळे आता नेमके काय करावे हा त्याला प्रश्न पडला होता. सिंदबादच्या मानगुटीवरचा म्हातारा जसा खाली उतरत नाही, चिकटूनच बसतो. तशीच ही निवृत्ती पण आता लोचटासारखी कवीच्या मानगुटीवरच बसली आहे. कितीही झटकली तरी ती खाली उतरत नाही, दूर होत नाही. त्यामुळे कवी भांबावून गेला आहे. अती धावाधाव केल्याने त्याची पूरती दमछाक झाली आहे. या नादात काही विपरीत घडू नये अशी त्याला आशा आहे.

सिंदबादच्या मानगुटीवरचा म्हातारा ही उपमा या निवृत्तीला चपखल लागू पडते आहे.  कितीही प्रयत्न केला तरी कवीची त्यापासून सुटका होत नाही.

अन् अचानक लख्ख विजेसारखा

प्रकाश चमकला

माझ्या धूसर मनात

भेदरवणाऱ्या शंकेच्या स्वरूपात

धावत तर नाही मी

या संधीप्रकाशा बरोबरच…..

नेमकं उलट्या दिशेने ?

बेसावध कवीला निवृत्तीने गाठले. त्याचे मन ते स्वीकारायला तयार नाही. मग तो जास्ती जोमाने राहिलेली कामे करायला लागतो आणि जास्तच थकून जातो. हे पाहिल्यावर तो सावध होतो आणि त्याला आपली चूक लक्षात येते. ‘आपल्या या आततायी वागण्याने निवृत्ती पासून दूर जायच्या ऐवजी आपण जास्त कमजोर बनत निवृत्तीच्या बाजूला धावतो आहोत ‘ हे पाहून मनाने ठरविलेल्या मार्गाच्या उलट आपण धावतोय हे त्याच्या लक्षात येते.

सर्वसामान्यपणे आपण योग्य वयात आपल्या कामधंद्याला लागतो. संसार सुरू होतो. असंख्य जबाबदाऱ्या, योजना, ध्येयं, उद्दिष्टे साध्य करण्यात आपण पूर्णपणे गढून जातो. पण पुढे जाणारा काळ त्याचे काम करीत असतो. यथावकाश आपले वय वाढत जाते. कार्यक्षमता कमी होत जाते आणि एक दिवस या कामातून आता निवृत्त व्हायला हवे असा क्षण येऊन ठेपतो. कामाच्या नादात आपल्या कार्यकाळाची संध्याकाळ समोर दाटून आली आहे हे आपल्या लक्षातच येत नाही.

अजून कितीतरी गोष्टी करायचे बेत आखलेले असतात. काही कामे अर्धवट असतात. मनातली उभारी अजून तशीच असते पण शरीर पूर्वीसारखे आता नीट साथ देत नाही ही वस्तुस्थिती असते. कामे अजून व्हायचीत अन हाताशी वेळ कमी आहे या परिस्थितीत मनाची ओढाताण होते आणि अट्टाहासाने मन पुन्हा नेटाने काम करायला लागते. पण त्यामुळे निवृत्ती पुढे जायच्या ऐवजी आपली आणखी दमछाक होते. शरीर आणखीनच थकल्याने उलट निवृत्तीला आपणच जवळ ओढल्यासारखे होते. आयुष्यभर उत्तम रीतीने कार्यरत असणाऱ्यांची ही सर्व घालमेल कवीने इथे अतिशय समर्पक शब्दात मांडली आहे.

कवितेची सौंदर्यस्थळे :– ही कविता पूर्ण रूपकात्मक आहे. आयुष्याच्या संध्याकाळी येणारी निवृत्ती म्हणजे मळभ दाटवणारा संधीप्रकाश हे रूपक त्या वेळची परिस्थिती अचूकपणे स्पष्ट करते. ‘सूर्यप्रकाश ‘हे रूपक तरुणवयातला जोम, उमेद तर ‘दिव्यांचा पिवळा प्रकाश’ हे क्षमता कमी होण्याची स्थिती उलगडतात.

‘सुवर्णकन्या’ हे अव्याहतपणे ध्येयासाठी कार्यरत तरुणांचे रूपक आहे. कितीही प्रयत्न केला तरी लोचटासारखी चिकटलेली निवृत्ती कितीही झटकली तरी दूर होत नाही. यासाठी ‘सिंदबादच्या मानगुटीवरचा म्हातारा’ ही उपमा अगदी अचूक ठरते. ‘धूसर मन’ म्हणजे नीट दिसत नाही अशी बावचळलेली मनाची अवस्था.

ही सर्व रूपके, उपमा प्रत्येकाच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्याचे अचूक वर्णन करत त्या अनुभवाचा पुन:प्रत्यय देतात.

प्रत्येकाच्या आयुष्यातील निवृत्तीचा काळ म्हणजे जेव्हा मनाची उभारी अजून पूर्वीसारखीच आहे पण त्याला वाढत्या वयातील शरीर तेवढी साथ देत नाही‌ तो कालखंड. अशावेळी अजून बरीच स्वप्नं खुणावत असतात पण ती पूर्ण होतील की नाही या शंकेने उलघाल होते. वाढत्या वयाचा आणि कामाचा ताळमेळ न बसण्याची ही कातरवेळेची अवस्था कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी त्यांच्या ‘संधीप्रकाश’ या कवितेत अतिशय सुंदर समर्पक शब्दांत सांगितलेली आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

१०/०८/२०२३

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments