श्री प्रसाद जोग
काव्यानंद
☆माती सांगे कुंभाराला… कवी मधुकर जोशी ☆ रसग्रहण.. श्री प्रसाद जोग ☆
जीवनाचे अंतिम सत्य सांगणाऱ्या माती सांगे कुंभाराला या मधुकर जोशी यांच्या गीताविषयी :
संत कबीरांच्या “माटी कहे कुम्हार को” या भजनावरून. मधुकर जोशी यांना जे गाणे सुचले. त्याला श्री. गोविंद पोवळे यांनी सुंदर चाल लावून म्हटले आहे.
माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी
तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी !
जेव्हा एखादा कुंभार मातीची भांडी बनवत असतो त्यावेळेस त्याआधी तो त्या मातीला तुडवून घडण्या योग्य बनवत असतो. त्यानंतर तिला फिरत्या चाकावर ठेवून आपल्या हातांनी आकार देण्यास सुरुवात करतो. कालांतराने ती माती एका सुंदर वास्तूच्या रुपात सगळ्यां समोर येते. सगळे तिच कौतुक करू लागतात आणि त्याच वेळेस त्या मातीला आकार देणाऱ्या कुंभाराचा अहं देखील हळूहळू वाढू लागतो. या सगळ्याचा कर्ता “मी” आहे ही भावना दिवसेंदिवस त्याच्या मनात रुजू लागते आणि त्याच वेळेस त्याच्या अहंकाराच्या फुग्याला वेळीच फोडण्यासाठी कवी त्याला .वरील ओळींच्या माध्यमातून सावध करण्याचा प्रयत्न करतो आहे. थोडक्यात तो परमेश्वर / निसर्ग माणसाला वेळोवेळी अप्रत्यक्षपणे सूचित करीत असतो की तू कितीही फुशारक्या मारल्यास, कितीही यश मिळवलेस, तरी तुला या सगळ्याचा त्याग करून माझ्यातच समाविष्ट व्हायचे आहे.
मला फिरविशी तू चाकावर
घट मातीचे घडवी सुंदर
लग्नमंडपी कधी असे मी, कधी शवापाशी !
या ओळींमध्ये मातीच्या माध्यमातून कवी सुचवतो की, कित्येक वेळेस ज्ञानाच्या जोरावर आपल्या इच्छाशक्तीने तू काही काळापुरता जय मिळवतोस आणि समजतोस की हेच अंतिम सत्य आहे.पण प्रत्यक्षात मी अनादी अनंत आहे. एखादवेळेस तुझ्या लग्न मंडपात असणारा मी उद्या तुझ्या शवापाशी देखील असणार आहे.
वीर धुरंधर आले, गेले
पायी माझ्याइथे झोपले
कुब्जा अथवा मोहक युवती, अंती मजपाशी !
या ओळींमधून कवी माणसाला आठवण करून देतो कि, जसा आज तू स्वतःला कर्ता समजत आहेस तसेच यापूर्वीही अनेक जण होऊन गेले आहेत. अनेकांनी अनेक राज्ये स्थापिली, अनेक मान सन्मान मिळवले, अनेक पराक्रम गाजवले पण शेवटी त्यांना देखील माझ्यातच विलीन व्हावे लागले. माझ्या दृष्टीने सगळेच समान आहेत. मी कुणातही भेदाभेद करत नाही. माझा न्याय हा सगळ्यांसाठी सारखाच आहे. ज्यावेळेस तुमची माझ्यात विलीन होण्याची वेळ येते त्यावेळेस मग ती व्यक्ती कुरूप असो वा रुपगर्विता, राजा असो वा पराक्रमी सरदार… या गोष्टींचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही.
गर्वाने का ताठ राहसी ?
भाग्य कशाला उगा नासशी ?
तुझ्या ललाटी अखेर लिहिले मीलन माझ्याशी !
या कडव्यात कवी माणसाला सांगतो, उगाच वृथा अभिमान बाळगून का राहतोस? या गर्वाचा काहीही उपयोग होत नाही. झाला तर फक्त तोटाच होईल. एक लक्षात ठेव शेवटी तुला माझ्यातच विलीन व्हायचे आहे. त्यांमुळे गर्व सोड
मनुष्य स्वभावर भाष्य करणारे मधुकर जोशी यांचं हे गाणं ऐकून सारेच अंतर्मुख झाले असतील .
मधुकर जोशी यांना विनम्र अभिवादन.
© श्री प्रसाद जोग
सांगली
मो ९४२२०४११५०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈