सौ. ज्योत्स्ना तानवडे
☆ काव्यानंद ☆ झपूर्झा ☆ कवी स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆
रसग्रहण:
आयुष्यामध्ये कोणत्यातरी एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला; मग ती एखादी कला असो, संशोधन असो, वारी किंवा परिक्रमा असो, देशसेवा असो त्या ध्यासापायी सर्वस्व उधळून देणे, त्या ध्येयाची धुंदी चढून इतर जाणिवा नाहीशा होणे ही जी तन्मयतेची, तंद्रीची, झपाटलेपणाची स्थिती आहे तिला म्हटले आहे “झपूर्झा “.
असा एखादा ध्यास घेऊन,त्यासाठी जगाला विसरून बेभान अवस्थेत त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी ध्येयपूर्ती करून यशोगाथा लिहिल्या आहेत, त्यांना अवलिया, साधक असे म्हटले जाते. हर्ष, खेद, हास्य, शोक या भावनांच्या त्यांच्या जाणीवा बोथट झालेल्या असतात.जे इतरांना व्यर्थ वाटते त्यात त्यांना अर्थ भरलेला जाणवतो आणि त्या अर्थासाठी ते धडपडतात. हा अर्थ त्यांनाच दिसतो ज्यांना त्याचे वेड लागलेले असते. या अर्थाचे बोल कसे असतात तर “झपूर्झा गडे झपूर्झा. ”
जिथे कुणाला काही दिसत नाही अशा ज्ञाता पलीकडे अज्ञाताच्या अंधारात त्यांना काहीतरी जाणवते.वीज चमकून जावी तसे होते. त्या उजेडात अंधुक जाणीवा होतात. तिथे काहीतरी आहे हे जाणवते आणि ते त्याचा शोध घेण्यासाठी जीवाचे रान करतात. या जाणीवा गूढ गीते गातात. त्याचे बोल असतात “झपूर्झा गडे झपूर्झा.”
भुई नांगरलीच नाही तर पीक येईल कसे ? अशी कितीतरी जमीन नांगरल्याविनाच आहे. म्हणजेच विश्वात अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या आपल्याला ज्ञात नाहीत. त्यासाठी ते शोध घेत राहतात आणि शेवटी ते संशोधन फळाला येते. असंख्य शास्त्रज्ञांनी शोध लावले ते म्हणजे विश्वात असलेल्याच गोष्टींची उकल करून सर्वसामान्यांसाठी त्यांचे अस्तित्व सिद्ध करून दाखवले. त्यासाठी झपाटून शोधाचा ध्यास घेतला. त्यावेळचा मंत्र आहे “झपूर्झा गडे झपूर्झा.”
या विश्वाचा पसारा म्हणजे एक अवघड कोडे आहे. विश्वाची निर्मिती, मानवी जगाचा विकास हे समजून घेणे हाच ज्ञानाचा हेतु आहे. ज्ञान आणि कला यांच्या माध्यमातून विश्वाचे रहस्य, त्याची सुंदरता जाणवते. याचा अभ्यास ही अशाच अवलियांनी केला. तोही एकच मंत्र गात “झपूर्झा गडे झपूर्झा.’
आपल्या तारा मंडळातील मंडळी अव्याहत फिरत असतात. पण या तारा मंडळाच्या पलीकडेही असंख्य ग्रह-तारे आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांचा अभ्यास करणे यासाठी इतर सर्व गोष्टी बाजूला सारून झपाटून जाऊन अभ्यास करणे, प्रयत्न करणे आणि तिथे पोहोचणे हे महत्त्वाचे असते. तेव्हा अशा या सर्व अशक्य कोटीतील कामांसाठी आवश्यक असते ते झपाटलेपण. त्यालाच म्हणतात “झपूर्झा.’
कवीने एके ठिकाणी सांगितले आहे की ,’त्यांनी काही मुलींना पिंगा घालताना पाहिले. त्या मुली “जपून जा पोरी जपून जा”असे म्हणत गोल फिरत होत्या. असे म्हणत म्हणत फिरताना हळूहळू अंगात लय भिनत जाते आणि त्याचीच गुंगी येते. कवीने त्याच अर्थाने शब्द योजीले “झपूर्झा गडे झपूर्झा.”
कवितेच्या सुरुवातीला लिहिले आहे, आपल्याला जे कांही नाही असे वाटते, त्यांतूनच महात्मे कल्याणाच्या चिजा बाहेर काढतात. त्या महात्म्यांची स्थिती लक्षात घेऊन पुढील गाणे वाचल्यास ते दुर्बोध होऊ नये असे वाटते .म्हणजेच ह्या अज्ञाताच्या गुहेमध्ये शिरणाऱ्या मनाला बजावले ‘जपून जा मना जपून जा’.तर त्या ध्यासामध्ये फिरत असताना त्याचेच कधी ” झपूर्झा रे झपूर्झा ” झाले हे त्या मनाला सुद्धा कळत नाही.
© सौ. ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈