सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ समस्या… ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

बा.भ. बोरकर म्हणतात,

 मी पण ज्यांचे

पक्व फळापरी

सहजपणे गळले हो

 जीवन त्यांना कळले हो!

जीवनाविषयी अगदी नेमकं सांगणाऱ्या या ओळी पण खरोखरच हे इतकं सोपं आहे का?  जीवन म्हणजे नक्की काय हे संपेपर्यंत कळतं का? आपण जन्माला आलो,  जगलो,  म्हणजे नेमकं काय याचा सखोल विचार मनात कधी येतो का?  जीवनाविषयी खूप भाष्ये आहेत.

 जीवन एक रंगभूमी आहे.

 जीवन म्हणजे दोन घडीचा डाव.

 जीवन म्हणजे नदी आणि समुद्राचा संगम.

 जीवन म्हणजे कुणाला माहित नसणारं प्रत्येकाचं निरनिराळं  एक गोष्टीचं पुस्तक.

 यश अपयशाचा लेखा जोखा.

 सुख दुःख यांचे चढउतार.

 जीवन म्हणजे संसार.

 जसा तवा चुल्ह्यावर

 आधी हाताला चटके।

 तेव्हा मिळते भाकर. ।।

जीवनाविषयीचा विचार करताना त्यातली दुर्बोधता जाणवते.  खरोखरच जीवन कोणाला कळले का?  हा अत्यंत मार्मिक प्रश्न डॉ.  निशिकांत श्रोत्री यांनी त्यांच्या समस्या या लघुकाव्यात सुंदरपणे मांडला आहे.  या कवितेचा आपण रसास्वाद घेऊया.

☆ समस्या ☆

 जीवन ही तर एक समस्या

 कुणा न सुटली कुणा उमगली।ध्रु।

 

 कशास आलो कशास जगतो

 मोह मनाचा कुठे गुंततो

 कोण आपुला कोण दुजा हा

गुंता कधीचा कुणाल सुटतो ।।१।।

 

सदैव धडपड हीच व्यथा का

जीव कष्टतो कशा फुकाचा

स्वप्न यशाची दुर्मिळ झाली

मार्ग शोधता नजर पोळली ।२।

 – डॉ.  निशिकांत श्रोत्री

समस्या  या शीर्षकांतर्गत दोनच कडव्यांचे  हे अर्थपूर्ण चिंतनीय गीत आहे.  एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला कळली असते असे आपण म्हणतो तेव्हा ती  खरंच का आपल्याला उमगलेली असते?  जो बोध अपेक्षित असतो तो आपणास झालेला असतो का?  उलट जितके आपण त्या प्रश्नात रुततो तितकी त्यातली समस्या अधिक गंभीरपणे जाणवते.  म्हणूनच ध्रुवपदात डॉ. श्रोत्री म्हणतात,

 जीवन ही तर एक समस्या

कुणा न सुटली कुणा उमगली।ध्रु।

या दोन ओळीत जीवनाविषयीचा नकारात्मकतेने विचार केला आहे असेच वाटते पण त्यात एक वास्तव दडलेलं आहे.  सभोवताली जगणारा माणूस जेव्हा आपण पाहतो तेव्हा खरोखरच जाणवतं की जीवन हे सोपं नाही. कुणासाठीच नाही.  ते कसं जगायचं, जीवनाकडे नक्की कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचे आणि ते कसे जमवायचे हीच एक फार मोठी समस्या आहे,  कोडे आहे.  आणि आजपर्यंत हे कोडे ना समजले ना सुटले.

कवीने वापरलेला समस्या हा शब्द खूप बोलका आहे. इथे समस्या याचा अर्थ फक्त संकट,  आपत्ती,  चिंता, एक घोर प्रश्न असा नाही तर समस्या म्हणजे एक न सुटणारे कोडे.  एक विचित्र गुंतागुंत.  एकमेकांत अडकलेल्या असंख्य धाग्यांचे गाठोडे  आणि माणूस खरोखरच आयुष्यभर हा गुंता सोडवतच जगत असतो.  तो सुटतो का?  कसा सोडवायचा याचे तंत्र त्याला सापडते का हा प्रश्न आहे.

 कशास आलो कशास जगतो

 मोह मनाचा कुठे गुंततो

कोण आपला कोण दुजा हा

 गुंता कधीच कुणा न सुटतो ।१।

नेटाने आयुष्य जगत असताना निराशेचे अनेक क्षण वाट्याला येतात.  ही निराशा वेगवेगळ्या कारणांमुळे आलेली असते. अपयशामुळे, अपेक्षा भंगामुळे, अचानक उद्भवलेल्या अथवा अनपेक्षितपणे बदल झालेल्या परिस्थितीमुळे,” काय वांच्छीले अन काय मिळाले” या भावनेतून, फसगतीतून, विश्वासघातातून… वगैरे वगैरे अनेक कारणांमुळे माणसाच्या जीवनात नैराश्य येते आणि मग त्यावेळी सहजपणे वाटते  का आपण जन्माला आलो?  कशासाठी आपण जगायचं पण तरीही यातला विरोधाभास भेडसावतो. एकाच वेळी जगणं असह्य  झालेलं असतं,  मरावसंही वाटत असतं पण तरीही कुठेतरी जगण्याविषयीचा मोह सुटत नाही.  मनाने मात्र आपण या जगण्यातच गुंतलेले असतो.

फसवणूक तर झालेलीच असते. ज्यांना आपण आपली माणसं म्हणून मनात स्थान दिलेलं असतं त्यांनीच पाठीमागून वार केलेला असतो किंवा कठीण समयी साथ सोडलेली असते. मनात नक्की कोण आपलं कोण परकं, कुणावर विश्वास ठेवावा याचा प्रचंड गोंधळ उडालेला असतो.  मनाला जगण्यापासून पळून जावसं वाटत असतं पण तरीही पावलं मागे खेचली जातात कारण मोह, लोभ यापासून मुक्ती मिळालेली नसते.  पलायनवाद आणि आशावाद यामध्ये सामान्य माणसाची विचित्र होरपळ  होत असते. जगावं की मरावं अशी द्विधा मनस्थिती निर्माण होते आणि डॉक्टर श्रोत्रींनी या द्विधा मनस्थितीचा अत्यंत परिणामकारक असा सहज सुलभ शब्दात या कडव्यातून वेध घेतलेला  आहे हे जाणवतं.

कशास आलो कशास जगतो

या ओळींमागे आणखी एक भावार्थ आहे.

माणसाचा जन्म पूर्वसुकृतानुसारच होतो.

जन्मत:च  त्याने करावयाची कर्मेही ठरलेली असतात. पार्थ का भांबावला. कारण युद्ध करणे,अधर्माशी लढणे हा त्याचा क्षात्रधर्म होता. पण तो मोहात फसला. गुरु बंधुंच्या पाशात गुंतला आणि किंकर्तव्यमूढ झाला. माणसाचाही असाच अर्जुन होतो. तो त्याची कर्मं किंबहुना त्याला त्याची कर्मं कोणती हेच कळत नाही. भलत्याच मोहपाशात अडकतो. भरकटतो,सैरभैर होतो.आणि हीच त्याच्या जीवनाची समस्या बनते.

मोह मनाचा कुठे गुंततो या काव्यपंक्तीला एक सहजपणे प्राप्त झालेली अध्यात्मिक झालर आहे. मनुष्य जीवनाला काम, क्रोध, लोभ, मोह, मद मत्सर या षड्रिपुंनी  ग्रासलेलं तर आहेच. स्थितप्रज्ञता मिळवणे  किंवा त्या पायरी पर्यंत पोहोचणे  ही फार मोठी तपस्या आहे आणि जोपर्यंत माणूस हा नर असतो नारायण नसतो तोपर्यंत त्याला या सहा शत्रूंचा वेढा असतोच.  त्यात मोहाची भावना ही अधिक तीव्र असते आणि त्यासाठी माणूस जगत असतो आणि जगताना मोहापायी अनेक दुःखांचा वाटेकरी  होत असतो. चिंतित, पीडित असतो. डॉक्टर श्रोत्रींनी या कडव्यात केलेलं भाष्य हे वरवर पाहता जरी नकारात्मक वाटत असलं तरी ते एक महत्वाचा  संदेश देतं. माणसाच्या वाट्याला दुःख का येतात याचे उत्तर या काव्यात मिळतं. विरक्ती, दूरस्थपणा, अलिप्तता या तत्त्वांचा यात अव्यक्तपणे पाठपुरावा केलेला आहे. एकाच वेळी जेव्हा आपण जीवन ही एक समस्या आहे असं म्हणतो त्याचवेळी त्या समस्येला सोडवण्याचा एक मार्गही त्यांनी सूक्ष्मपणे सुचवला आहे असे वाटते. “सूज्ञास जास्ती काय सांगावे?” हा भाव या कडव्यात जाणवतो.

 सदैव धडपड हीच व्यथा का

 जीव कष्टतो कशा फुकाचा

 स्वप्न यशाची दुर्मिळ झाली

 मार्ग शोधता नजर पोळली ।२।

माणूस आयुष्यभर मृगजळापाठी धावत असतो.  तो एक  तुलनात्मक आयुष्य जगत असतो.  तुलनात्मक आयुष्य म्हणजे जीवघेणी  स्पर्धा.  स्पर्धेत असते अहमहमिका, श्रेष्ठत्वाची भावना, I AM THE BEST  हे सिद्ध करण्याची लालसा आणि त्यासाठी चाललेली अव्याहत धडपड.  जिद्द, महत्त्वाकांक्षा स्वप्नं बाळगू नयेत असे मुळीच नाही. SKY IS THE LIMIT.

आकाशी झेप घे रे पाखरा

सोडी सोन्याचा पिंजरा  या विचारात तथ्य नाही असे मुळीच नाही. झेप घेणं, भरारी मारणं, ध्येय बाळगणं,  उन्नत प्रगत होणं यात गैर काहीच नाही पण त्याचा अतिरेक वाईट.  पंखातली ताकद अजमावता आली नाही तर नुसतेच कष्ट होतात. फुकाची धावाधाव,  पळापळ हेलपाटणं होतं.  स्वप्न पाहिलं पण यश मिळालं नाही अशीच स्थिती होते.  माणूस दिशाहीन होतो भरकटतो आणि अखेर जे साधायचं ते साधता आलं नाही म्हणून निराश होतो. आयुष्याच्या शेवटी प्रश्न एकच उरतो.. काय मिळालं अखेर आपल्याला? का आपण इतकं थकवलं स्वतःला?  ज्या सुखसमृद्धीच्यापाठी आपण धावत होतो तिला गाठले का? मुळात सुख म्हणजे नेमकं काय?  हे तरी आपल्याला कळलं का? सुखाचा मार्ग शोधता शोधता नजर थकली. समोर येऊन उभा ठाकला तो फक्त अंधार. ही वस्तुस्थिती आहे. हेच माणसाचं पारंपारिक जगणं आहे आणि याच वास्तवाला उलगडवून दाखवताना डॉ. श्रोत्री मिस्कीलपणे त्यात दडलेल्या अर्थाचा, प्रश्नाचा आणि उत्तराचाही वेध घ्यायला लावतात. पाठीवर हात फिरवून सांगतात,” का रे बाबा! स्वतःला इतका कष्टवतोस? तू फक्त कर्म कर.  कर्म करण्याचा अधिकार तुला आहे. त्या कर्मांवरही तुझा हक्क आहे. पण कर्मातून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा करू नकोस.  अपेक्षा मग ती कोणतीही असू देत… यशाची, स्वप्नपूर्तीची, सुखाची, समृद्धीची पण अंतिमतः अपेक्षा दुःख देते.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

मा कर्मलहेतुर्भूमा ते संङ्गोsस्तवकर्मणि।।

समस्येचे मूळ कसे शोधावे याची एक दिशा या काव्यातून दिलेली आहे.  हे काव्य  अत्यंत चिंतनीय आहे. प्रत्येक कडव्याच्यामागे तात्त्विक अर्थ आहे. हे वाचताना मला सहजपणे विचारवंत जे. कृष्णमूर्ती यांच्या भाष्यांची आठवण झाली.  ते म्हणत,

“आपले ईहलोकीचे जीवन— कलह, द्वेष, मत्सर, युद्धे, काळजी, भीती, दुःख्खे यांनी भरलेले आहे.  याच्या मुळाशी मनो बुद्धी विषयीचे अज्ञान आहे.  नेमकं हेच ज्ञानमीमांसात्मक सत्य डॉ. श्रोत्रींनी अत्यंत सुबोधपणे समस्या या त्यांच्या लघुकाव्यातून मांडलेलं आहे. या काव्याबद्दल मी गमतीने म्हणेन मूर्ती छोटी पण कीर्ती महान

असे हे आत्मचिंतनात्मक, समत्व योग असलेले, नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे  नेणारे उत्कृष्ट गीत.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments