सुश्री अरुणा मुल्हेरकर
काव्यानंद
☆ शिदोरी… – कवयित्री : डाॅ. सौ. संजीवनी तोफखाने ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
गझलकारा डॉ. सौ. संजीवनी तोफखाने यांच्या शिदोरी या गझलेचे रसग्रहण.
गझल हा एक वृत्तात्मक काव्याचा आणि गायनाचा प्रकार आहे. गझलेची रचना ही सर्वसाधारण कविता म्हणून वेगळी असते. त्यात दोन दोन चरणाचे शेर असतात आणि संपूर्ण गझल जरी एकाच विषयावर असली तरी प्रत्येक शेर स्वतंत्र असतो. एकच विषय न घेता वेगवेगळ्या विषयांवरील स्वतंत्र शेरही गझलरचनेत स्वीकारार्ह्य आहेत.
आता ही गझल पहा.
☆ शिदोरी ☆ डॉ. सौ. संजीवनी तोफखाने ☆
☆
गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी
शोधात याच सारे आयुष्य लांघते मी
*
पाहून वागण्याच्या एकेक या तर्हा हो
होते अवाक बाई श्वासास रोखते मी
*
मी मंदिरात जाते ठावे चराचरी तो
श्रद्धा अशी असोनी पाषाण पूजते मी
*
मिळणार ना फळे मज माझी हयात सरली
खातील लोक कोणी कोयीस लावते मी
*
गुलमोहरास जमते ग्रीष्मात रंगणे जर
पाहून त्याकडे मग दुःखात हासते मी
*
का ओढ लावसी रे धारेपल्याड तीरा
मज यायचेच आहे पक्केच जाणते मी
*
घेते करून काही सत्कर्म सोबतीला
संगे हवी शिदोरी यात्रेत मानते मी
☆
ही गझल वाचल्यानंतर पटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे या गझलेतील मी एका दीर्घ आयुष्याचा अनुभव घेतलेली स्त्री आहे. तिने पाहिलेला समाज यात आहे.
मतल्यात ती म्हणते,
“गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी
शोधात याच सारे आयुष्य लांघते मी”
माझ्या चहुबाजूला माणसांची इतकी गर्दी आहे, आयुष्य सरत आले तरी मला माणसातला माणूस अजून काही सापडला नाही.
आपण नेहमी म्हणत असतो आजकाल माणसातली माणुसकी हरवत चालली आहे. जग स्वार्थाने भरले आहे. स्वतःची पोळी भाजली की झाले. आपल्या मुलांनाही जन्मदात्यांकडे लक्ष देण्यास, त्यांच्यासोबत चार सुखाच्या गोष्टी करण्यास वेळ नाही. हीच खंत या मीने वाचकांजवळ व्यक्त केली आहे.
“पाहून वागण्याच्या एकेक या तर्हा हो
होते अवाक बाई श्वासास रोखते मी”
हा दुसरा शेर!
व्यक्ती तितक्या प्रकृती असे आपण म्हणतो. गझलेतील या स्त्रीने तिच्या आज पर्यंतच्या आयुष्यात नाना तर्हेची माणसे पाहिली आणि त्यांच्या वागण्या बोलण्याच्या एक तर्हा पाहून ती म्हणते मी अवाक झाले. त्यांच्याविषयी काय कसे बोलावे हेच तिला समजत नाही. कोणीतरी चांगला देव माणूस उर्वरित आयुष्यात भेटेल या आशेने ती तिचा श्वास रोखून अजून उभी आहे. यात तिचा कुठेतरी सकारात्मक भाव आपल्याला दिसून येतो.
या तिसऱ्या शेरात ती तिच्या मनातील आणखी वेगळे भाव व्यक्त करते. ती म्हणते,
“मी मंदिरात जाते ठावे चराचरी तो
श्रद्धा अशी असोनी पाषाण पूजते मी”
आयुष्याच्या या प्रवासात या स्त्रीला समजले आहे की चराचर विश्वात ईश्वराचे वास्तव्य भरून आहे. जेथे जातो तेथे, तू माझा सांगाती अशी तिची श्रद्धा आहे. तरीही ती मंदिरात जाते, गाभाऱ्यातल्या दगडाला देव मानून त्या पाषाणाची मनोभावे पूजा करते.
या ठिकाणी ही ‘मी’ मला दुनियेतली सर्वसामान्य माणसांचे प्रतिनिधित्व करणारी वाटते. ईश्वर निर्गुण निराकार आहे हे ठाऊक असूनही आपण सगुणाचीच पूजा करतो. आपणच त्या देवाला रंग रूप आकार देतो.
“मिळणार ना फळे मज माझी हयात सरली
खातील लोक कोणी कोयीस लावते मी”
हा शेर खूप काही सांगून जाणारा आहे. निसर्गाचा असा नियमच आहे की आज पेरल्यावर लगेच उद्या उगवत नाही. बिजास अंकुर फुटून, रोप वाढवून त्याला फळे लागेपर्यंत त्या माणसाची हयात सरेल, परंतु त्याचा आनंद घरातील आपल्या मुलाबाळांना, नातवंडांना मिळेल, आणि मी लावलेल्या कोयीचा मोठा आम्रवृक्ष होऊन माझे प्रियजन जेव्हा त्याला लागलेले आंबे खातील तेव्हा मला खरा आनंद मिळेल.
“गुलमोहरास जमते ग्रीष्मात रंगणे जर
पाहून त्याकडे मग दुःखात हासते मी”
या शेरात जीवनाचे फार मोठे तत्त्वज्ञान गझलकारा संजीवनीताई सांगून जातात.
जीवनाच्या वाटेवर आनंदाची फुले असतात आणि त्याच सोबत दुःखाचे काटेही पसरलेले असतात. रोजचा दिवस कधीच सारखा नसतो. या शे रातील गुलमोहरचा दिलेला हा दृष्टांत
अगदी रास्त आहे.ग्रीष्म ऋतूत रणरणत्या उन्हात,
उष्णतेचा दाह होत असताना गुलमोहर कसा लाल केशरी फुलांनी बहरून जातो. त्याला उष्णतेची पर्वा नसते. हे पाहून या गझलेतील ही ‘मी’ म्हणते की मी सुद्धा
अशीच हसत असते.मला संकटांची पर्वा नाही. संकटांवर मात करून पुढे जावे आणि आनंदी रहावे हा सकारात्मक बोध या शेरातून संजीवनी ताईंनी वाचकांना दिला आहे.
” का ओढ लावशी रे धारेपल्याड तीरा
मज यायचेच आहे पक्केच जाणते मी”
एक ठराविक आयुष्य जगल्यानंतर
प्रत्येकालाच भवसागराच्या या तीरावरून पलीकडे दुसऱ्या तीरावर जाण्याची सुप्त ओढ लागलेली असते आणि आज ना उद्या त्या तीरावर जायचेच आहे हेही पक्के ठाऊक असते. तरीसुद्धा माणसाच्या मनात कुठेतरी मृत्यू विषयी भय असतेच हाच विचार या शेरात ताईंनी मांडला असावा का?
आता हा शेवटचा शेर पहा.
” घेते करून काही सत्कर्म सोबतीला
संगे हवी शिदोरी यात्रेत मानते मी”
माणूस महायात्रेला निघतो,त्याचे निर्वाण होते तेव्हा तो सोबत काय नेतो? पैसा- अडका धन- दौलत, नाती-गोती सर्व काही त्याला इथेच ठेवून जायचे असते. मात्र त्याच्या कर्मांची नोंद वरती चित्रगुप्ताकडे झालेली असते. सत्कर्म आणि कुकर्म ज्या प्रमाणात असेल त्याप्रमाणे दुसऱ्या जन्मात त्याला ते भोगावेच लागते. यालाच आपण पूर्वसंचित म्हणतो. हेच तत्व लक्षात घेऊन या शेवटच्या शेरात ही ‘मी’ म्हणते, “या प्रवासात मी माझ्यासोबत सत्कर्मांची शिदोरीबांधून नेते.”
आनंदकंद वृत्तात बांधलेली अशी ही तत्व चिंतन पर गझल आहे. साधारणपणे गझल म्हटली की ती
शृंगार रस प्रधान असते. त्यात प्रियकर प्रेयसीचे मिलन, विरह, लटकी भांडणे वगैरे विषय प्रामुख्याने हाताळलेले असतात. अध्यात्माकडे वळणाऱ्याही काही गझला असतात. ही गझल अध्यात्मिक आहे असे म्हणता येणार नाही, परंतु अध्यात्माकडे झुकणारी नक्कीच आहे. माणुसकी हे या गझलेचे अंतरंग आहे असे मी म्हणेन.
प्रत्येक शेरातील खयाल,उला आणि सानी यातील राबता अगदी स्पष्ट आहे. शोधते, लांघते, रोखते, पूजते, लावते, हासते, जाणते, आणि मानते हे सर्व कवाफी अगदी सहजतेने वापरल्यासारखे वाटतात. लगावलीचे तंत्र सांभाळताना कुठेही ओढाताण वाटत नाही, तसेच यातील गेयता आणि लयही अगदी सहज सुंदर आहे. अशी ही सर्वगुणसंपन्न गझलरचना मला फार आवडली, तुम्हालाही ती नक्कीच आवडेल याची खात्री आहे.
© सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈