प्रा. भारती जोगी

 🌸 विविधा 🌸

☆  भय इथले संपत नाही – कवी:- माणिक सीताराम गोडघाटे उर्फ ग्रेस ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆

☆ भय इथले संपत नाही ☆

*

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते

मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते…..

*

ते झरे चंद्र सजणांचे ती धरती भगवी माया

झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया…..

*

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शूनी गेला

सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला…..

*

स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे

हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे !!

*

कवी:- माणिक सीताराम गोडघाटे उर्फ ग्रेस

… लता दीदींचे स्वर आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा साज, यांतून ज्या एका कवितेचं ग्रेसफूल गाणं झालं… ती ही, गूढरम्य कवी मानलं गेलेल्या कवी ग्रेस यांची कविता वाचनात आली. आणि… भय… या सारख्या आदिम आणि अत्यंत खोलवर रुजलेल्या संवेदनेवरची ही कविता आहे हे लक्षात आलं. आणि मग ग्रेस यांच्या अतर्क्य, अनाकलनीय, पण अपरिमित सुंदर अशा भावविश्वात प्रवेश करायचं ठरवलं.

ग्रेस यांच्या कविता अतिशय दुर्बोध, दुर्गम आहेत असं म्हंटलं जातं… पण असंही म्हंटलयं की… ग्रेस यांच्या कवितांच्या शब्दांच्या अर्थाच्या उंबरठ्यावर थबकू नका. त्यांच्या वेदनेशी रममाण व्हा… मगच ही कविता कळेल.

कवी ग्रेस यांना त्यांची आई सोडून गेल्याचं दु:ख ते पचवूच शकले नाहीत. तिच्या आठवणी, संध्याकाळच्या कातरवेळी अधिकच दाटून यायच्या. आणि अंधार व्हायला सुरुवात झाली की तो काळोख त्यांचं आख्खं मन काबीज करायचा आणि एका अनामिक अशा भयाने, भीतीने ते व्यापून जायचं आणि मग अशावेळी त्यांच्यातल्या त्या बालकाला आपल्या आईची तीव्रतेने आठवण व्हायची. कारण भीती वाटली की मूल आईचा आधार, पदर शोधतं!

 भय…. तसं म्हंटलं तर… आपल्या आनंदाचं निधान असलेली प्रत्येकच गोष्ट, व्यक्ती, तिचा आधार तुटण्याचं भय असतंच आपल्या मनात ! नाती, मैत्री, जुळलेले अनुबंध तुटण्याचं, कायमचे दुरावण्याचं, विपन्नता येण्याचं, अवहेलना नशिबी येण्याचं… अशा अनेकविध गोष्टींच भय सतत आपल्या मनात असतंच ! आणि मग संध्याकाळी मनाची व्याकुळता, कातरता अधिकच गहिरी होते.

कवीच्या मनाची इथे तीच अवस्था झाली आहे. कवी म्हणतो……

काहीही झालं तरी, केलं तरी, भय इथले संपत नाही ! आणि मग माझं व्याकुळ मन तुझ्या आठवणींनी भरून येतं. एक अनामिक अशी भीती दाटून येते मनात ! मग मी ती घालविण्यासाठी तू मला शिकविलेली  शुभंकर अशी गीते म्हणू लागतो. कारण… बाहेरचा आणि मनातलाही काळोख दूर करण्याचं, त्या येऊ घातलेल्या तमाला दूर सारण्याचं सामर्थ्य आहे त्या लावलेल्या दीपज्योतींमध्ये आणि भोवताल उजळवून टाकणा-या त्या मंद, शांत, स्निग्ध प्रकाशात, त्या उच्चारलेल्या पवित्र अशा शब्दरवांत ! हे तुझेच तर संस्कार आहेत ना ! 

आठवणींत रमलेला कवी अचानक आपल्याला… आसक्ती-अनासक्तीच्या, जन्म-मृत्यूच्या फेऱ्याच्या अनाकलनीय अशा विश्वात घेऊन जातो. आणि मग सुरू होते रूपकांची बांधणी आणि उभारणी… आणि वाहू लागतो प्रतिमा आणि प्रतिकांचा एक ओघ, एक खळाळता, शुभ्र, फेनिल प्रवाह ! 

एकीकडे रोमा-रोमांत, रंध्रा-रंध्रात झिरपत जाणारं, झरत जाणारं ते चंद्र-चांदणचु-याचं.. सुखाचं चांदणं मन प्रसन्न करून जातं. पुन्हा अशाच वेळी मनाला… धीर धरी रे… असं समजावत… आकाशातून… जमिनीवर यायचं असतं. धरतीची भगवी माया….

विरक्त वृत्ती समजून घ्यायची असते. सगळं तिचंच आहे, तिच्यातूनच निर्माण झालयं… पण ती धरती किती अलगद तिच्यातलं मीपण कातरून टाकते… नि:संग होते, अलिप्त होते, अगदी निरपेक्ष भावनेने. तिची भगवी माया, विरक्त वृत्ती या रूपकातून व्यक्त होते… सगळं देऊन मोकळी होते ही माया! आईची माया तरी याहून कुठे वेगळी आहे?? 

कवीने… जन्म-मृत्यूचं रहाटगाडगं स्पष्ट करतांना  झाडाचं फार सुंदर रूपक वापरलं आहे. झाड मोठं झालं की त्याची बीजं परत त्याच्या पायाशी निजतात… म्हणजे रुजतात… पुन्हा झाडाचा जन्म होतो… अशी ही संपणं… रूजणं… उगवणं… बहरणं… संपणं… हे चक्र सातत्याने सुरुच असतं. तद्वतच जन्म-मृत्यूचं ही आहे. जन्माला आलेल्याला मृत्यू अटळ आहे. म्हणूनच मृत्यू चं  भय बाळगू नये.

पुढील ओळींत कवीला, आईचे मंद, हळवे, वात्सल्य, ममतेने भरलेला  बोल आठवला. त्याच्या भय व्याप्त मनाला हा हळुवार, अलवार प्रेमाचा स्पर्श आठवला. आणि कवीने तो…

सीता वनवासात जातांना सोबत घेऊन गेलेल्या राघव शेल्या च्या स्पर्शाच्या रूपकाच्या कोंदणात अगदी अलगद, चपखल बसवला. अतिशय देखणी बांधणी रूपकाची !! 

आठवणींचं असं असतं ना की त्या सरता सरत नाहीत. आठवणींचं चांदणं झरतंच असतं… स्त्रवतंच असतं… झिरपतंच असतं… आणि मनाला वाटतं असतं… अजुन ही चांदरात आहे!! त्यामुळे च मग त्याच आठवणींचं दु:ख, त्या वेदना, तो सल… सतत सतत असतो… बोच जाणवंत असते अहर्निश! मग होतं काय…. की… परमेश्वराच्या प्रार्थनेत आपण आपल्या दु:खाचं रडगाणं गात रहातो, स्तोत्र म्हणावं तसं! आपलं दु:खच उगाळत बसतो, गुणगुणत बसतो. आणि त्याच्यातच अडकून बसतो. अलिप्त होता आलं पाहिजे खरं तर! इंद्रियसुखा च्या पलीकडे जाऊन, माया, मोह त्यागून विरक्त होता आलं पाहिजे. असंच अभिप्रेत असावं यात असं वाटतं.

यमन रागातलं हे गीत ! यमन…. पाण्यासारखा तटस्थ राग! जो रंग मिसळला तसा होतो, आणि कानाला गोड वाटतो. त्यामुळे ग्रेस नी जरी हे गीत आईला उद्देशून, आईसाठी लिहिले असेल तरी… आपल्याला प्रिय असणाऱ्या कुणाही व्यक्तीसाठी ते व्यक्त होणं असू शकतं. म्हणूनच तर ग्रेसच्या कवितांच्या गाभा-यातलं गूढ, आत थेट उतरून प्रवेश केल्यानंतरच उकलतं आणि अंतरंग प्रकाशित होतं… हेच खरं ! 

© प्रा. भारती जोगी

पुणे.                            

९४२३९४१०२४.📚📖🖋️

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments