सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ माणुसकीचा ठाव नसे… कवी – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

☆ माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे ☆

जिव्हा चटावली बाजारा कोपऱ्यात चूल रुसे

पंगती आग्रह भरपेटी भुकेल्या तोंडी घास नसे

सुधारलेल्या या देशी संस्कृती ना कोणी पुसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

पेले फेसाळले मदीरा स्तन आटले ओठ सुके

दूध रस्त्यावरी ओतता बालकांची क्षुधा सुके

आंसू आटलेले मातृत्वाची मान झुके

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

माय अपुली बहिण तरी गर्भातच लेक खुडे

समाजा ना घोर कुठे कुणाचे काय अडे

मी माझे हे खरे समाजाचे तर भान नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

उत्तुंग इमले धनिका दीनदुबळ्यांना वास नसे

दारी गाड्यांची रांग असे कोण नेसाया साडी नसे

निर्दयी कठोर धरती गगनालाही कणव नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

मंचकी लावणी रंगली सुवासिनीचा अश्रू सुके

बैठकी खणखण पडती विद्येसाठी मोल थके

विभ्रमे मन भरे दूरदृष्टीचा अभाव दिसे 

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

आता कसली आशा नाही स्वप्न ही ना पहायची

मनात आतल्या आत जळून ती गुदमरायची

हाची का समाज हेचि असेच का जगायचे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

☆ रसग्रहण :  माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे ☆

जिव्हा चटावली बाजारा कोपऱ्यात चूल रुसे

पंगती आग्रह भरपेटी भुकेल्या तोंडी घास नसे

सुधारलेल्या या देशी संस्कृती ना कोणी पुसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

माणूस स्वतः हरवला आहे यातील गर्भितार्थ मनाला भिडतो. तो माणुसकीला ही विसरला. त्याला याविषयी काहीही घेणेदेणे नाही.

“जिव्हा चटावली म्हणताना भुकेविषयीचा सात्विक भाव नाहीसा झाला आहे हे अधोरेखित केले आहे.. “चटावली” शब्दांतून परिस्थितीचे गांभीर्य व तीव्रता नेमकेपणाने ध्यानात येते. बदलत्या परिस्थितीमुळे घरातील चूल रुसली आहे अशी कल्पना करून उत्तम चेतनगुणोक्ती अलंकार योजिला आहे. “कोपऱ्यात” या शब्दातून होत असलेले दुर्लक्ष कळते. पंगतीत पोट भरलेल्या लोकांना आग्रह केला जातो. पण भुकेल्या माणसाला घासही मिळत नाही याची जाणीव व पाश्चिमात्य देशांचे अंधानुकरण करताना देश स्वतःच्या संस्कृतीला विसरतो आहे. “अतिथी देवो भव” ही भारतीय संस्कृतीतील भावना दुर्लक्षित होते आहे.

पेले फेसाळले मदीरा स्तन आटले ओठ सुके

दूध रस्त्यावरी ओतता बालकांची क्षुधा सुके

आंसू आटलेले मातृत्वाची मान झुके

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

वर्तणुकीचे व हरवलेल्या माणुसकीचे वर्णन केल्यानंतर समाजाचे बदलते भान आणि वर्तन विशद केले आहे.. मदिरापानाची अवाजवी व गैरवाजवी प्रतिष्ठा देताना तिचे पेले फेसाळताना दिसतात. पण लहान बालकांना पूर्णान्न ठरणारे आईचे दूध मात्र आटत चाललेले आहे. माया व लहान मुलांना स्तनपान न देण्याकडे स्त्रियांचा वाढता कल लक्षात येतो. लहान मुलांचे ओठ सुकून गेले आहेत. त्यांची तहान भूक भागत नाही. मूलभूत गरजांविषयी माणुसकी जपली जात नाही. नात्याने पाहिले जात नाही हे सूचित केले आहे. अपेक्षित भाव न मिळाल्याने दूधाचा नाश झाला तरी बालकांची क्षुधा नजरेआड होते. ती भूकही सुकून जाते असे म्हणून अतिशयोक्ती अलंकाराचा समर्पक वापर केल्याने परिस्थितीची तीव्रता समजते.. असे असूनही कुणालाही दुःख होत नाही. या अर्थी आंसू, अश्रू आटून गेलेले आहेत. मातृत्वाच्या भावनेला प्रामाणिक न राहणारी ही भावना फैलावल्यामुळे मातृत्वाची मान ही झुकली आहे असे म्हणताना “मातृत्वाची मान झुकणे” यातून मांडलेला गर्भितार्थ अतिशय भेदक आहे. मातृत्वही शरमून गेले आहे. चेतनागुणोक्ती कवितेच्या आशयाला उंची व खोली प्रदान करतो.

माय अपुली बहिण तरी गर्भातच लेक खुडे

समाजा ना घोर कुठे कुणाचे काय अडे

मी माझे हे खरे समाजाचे तर भान नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

प्रत्येक माणूस हा स्त्रीच्या पोटी जन्म घेतो. स्त्रीच्या रूपात माय, बहिण व लेक ही मिळते. या सत्याकडे दुर्लक्ष करून स्त्री गर्भ मात्र खुडला जातो. “खुडे” या शब्दातून “कळी खुडणे” या अर्थाने कळी व तिचा विकास अशा जीवन क्रमाशी स्त्री गर्भाचा मेळ साधला आहे. समाजाची मूल्ये वर्धन करणारी, संस्कार करणारी स्त्रीचे अस्तित्व आवश्यक आहे. हा व्यापक विचार करण्यात समाज भावनिक दृष्ट्या कमी पडत आह. मी आणि माझेच खरे व स्वतः पुरते आत्मकेंद्री जगणे हा जणू आयुष्याचा नियम झाला आहे. अपवाद म्हणूनही समाजाचे भान ठेवण्याचे भान जपले जात नाही.

उत्तुंग इमले धनिका दीनदुबळ्यांना वास नसे

दारी गाड्यांची रंग असे कोण नेसाया साडी नसे

निर्दयी कठोर धरती गगनालाही कणव नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

भूक तहान या नंतर या निवारा अर्थात घर याविषयी कवी सांगतो कि श्रीमंतांना व श्रीमंतांची उत्तुंग मोठी घरे असतात. परंतु दीनदुबळ्यांना मात्र “वास नसे” म्हणताना त्यांना घर, अधिवास नसणे हा भाव मांडला आहे. गरजेपेक्षाही जास्त असणे व गरजेपुरते ही नसणे हा विरोधाभास, विषमता लक्षात येते. श्रीमंतांच्या घरी गाड्यांची रांग लावताना पैशाचा अपव्यय दिसून येतो. त्याच वेळेस स्त्रियांसाठी लज्जा रक्षणार्थ वस्त्रही उपलब्ध नसते. धरतीवरील निर्दयी कठोरवृत्ती प्रकर्षाने मांडली आहे. “निर्दयी कठोर धरती” मधील श्लेषात्मक अर्थ ही अतिशय उच्च प्रतीचा आहे. पृथ्वीतलावर वास करणारे लोक निर्दयी व अन्न वस्त्र निवारा या गोष्टींची गरज भागवणारी धरती ही निर्दयी बनलेली आहे. गगनालाही कणव नसे म्हणताना वरुणराजाची कृपा नसल्याने लक्षात येते.. देव गगनात वास करतो असा समज आहे. त्या दृष्टीनेही त्याला कणव येत नाही असा श्लेषात्मक अर्थ आशयाला पूरक ठरतो. संपूर्णपणे विपरीत परिस्थिती मांडून माणुसकी कशी हरवत चालली आहे हे प्रत्येक कडव्या गणिक उदाहरणे देत स्पष्ट केले आहे.

मंचकी लावणी रंगली सुवासिनीचा अश्रू सुके

बैठकी खणखण पडती विद्येसाठी मोल थके

विभ्रमे मन भरे दूरदृष्टीचा अभाव दिसे 

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

समाजाचे अध:पतन दाखवताना माणुसकीप्रमाणे त्याचे नैतिक पतनही कसे होत आहे सांगितले आहे. लावणी पाहताना दंग झालेले लोक त्या नादामध्ये स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष करतात. घरातील सुवासिनीचा, स्त्रीचा अश्रूही सुकून गेला आहे याचे भानही पुरुषजात ठेवत नाही. “अश्रू सुके “असे म्हणताना दुर्लक्षित परिस्थितीचा सामना दीर्घकाळ चाललेला कळतो आहे. लावणीच्या बैठकीत पैशाची उधळण होते. मुलांच्या विद्याप्राप्तीसाठी पैसा उपलब्ध होत नाही. व शैक्षणिक फीया थकून जातात, बाकी राहतात. विभ्रमांनी मन रमवून काळाचा व पैशाचा अपव्यय केला जातो. क्षणिक सुखात दूरदृष्टीचा अभाव दिसतो.. संपूर्ण घराघराचा ऱ्हास, विध्वंस होऊ शकतो याकडे तीळमात्र लक्ष दिले जात नाही. आर्थिक, मानसिक शारीरिक व नैतिक पातळीवरील चांगला समाज चांगला देश निर्माण करू शकतो. परिपूर्ण समाजाची आस न ठेवल्यामुळे एकूणच माणूस म्हणून जगण्याच्या विविध भागांवर कवीने प्रकाश टाकला आहे. व माणुसकीच्या लोप पावण्याने अंध:कारमय परिस्थितीची जाणीव करून दिली आहे.

आता कसली आशा नाही स्वप्न ही ना पहायची

मनात आतल्या आत जळून ती गुदमरायची

हाची का समाज हेचि असेच का जगायचे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

विविध पातळ्यांवर हरवलेली, लोपलेली माणुसकी कवीने उदाहरणे देत शब्दांकित केली आहे. विपरीत वातावरणात विकल, हतबल, उदास मनाला आता कसलीही आशा नाही. काही बदल, सुधारणा होईल असे स्वप्न पहायचीही आशा उरली नाही. ” स्वप्न ही ना पहायची ” यातील श्लेषात्मक अर्थ अत्यंत अर्थपूर्ण. स्वप्न पाहायची नाहीत म्हणजे ती सत्यात उतरणार नाहीत याची जाणीव असल्याने ती पाहायची नाहीत व परिस्थितीमुळे स्वप्न पहायची आशा उरली नाही हा दुसरा अर्थ. ही गोष्ट सत्यात उतरेल याची शाश्वती मनाला उरलेली नाही. विस्तवासम दाहक वास्तवाने आशा मनातल्या मनात जळून जाणार, गुदमरून जाणार. “गुदमरणे” या शब्दातून तगमग, कळकळ, जीवाची काहिली लक्षात येते. हा समाज आता असाच राहणार का, यालाच समाज म्हणायचे का आणि इथे असेच जगायचे का असे विविध प्रश्न कवीच्या सजग व खिन्न मनाला पडलेले आहेत. या प्रश्नातूनच त्याचे नकारात्मक उत्तरही अध्याहृतपणे दिलेले आहे.

संपूर्ण कवितेत यमक, अनुप्रास या बरोबरच साहित्यिक अलंकारांची योजना केल्याने नादमयता व अर्थपूर्णता दिसून येते.

डोळ्यांत अंजन घालून वास्तवाची प्रखर जाणीव करून देणारी, विचार करायला प्रवृत्त करणारी ही कविता ! अत्यंत हृदयस्पर्शी तर आहेच तिचे सामाजिक मोलही अनमोल आहे. समाजभान असणारे लोक प्रयत्नशील असतात. स्वतःचा व्यावसायिक पेशा समर्थपणे व यथार्थपणे सांभाळून, सामाजिक भान सजगपणे साहित्यातून सक्षमपणे व भाषेचे सौंदर्य जपून मांडण्याचे अनमोल कार्य डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांनी नेहमीच केलेले आहे.

© सुश्री नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments