सौ राधिका भांडारकर
काव्यानंद
☆ कर्णभूल – कवी : ग्रेस ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆
माणिक सिताराम गोडघाटे म्हणजेच कवी ग्रेस (१० मे, १९३७ – २६ मार्च, २०१२). साहित्य विश्वात कवी ग्रेस हीच त्यांची खरी ओळख. बा.सी. मर्ढेकरांनंतर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये त्यांची गणना होते. ग्रेस यांच्या कवितेत एकप्रकारची दुर्बोधता जाणवते. यावर त्यांचे उत्तर असायचे की,” मी जे काव्य करतो ते माझे स्वगत असते आणि स्वगतात भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगताला श्रोता नसतो. मीच माझा फक्त असतो,”
असा हा एक मुक्त काहीसा कलंदर कवी. ज्ञानाचे सोंग न करणारा, दुर्बोधतेत संदेश देणारा आणि त्याच वेळी सामाजिक भान ठेवणारा, शब्दकोषांना नवीन शब्द देणारा असा नामांकित कवी.
संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनाऱ्यावरती
*लाटांचा आज पहारा…*किंवा
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते अथवा
मी महाकवी दुःखाचा, प्राचीन नदीपरी खोल
दगडाचे माझ्या हाती, वेगाने होते फुल
अशा कितीतरी ग्रेस यांच्या काव्यपंक्ती मनाला चिपकलेल्या आहेत.
नुकतीच मी त्यांची कर्णभूल ही कविता पुन्हा वाचली. खूप वेळा वाचली. अर्थ शोधत शोधत वाचली आणि या कवितेत मला काहीतरी सापडलं आणि जे मला सापडलं ते तुमच्यापाशी बोलावं असं वाटलं म्हणून या कवितेचं रसग्रहण करण्याचा मी प्रयत्न करत आहे.
सुरुवातीला आपण त्यांची कर्णभूल ही कविता संपूर्ण वाचूया.
☆ कर्णभूल – कवी : ग्रेस ☆
*
त्याने दान मांडताना
तिची झोळी तपासली
चंद्र चांदण्याच्या खाली
होत्या वाळवीच्या साली
*
उभा राजवाडा लख्ख
शोधे जादूची बासरी
पट्टी डोळ्याची बांधून
कुठे पाहे ना गांधारी
*
चंद्र सूर्याची सावली
त्याचे सत्य हले डूले
स्वप्नसंगात सोडतो
कर्ण कवचकुंडले
– ग्रेस
ही कविता वाचल्यावर पटकन जाणवते ते या कवितेत महाभारतातील घटनेचा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या पात्रांचा उल्लेख आहे. शिवाय कवितेच्या शीर्षकावरूनही प्रारंभी हाच बोध होतो. कर्ण ही महाभारतातील उपेक्षित व्यक्ती पण तरीही बहुआयामी आणि आदरणीय. उपेक्षित असली तरी दुर्लक्षित नक्कीच नाही. कर्णाच्या मनातल्या भावभावनांचा प्रवाह कवीने या काव्यात एका विशिष्ट वैचारिकतेतून मांडला आहे असे वाटते.
त्याने दान मांडताना
तिची झोळी तपासली
चंद्र चांदण्यांच्या खाली
होत्या वाळवीच्या साली…१
कुरुक्षेत्री कौरव पांडव यांच्यात घनघोर युद्ध होणार आहे. या युद्धातले खरे नायक म्हणजे धनुर्विद्यानिपुण अर्जुन आणि राजनीतिज्ञ युगंधर कृष्ण. युद्ध अटळ आहे. कृष्णाची शिष्टाई असफल ठरली आहे. फक्त एकच हुकुमाचे पान तेवढं बाकी आहे. कर्णाच्या जन्माचे रहस्य जे कुंतीने आजपर्यंत लपवून ठेवलंय. कुंती जाणून आहे की कर्ण हा अर्जुना इतकाच तोलामोलाचा योद्धा आहे. पण तो शत्रुपक्षात असल्यामुळे तिला पांडवांच्या विजयाबद्दल कुठेतरी भय आहे आणि याच क्षणी कर्णाच्या दानशूर वृत्तीची जणू काही परीक्षा घेण्यासाठीच ती स्वतः कर्णाला युद्धापूर्वी भेटते आणि कर्णाच्या जन्माचे रहस्य त्याला सांगते आणि त्याचवेळी अर्जुनाच्या प्राणांचे दान मागते. थोडक्यात ती कर्णाला भावनिक आवाहन देते. (इमोशनल ब्लॅकमेलच करते म्हणाना!)
त्यावेळी कर्णाच्या अंतरात भावनांचं वादळ उठलं असणार. मागितलेलं दान तर द्यायलाच हवं पण ते देण्याआधी त्याच्या मनात कुंतीविषयी नक्कीच करुणा उत्पन्न झाली असावी.
तिची झोळी तपासली या शब्दरचनेतून कवी ग्रेस जणू काही कर्णाचं मन मांडत आहेत. कुंतीच्या अस्तित्वाचा विचार कर्णाच्या मनात येतो आणि त्याला जाणवतं की “या माऊलीच्या वाटेवर फक्त वरवरच चंद्र चांदण्यांची पखरण असल्यासारखी भासते पण प्रत्यक्षात मात्र तिच्या जीवनाला जणू काही व्यथांच्या वाळवीनेच पोखरलेलं आहे. ती एक असहाय, दुःखात्मा आहे याच दृष्टीकोनातून कर्ण या भेटीच्या वेळी तिच्याकडे पहात असावा. कुठली सुखे होती तिच्या जीवनात? शापितच आयुष्य तिचे… पती-वियोग, वनवास सारे सारे भोगले हिने.
या चरणात झोळी, वाळवी, हे कुंतीच्या दुःखासाठी योजलेले प्रतिकात्मक शब्द आहेत आणि त्यातूनच तिचे करुणामय जीवन उलगडते.
उभा राजवाडा लख्ख
शोधे जादूची बासरी
पट्टी डोळ्यांची बांधून
कुठे पाहे ना गांधारी॥ २ ॥
या चरणामध्ये वाचकांपुढे येथे ती डोळ्याला पट्टी बांधून वावरणारी गांधारी. जशी कुंती तशीच गांधारी. दोघीही राजवाड्यात राहूनही दुःखीच. वास्तविक गांधारी म्हणजे हस्तीनापुरची महाराणी! उभा राजवाडा लखलखतोय पण गांधारीच्या आयुष्यात साचलाय तो अंधार.. दाट काळोख! पातिव्रत्य सांभाळत अंध पतीसाठी तिनेही जीवनभर डोळ्यावर पट्टी बांधली आणि एका गुढ अंधारातच ती जगली. आश्वासक असं तिच्याजवळ काय होतं?
शोधे जादूची बासरी या शब्दरचनेतून कृष्ण दर्शन होते पण गांधारीला कुठे मिळाला कृष्णचरणी विसावा? कृष्ण प्रेम हेही पांडवांसाठीच नित्य होते. खरोखरच गांधारीच्या आयुष्याचे सारेच सूर हरवलेले होते.
चंद्र सूर्याची सावली
त्याचे सत्य हाले डुले
स्वप्न संगात सोडतो
कर्ण कवच कुंडले..॥३॥
हा शेवटचा चरणही प्रतिकात्मक आहे. चंद्र, सूर्य, सावली ही यश अपयशाच्या अर्थाने वापरलेली रूपके असावीत आणि जेव्हा हा विचार मनात येतो तेव्हा अर्थातच कर्णाचा जीवनपट उभा राहतो. आयुष्यभर सुतपुत्र म्हणूनच त्याची उपेक्षा झाली. क्षत्रिय असूनही त्याच्या क्षात्रतेजाला योग्य ती मान्यता मिळाली नाही. त्याच्या जन्माचे रहस्यही कुणी जाणण्याचा प्रयत्न केला नाही. त्या वेळेच्या समाजासाठी तो एक परित्यक्त, सुतपुत्र, राधेय होता. मात्र दुर्योधनाने चाणाक्षपणे त्याला मैत्रीचा हात दिला. अंगद देशाचे राज्यपद ही दिले. आणि एक प्रकारे त्याच्या जीवनात शीतल सावली आणली.
त्याचे सत्य हाले डुले यातला हाले डुले हा कवीने वापरलेला जोडशब्द फारच चपखल आहे. सत्य कुणालाच कळले नाही आणि जो काही मानसन्मान मित्र दुर्योधनाकडून कर्णाला मिळाला होता त्यातलाही आनंद परिपूर्ण नव्हता. जीवनात अनेक चढ —उतार, खड्डे, यश अपयश, अवहेलना याचा सामना कर्णाला करावा लागला होता.
दाता, दानशूर म्हणून त्याचा लौकिक होता. जगाला दान देण्याचं एक समाधानयुक्त स्वप्न तो पूर्ण करत असतानाच, कुरुक्षेत्री युद्ध सुरू होण्यापूर्वी साक्षात इंद्र कर्णापुढे उभा राहतो आणि कर्णाला मिळालेली जन्मजात कवच कुंडले दान म्हणून मागतो. कर्णाच्या जीवनातला अत्यंत कसोटीचा क्षण पण इंद्राला कवच कुंडले अर्पण करून तिथेही कर्ण दात्याचा धर्म अक्षरशः पाळतो. नियती ही नेहमीच कर्णाच्या विरोधात राहिली. अर्थात यामध्ये स्वप्न, धर्म आणि समाधान यांच्या बदल्यात कर्ण एक प्रकारे युद्धाच्या प्रारंभीच स्वतःचे बलिदान जणू काही मान्य करतो.
हे तीनही चरण वाचल्यानंतर मनात अनंत प्रश्न उभे राहतात. कवी ग्रेसच्या काव्याचं वैशिष्ट्य हेच आहे की काव्यातलं अव्यक्त जे आहे ते वाचकाने स्वजाणिवेतून जाणावे. प्रथम वाचकांचं मन घुटमळतं ते शीर्षकाभवती.
कर्णभूल
कर्णाची चूक असा अर्थ घेतला तर मनात येते.. काय चूक होती कर्णाची किंवा कोणती चूक कर्णाने केली? दुर्योधनासारख्या अधर्मी पक्षासाठी त्याने का आपले जीवन व्यर्थ घालवले? त्याचवेळी कर्णभूल या शब्दरचनेतले इतर अनेक रंग, अनेक अर्थ आणि अनेक दृष्टिकोन उलगडण्यातच वाचकांचे मन गुंतून राहतं.
कर्णभूल याचा दुसरा अर्थ असाही असू शकतो की कर्णाला समजून घेण्यामध्ये इतरांची झालेली चूक. कर्णाला कुणीच समजून घेतले नाही का?
कुंती, गांधारी आणि कर्ण हे मग समदु:खी जाणवायला लागतात. तसेच कवीच्या मनातल्या, या पात्रांनी केलेल्या चुका वाचकांपुढे सुस्पष्ट होऊ लागतात.
का कुंतीने कर्णाच्या जन्माचे रहस्य दडवून ठेवले?
का गांधारीने केवळ संकेताच्या मागे जाऊन डोळ्यावर पट्टी बांधली? कदाचित गांधारी दृष्टी घेऊन वावरली असती तर महाभारत वेगळे झाले असते का?
का कर्णाने मैत्रीच्या वचनाखातर दुर्योधनाची अनिती दुर्लक्षित केली?
या विचारांती हे संपूर्ण तीनच कडव्यांचं लहानसं वाटणारं काव्य डोंगराएवढा अर्थ घेऊन आपल्यासमोर खळाळतं. या काव्याच्या आणि त्यातल्या ओळखीच्या पात्रांच्या माध्यमातून कवी ग्रेसना वेगळंच काहीतरी सांगायचं आहे का?
कुंती, गांधारी, कर्ण यांची जीवनेही मग प्रतिकात्मक वाटू लागतात. मानवी जीवनाशी यांचा संदर्भ जुळवताना वाटते, अखेर सत्य एकच… चुकीचा कुठलाही मार्ग यशाच्या दिशेने जात नाही. चूक छोटी किंवा मोठी नसतेच. चूक ही चूकच असते आणि त्यांचे अंतिम परिणाम हे नकारात्मक असतात आणि हेच सत्य कदाचित ग्रेस ना महाभारतातील या पात्रांद्वारे जगापुढे मांडायचे असतील…
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈