श्री सुहास रघुनाथ पंडित

? काव्यानंद ?

☆ योगी… कवयित्री – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण.. श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

माणसाचा आणि निसर्गाचा काहीही संबंध नाही असे समजणारी माणसे समाजामध्ये आहेत. पण ती माणसे हे विसरुन जातात की माणूस हाच मुळी निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. आपला प्रत्येक सण, उत्सव किंबहुना आपली संस्कृतीच निसर्गावर आधारलेली आहे हे आपण जाणतोच. त्यामुळे कवी, कवयित्री, चित्रकार यासारख्या कलाकाराला स्वतःच्या आयुष्याकडे पाहतानाही निसर्ग हा आठवतोच! निसर्गातील प्रतीके वापरुन मानवी जीवनाचा अर्थ व्यक्त करणारी अनेक काव्ये, साहित्यकृती आपण वाचल्या आहेत. अशीच एक रुपकात्मक कविता वाचनात आली. ती म्हणजे कवयित्री सौ. राधिका भांडारकर यांची ‘ योगी ‘ ही कविता.

सौ राधिका भांडारकर

☆ योगी ☆

मातीतल्या बीजाला

अंकुर फुटतो

धरणीला आनंद होतो

पावसाचे शिंपण होते

अन् रोप उलगडते

हळुहळू त्याचा

वृक्ष होतो

तो बहरतो, फुलतो, फळतो

आनंदाची सर्वत्र पखरण करतो

 

मग आयुष्याचा तो क्षण येतो

पानगळीचा…

एक एक पान गळू लागते

फांदीला सोडून धरणीवर उतरते

त्याचवेळी आभाळाची ओढ सरते

ज्या मातीतून उगवले

तिथेच परतीची पाऊले

विलग पानांचा होतो पाचोळा

वार्‍यावर उडतो कचरा सोनसळा

वृक्ष होतो बोडका

तरी भासतो योग्यासारखा

गळणार्‍या पर्णांना निरोप देताना

उभा ताठ, ना खंत ना वेदना

कर्मयोगी निवृत्तनाथ

ऋतुचक्राशी असे बद्ध

एकाकी हा कातरवेळी

संवाद करी पानगळी

हा शिशिर सरेल

पुन्हा वसंत फुलेल

नव्या जन्मी नवी पालवी

हिरवाईने पुन्हा नटेल. .

~ राधिका भांडारकर

‘योगी’ ही एक रुपकात्मक कविता आहे. माणसाचं जगणं समजावून सांगण्यासाठी निसर्गातील वृक्षाचा रुपक म्हणून उपयोग करुन घेतला आहे. कविता जसजशी वाचत जावी तसतसं लक्षात येत की हे सगळं मानवी जीवनाला लागू होतय. सुरुवातीला कवयित्री म्हणते,

“मातीतल्या बीजाला

 अंकुर फुटतो

 धरणीला आनंद होतो

 पावसाचे शिंपण होते

 अन् रोप उलगडते

 हळुहळू त्याचा

 वृक्ष होतो

 तो बहरतो, फुलतो, फळतो

 आनंदाची सर्वत्र पखरण करतो”

बाळाला जन्म दिल्यावर मातेला होणारा आनंद आणि बीजाला अंकुर फुटल्यावर मातीला होणारा आनंद — मातेला होणारा असो किंवा मातीला होणारा आनंद असो — त्या आनंदाची अनुभूती एकाच प्रतीची नाही का ? सृजनशीलतेचा आनंद अगदी एकसारखाच आहे. पुढे पाऊस पडतो. पाणी मिळत जातं आणि रोप उलगडते. आई तरी याशिवाय वेगळं काय करते ? संगोपनाच्या मेघातून मायेचा वर्षाव होतो आणि मूल मोठं होत जातं, नाही का ? कवितेत पुढे म्हटल्याप्रमाणे रोपाचा जसा वृक्ष होतो तसे त्या बाळाचेही रुपांतर पूर्ण व्यक्तीमध्ये होते. वृक्षाने सर्वांगाने बहरावे त्याप्रमाणे माणूसही त्याच्यावर होणार -या संस्कारांमुळे पूर्ण विकसित होतो. त्याच्या कर्तृत्वाने फुलतो, कर्माची फळे मिळवत जातो आणि आनंदाची, सौख्याची पखरण करतो–एखाद्या वृक्षाप्रमाणेच!

निसर्गाचा जो नियम वृक्षाला लागू, तोच नियम माणसालाही लागू होतो. (कारण माणूस निसर्गापासून वेगळा नाहीच). यापुढील काव्यपंक्ती,

“मग आयुष्याचा तो क्षण येतो

 पानगळीचा. . .

 एक एक पान गळू लागते

 फांदीला सोडून धरणीवर उतरते

 त्याचवेळी आभाळाची ओढ

 सरते. “

या काव्यपंक्ती काय सुचवतात पहा. वृक्षांची पानगळ सुरु होते. पूर्ण बहरलेला वृक्ष एक एक पान गाळू लागतो आणि निष्पर्ण होऊ लागतो. त्याचे वैभव ओसरते. ही पानगळ असते त्या वृक्षाच्या आयुष्यातील उतरणीचा, संकटाचा काळ असतो. माणसाच्या आयुष्यातही संकटे येतात. माणूस काही काळ खचून जातो. वैभवाला, प्रगतीला उतरती कळा लागते. कवयित्रीने पुढे म्हटल्याप्रमाणे ” आभाळाची ओढ सरते “. म्हणजे नवीन काही करण्याची, पुढे जाण्याची, आभाळ कवेत घेण्याची उमेद रहात नाही. त्यापुढील काव्यपंक्ती

“ज्या मातीतून उगवले

 तिथेच परतीची पाऊले”

या ओळी हेच सांगतात की ज्या मातीतून पाने वर वर आली त्याच मातीत पानगळीच्या निमित्ताने ती पाचोळा होऊन खाली पडत आहेत, वृक्षापासून अलग होत आहेत. म्हणजे जिथे वैभव मिळाले तिथेच ते सोडून देण्याची वेळ येते. बघता बघता वृक्ष बोडका होतो. फक्त शुष्क फांद्या दिसू लागतात. पानगळ होत असताना तो निमुटपणे सहन करत एखाद्या कर्मयोग्यासारखा, खंत, खेदाच्या पलीकडे जाऊन ताठपणे उभा असतो. जी पाने गळून गेली त्याबद्दल दुःख नाही. उलट ऋतूचक्राशी असलेले नाते समजून घेऊन पानझडीचा शिशिर संपण्याची वाट पहात उभा असतो. कारण त्याला माहित असतं, पुढे वसंत येणार आहे. पालवी फुटणार आहे. नवी पाने येणार आहेत. पुन्हा हिरवाईने नटायचे आहे. आभाळाकडे झेप घ्यायची आहे.

मानवी जीवनाचे यापेक्षा वेगळे काय आहे ? संकटांचा ऋतू आला की सुखाची पानगळ सुरु होते. प्रगती थांबली की काय असे वाटू लागते. हे सगळं यश, वैभव इथेच सोडून जावं लागणार की काय ? अशीही भावना होऊ लागते. पण… पण तरीही माणूस डगमगत नाही. कारण त्यालाही जीवनचक्राचे नियम माहित होतात. दुःखाचे वादळ आले तरी त्याला वावटळ समजून अंगावर घेतले पाहिजे. कारण पुढे सुखाचा वसंत येणार आहे याची खात्री असते. हा विश्वास त्याला कुठून मिळतो ? निसर्गातूनच! असा एखादा वृक्ष दिसू लागतो पुनःपुन्हा बहरणारा आणि त्याच्या मनाच्या मातीतही उमेदीचे अंकुर फुटू लागतात. मानवी जीवन आणि निसर्ग यांच हे अतूट नातं कवयित्रिने अगदी अचूकपणे टिपले आहे.

कवितेत वापरलेले ‘कर्मयोगी निवृत्तीनाथ’ हे शब्द मला फार महत्त्वाचे वाटतात. कारण कर्म करुनही त्याचे फळ मिळाले नाही किंवा मिळालेले फळ निसटून गेले तरी मनाची शांती ढळू न देता जो निवृत्त होतो तोच खरा कर्मयोगी आणि निवृत्तीनाथ ! वृक्षाच्या प्रतिकातून मानवी जीवनावर सहजपणे भाष्य करताना कवितेला झालेल्या या आध्यात्मिक विचारांच्या स्पर्शामुळे कविता एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोचते. आयुष्यातील चढउतार पचवायची ताकद ख-या कर्मयोग्यातच असते. निवृत्त होऊनही नव्या जन्मीच्या हिरवाईची वाट पाहणारा जीवनाविषयीचा आशावाद, सकारात्मकता या कवितेतून दिसून येते.

“ज्या मातीतून उगवले

 तिथेच परतीची पाऊले”

या ओळी वाचताना “माती असशी, मातीत मिसळशी” किंवा “तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी, माती सांगे कुंभाराला” या काव्यपंक्तींची आठवण येतेच. एकच विचार प्रत्येक कवी आपल्या स्वतंत्र प्रतिभेने कशा पद्धतीने मांडत असतो हे अशा काव्यांतून स्पष्ट होते.

वृक्षाच्या अंगी असलेले कर्मयोगीत्व जर माणसाने अंगिकारले तर त्याचं जीवनही पुनःपुन्हा प्रगतीच्या, वैभवाच्या हिरवाईने बहरून येईल असा सुप्त संदेश देणारी ही कविता एक सुंदर निसर्ग काव्याचे रुप घेऊन आपल्यासमोर सादर केल्याबद्दल कवयित्री सौ. राधिका भांडारकर यांना मनःपूर्वक धन्यवाद!

रसग्रहण –  सुहास रघुनाथ पंडित

सांगली.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments