श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ क्षण सृजनाचे : ऋतुचक्र – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
सकाळी चहा केला, की स्वैपाकघराला लागून असलेल्या गॅलरीत उभं राहून समोरच्या झाडा-पेडांकडे बघत बघत चहा घ्यायची माझी जुनीच सवय. सकाळचा थोडासा गारवा, समोरच्या झाडा-पेडांच्या हिरवाईमुळे डोळ्यांना मिळणारा थंडावा, थोडी का होईना, स्वच्छ हवा, या सार्या वातावरणामुळे देह-मन कसं प्रसन्न होतं. ही सारी प्रसन्नता मग दिवसभर पुरवायची.
मध्यंतरी मी आठ – दहा दिवस गावाला गेले होते. त्यावेळी झाडांची पानगळ अगदी भरात होती. त्यांच्या अंगा –खांद्यावर बागडणारे, विसावणारे पक्षी कसे स्पष्ट दिसत होते.
गावाहून परत आले. दुसर्या दिवशी नेहमीप्रमाणे चहा घेऊन गॅलरीत उभी राहले, तर एक पक्षी चिर्रर्र करत आला आणि झाडांच्या पानांच्या हिरव्या छ्त्रीत छ्पून गेला. सगळीकडं शोध शोध शोधलं त्याला, पण कुठे म्हणून दिसेना. मनात आलं, जाताना ओकं- बोकं वाटणारं झाड बघता बघता नव्या नाजुक कोवळ्या, पोपटी पालवीनं कसं भरून गेलय. वार्याच्या मंद झुळुकीबरोबर नवी पालवी हिंदोळत होती. झुलत, डुलत होती.
एका खालच्या फांदीच्या डहाळीवर एका कोवळ्या पानाशेजारी एक जीर्ण शीर्ण झालेलं जुनं पान होतं. त्याचं जून, जरबट देठ अजूनही डहाळीला धरून होतं. पण ते बोट आता कधीही सुटणार होतं. त्याच्या शेजारचं कोवळ, लहानगं पान कधी त्याला लडिवाळ स्पर्श करून जायचं, तर कधी क्षणभर त्याच्या छातीवर मान ठेवून पाहुडायचं. तिकडे बघता बघता वाटलं, जसं काही आजोबांच्या छातीवर डोकं ठेवून नातू पहुडलाय आणि गप्पा मारतोय आजोबांशी. मनाला मग चाळाच लागला, काय बर बोलत असतील ते?
त्या जुन्या पानाला आता लवकरच डहाळीपासून दूर जावं लागणार होतं. त्याने शेजारच्या नव्या कोवळ्या पानावरून हात फरवत त्याचा निरोप घेतला, तशी ते नवं पान रडवेलं होत म्हणालं, ‘आजोबा, जाऊ नका नं तुम्ही! मला खूप खूप वाईट वाटेल तुम्ही गेल्यावर!’
जुनं जून पान म्हणालं, ‘मला जायलाच हवं. आम्ही जुन्या पानांनी जागा करून दिल्याशिवाय या फांद्यांवर, डहाळ्यांवर नवी पानं, फुलं काशी येतील?’
‘कुठे जाशील तू इथून?’ नव्या पानाने विचारलं.
‘मी इथून झाडाच्या तळाशी जाईन. तळाच्या मातीवर पडेन. हळू हळू माझा चुरा होईल. त्यावर पाणी पडेल. मग मी हळू हळू जमिनीच्या आत आत जाईन. माझं खत होईल. मी आणखी आत जाईन. मुळापाशी जाईन. मुळं माझं सत्व शोषून घेतील. वर वर खोडातून फांद्यांपर्यंत , डहाळ्यांपर्यंत पोचवतील. तिथून पाना-फुलांपर्यंत पोचवतील आणि आशा तर्हेने मी तुझ्याकडे येईन नि तुझ्यात सामावून जाईन. आता नाही नं तू उदास होणार? रडणार?
‘आजोबा लवकर याल नं? मी वाट पाहीन.’
‘हो तर!’ असं म्हणता म्हणता जून जरबट देठाने आपलं डहाळीचं घर सोडलं. पिवळं पाडलेलं जून जरबट पान इवल्या पानाचा निरोप घेत खाली आलं आणि झाडाच्या तळाशी विसावलं. तळाशी असेलया इतर सोनेरी, तपकिरी पानात मिसळून गेलं. तिकडे पाहता पाहता एकदमच सुचलं –
पर्णरास सोनियाची तरुतळी विसावली वर हासतात फुले, रत्नझळाळी ल्यालेली
आज हासतात फुले, उद्या माती चुंबतील हसू शश्वताचं त्यांचं, रस फळांचा होईल.
पुन्हा झडतील पाने , फुले मातीत जातील. रस जोजवेल बीज बीज वृक्ष प्रसवेल.’
तर अशी ही कविता. समोरच्या झाडाची बदलती रुपे बघता बघता सहजपणे सुचलेली.
© श्रीमती उज्ज्वला केळकर, सम्पादिका – ई-अभिव्यक्ति (मराठी)
176/2 ‘गायत्री ‘ प्लॉट नं12, वसंत साखर कामगार भवन जवळ , सांगली 416416 मो.- 9403310170