सौ.ज्योत्स्ना तानवडे
☆ क्षण सृजनाचे ☆ जगू नव्याने… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
काही दिवसांपूर्वी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या व्हाट्सअप ग्रुपवर एक व्हिडिओ आला. तो पाहून त्यावर कोणाला काय सुचते ते कवितेच्या स्वरूपात लिहा,असा मेसेज दिला होता.
जवळपास ७५ वर्षानंतर भेटणाऱ्या दोन वृद्ध मैत्रिणी. त्यांचे वय असेल ८०-८५ च्या घरात. शाळेत बालपणी एकत्र खेळल्या, बागडलेल्या मैत्रिणी. इतक्या वर्षांनी भेटल्यावर ‘काय करू अन् काय नको ‘ असे त्यांना झालेले. पण पाठीची कमान झालेली, हातात काठी, तोंडाची बोळकी. उत्साहाने भरभरून आनंद व्यक्त करायला तेवढी शारीरिक क्षमता नाही. पण सतत तोंड भरून हसत हसत पुन्हा पुन्हा हातात हात धरणाऱ्या ‘त्या ‘ मैत्रिणीं ची सगळी देहबोली आनंदाने फुलूनआली होती.
हे चित्र पाहिल्यावर झटकन मन पन्नास-पंचावन्न वर्षे मागे गेले.आठवले ते शाळेतले सुंदर, फुलपाखरी दिवस. शाळेची ती छोटीशी टुमदार इमारत. तिच्या पुढे- मागे मोठी मैदाने. त्यावर खेळणाऱ्या, धावणाऱ्या, चिवचिवणाऱ्या अनेक मैत्रिणी. वेगवेगळे खेळ,वेडी गुपिते, रुसवेफुगवे, मनधरणी आठवून हसू आले.त्यावेळच्या सगळ्या गोड, रम्य आठवणींनी मनात फेर धरला आणि मनाच्या आतल्या खोल कप्प्यातून शब्दांची लड झरझर उलगडत गेली.व्हिडिओतल्या ‘ त्या ‘ दोन वृद्ध जीवांना जणू नवसंजीवनी मिळाली आणि ते पाहून त्या निष्पाप निरागस मैत्रीने शब्द रूप घेतले.
☆ जगू नव्याने… ☆
बालपणीच्या दोन सख्या
कित्येक वर्षांनी भेटल्या
एकमेकींना बघताच
खळाळून हसत सुटल्या ||
डोईवरी रूपेरी कापूस
तोंडाची झाली बोळकी
हसत हसतच दोघींनी
एकमेकींना दिली टाळी ||
ओळखलंच नाही बघ
किती बाई बदललीस!
मला म्हणतेस बयो,
तू कुठं पहिली राहिलीस ?
कशा होतो ग आपण
नाजुकश्या कळ्या सुंदर !
एकेक पाकळ्या गळत गेल्या
आयुष्य आहे मोठं बिलंदर ||
किती खेळलो भांडलो
रोज नवीनच खोडी !
अजूनही आठवते बघ
चिमणीच्या दातांची गोडी ||
कमा, सुमा, नंदू, रंजू
पुन्हा कोणी भेटलेच नाही !
प्रत्येकीची कहाणी वेगळी
ढाचा मात्र एकच राही ||
फुलपाखरापरी स्वच्छंदी
माहेरघरात वावरलो !
सासरची रीतच न्यारी
प्रत्येक गोष्टीत बावरलो||
भलेबुरे अनुभव घेतले
दुसर्यांसाठीच धावलो !
अजूनही झोळी रिकामीच
आधारावरच राहिलो ||
जाऊ दे सये,विसर सारं
पुन्हा नव्यानेच भेटूयात !
होय ग बयो,दोघी मिळून
संध्या गीत गाऊयात ||
© सौ. ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुंदर कविता!
हे चित्र मी पण पाहिले होते!