श्री सुहास रघुनाथ पंडित
☆ क्षण सृजनचा ☆ कविवर्य ग्रेस ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
जन्म नाव – स्व माणिक सीताराम गोडघाटे टोपणनाव – ग्रेस
(जन्म – १० मे, १९३७ नागपूर मृत्यु – २६ मार्च, २०१२ पुणे)
झाली म्हणजे किती पटकन प्रसन्न होते.नाहीतर एकदा का रूसली की रूसलीच. कवितेच हे असच आहे.
26 मार्च. म्हणजे कविवर्य ग्रेस यांचा स्मृतिदिन. त्यांच्यावर आलेले लेख,व्हिडिओ पाहणे चालू होते. काही नवीन माहितीही मिळाली त्यांच्याबद्दल. वाचणे चालू होतेच. पण त्यांच्या गूढगर्भात्मक कवितांच्या ओळी मनातून जात नव्हत्या. जे लेख वाचले त्यातही गूढता, दुःख यांचा उल्लेख होताच. आणि तरीही त्या कविता वाचू नयेत अस कोणालाच वाटत नव्हतं. अगम्यतेच आकर्षण. समजो न समजो, पुन्हा वाचाव्यात अशा कविता. नकळतपणे आपण गुंतत जातो त्यांच्यात. वाचलेल्या कविता, त्यांची झालेली गीते, सगळं कानाना ऐकू येऊ लागल आणि नकळतपणे मनात गुणगुणलो,
गूढ तुझ्या शब्दांची जादू
मनात माझ्या अशी उतरते…
आणि पुढचं कसं सुचत गेलं, मलाही ठाऊक नाही. ती ही कविता, तुम्हांसाठी सादर.
☆ कविवर्य ग्रेस ☆
गूढ तुझ्या शब्दांची जादू
मनात माझ्या अशी उतरते
चांद्रनील किरणांच्या संगे
संध्येची जशी रजनी होते
कळू न येतो अर्थ जरी,पण
दुःखकाजळी पसरे क्षणभर
खोल मनाच्या डोहावरती
कशी होतसे अस्फुट थरथर
सोसत नाही असले काही
तरी वाचतो पुनः नव्याने
डोलत असते मन धुंदीने
हलते रान जसे वार्याने
ग्रेस,तुझ्या त्या काव्यप्रदेशी
माझे जेव्हा येणे झाले
जखम न होता कुठे कधीही
घायाळ कसे , मन हे झाले
संपत नाही जरी इथले भय
शब्दचांदणे उदंड आहे
त्या गीतांच्या स्मरणा संगे
दुःख सहज हे सरते आहे
साभार चित्र – माणिक सीताराम गोडघाटे – विकिपीडिया (wikipedia.org)
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
छान कविता..
अतिशय
सुंदर कविता . चांद्रनील . . .रजनी होते. वाघ वा. कवी ग्रेस ची कानात गुणगुणले जणू